1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (17:10 IST)

युक्रेनमधल्या मराठी विद्यार्थ्यांच्या शहरावर हल्ला, हात जोडून भारताला केली वाचवण्याची विनंती

युक्रेनमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांनी मदतीसाठी भारत सरकारकडे याचना केली आहे. आम्हाला लवकरात लवकर एअर लिफ्ट करा अशी मागणी त्यांनी भारत सरकारकडे केली आहे.
 
पवन मेश्राम या अडकून पडलेल्या विद्यार्थ्याने बीबीसी मराठीला एक व्हीडिओ पाठवून तिथल्या परिस्थितीची माहिती दिली आहे.
 
माजेपी स्ट्रीटवर खूप सारे बंकर तयार करण्यात आले होते. त्याठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. संपूर्ण इव्हानोमध्ये हायड्रोलेटिक पाईप, जिथून वीजेचा, पाण्याचा पुरवठा होत होता, त्याचठिकाणी हल्ला केला आहे. गावं आणि शहरांमध्ये वीज, पाणी याचा तुटवडा यावा म्हणून हा हल्ला केला आहे, अशी माहिती पवन मेश्रामने बीबीसी मराठीला दिली आहे.

सगळीकडं आणीबाणी निर्माण झाली आहे. बाहेर सगळीकडं धूर दिसत आहे. भारत सरकारनं येथील लोकांना एअरलिफ्ट करावं अशी आमची विनंती आहे. कारण सगळ्या फ्लाईट बंद झाल्या आहेत, इथं नो फ्लाइट झोन झालं आहे, त्यामुळं सरकारला आमची विनंती आहे, अशी मागणी त्याने सरकारकडे केली आहे.
 
'इतकं महाग तिकीट कसं काढू?'
"घरच्यांचं म्हणणं असं आहे की कितीही रुपयांचं तिकीट असेल तरी चालेल, तुम्ही सुखरूप घरी या. एरव्ही मी युक्रेनला जातो किंवा भारतात येतो तेव्हा 25-30 हजार रुपयांची व्यवस्था घरचे करतात. पण एअर इंडियाची तिकीटं प्रचंड महागल्याने आर्थिक ताण पडला आहे," असं पवन मेश्रामने सांगितलं.
 
नागपूरचा पवन युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. युक्रेन-रशिया यांच्यातील वाढता तणाव लक्षात घेऊन भारतीय विद्यार्थ्यांनी मायदेशी परतावं असं परराष्ट्र मंत्रालयाने सूचित केलं आहे. भारतात परतण्याची गडबड सुरू असतानाच पवनने बीबीसी मराठीशी संवाद साधला.
 
"आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांनी तिकिटांचे दर कमी होण्यासाठी काही केलं तर बरं होईल. राजस्थान, बिहार, हरियाणा यासारख्या राज्यांनी त्यांच्या राज्यातील मुलांना मायदेशी परतण्यासाठी पावलं उचलली आहेत.
 
"आम्ही तिकीट काढू पण त्याचे दर थोडे कमी झाले तर बरं होईल. आमचे लेक्चर्स ऑनलाईन सुरू झाले आहेत. मायदेशी परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तिकिटाचे दर कमी झाले तर चांगलंच आहे. नाहीतर आम्हाला तिकीट ज्या किमतीला उपलब्ध असेल ते घेऊन परतावं लागेल," असं पवनने सांगितलं.
 
त्याने पुढे सांगितलं, "भारतीय दूतावासाने 20 तारखेला आम्हाला युक्रेन सोडण्यासंदर्भात सूचना केली. भारतात जाण्यासाठी एअर इंडियाची विमानं 22, 24 आणि 26 तारखेला उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तिकीट प्रत्येकाने आपापलं काढायचं आहे. एरव्ही किव्ह ते दिल्ली या प्रवासासाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो.
 
"एअर इंडियाचं विमानाचं तिकीट 60 ते 80 हजार रुपये आहे. अन्य एअरलाईन्सचं तिकीट आताही 25 ते 30 हजार रुपयात उपलब्ध आहे. ही विमानं एक थांबा घेऊन घेऊन भारतात जातात.
 
"एअर इंडियाचं विमान थेट दिल्लीला जातं. एअर अरेबिया, फ्लाय दुबई, कतार एअरलाईन्स या कंपन्यांची किव्हहून दिल्लीसाठी विमानसेवा आहे. मात्र या कंपन्या अन्य देशांच्या असल्याने वाटेत एखाद्या शहरात थांबा असतो".
"मी इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरात आहे. हे शहर पश्चिम युक्रेनमध्ये आहे. मध्यवर्ती भागात असल्याने युद्धाची थेट झळ पोहोचलेली नाही. तूर्तास तरी इथलं दैनंदिन जीवन सुरळीत सुरू आहे. हिवाळा संपण्याच्या बेतात असून उन्हाळा सुरू होतो आहे.
 
"या शहरात सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. ट्रेन-बसने अन्यत्र कुठेही जाता येतं. युक्रेनची राजधानी असलेलं किव्ह शहर 500 ते 600 किलोमीटर अंतरावर आहे. किव्हला जाण्यासाठी ट्रेन आहे तसंच विमानाचीही सोय आहे. या प्रवासाला साधारण 8 तास लागतात", असं पवनने सांगितलं.
 
"युक्रेनमध्ये भारतीयांची संख्या 20000 पर्यंत आहे असं पवनने सांगितलं. पण यापैकी सगळे आता युक्रेनमध्ये नाहीत. कोरोना काळात ऑनलाईन लेक्चर्स होत असल्याने काही विद्यार्थी भारतातच राहिले.
 
"गेल्या महिनाभरापासून युद्धप्रवण परिस्थिती असल्याने साधारण 3000 विद्यार्थी भारतात परतलेत. काही मुलं आज रवाना होत आहेत. आता साधारण 10000 भारतीय विद्यार्थी युक्रेनध्ये असू शकतात."
 
"इथे महाराष्ट्र मंडळ नाही, पण इंडियन्स इन युक्रेन नावाची कम्युनिटी आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटरवर सगळीकडे अकाऊंट्स आहेत. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातूनही संपर्क होत असतो."
 
"भारतीय दूतावासाच्या आम्ही संपर्कात असतो. एअर इंडियाची विमानं उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला. मात्र या विमानांची तिकीट महाग आहेत. तिकिटांचे दर कमी करता येईल का यासंदर्भात आम्ही त्यांना विनंती केली आहे. मात्र तूर्तास तरी त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही", असं पवनने सांगितलं.
 
दरम्यान युक्रेनमधील वैद्यकीय विद्यापीठांनी त्यांचे अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने चालवणार का यासंदर्भात भारतीय दूतावासाला मोठ्या प्रमाणावर कॉल येत आहेत. यासंदर्भात भारतीय विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरळीत सुरू राहावं यासाठी भारतीय दूतावास संबंधित यंत्रणांशी समन्वय करत आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या काळासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडावं. विद्यापीठाकडून ऑनलाईन लेक्चर्ससंदर्भात अधिकृत सूचना जारी होण्याची वाट पाहण्यापेक्षा त्यांनी मायदेशी परतावं. यासंदर्भातील तपशील विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल असं भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.