रशियाचे क्षेपणास्त्र युक्रेनच्या विमानतळावर पडले, स्फोटानंतर आग
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात केलेल्या घोषणेनंतर रशियन सैन्याचे हल्ले तीव्र झाले आहेत. रशियन सैन्य युक्रेनमधील शहरांमधील लष्करी तळांवर हल्ले करत आहे. सध्या, रशियन लष्कराचे म्हणणे आहे की ते नागरी लक्ष्यांना लक्ष्य करत नाहीत. पण याचदरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये इव्हानो-फ्रँकिव्हस्क विमानतळावर रशियन क्षेपणास्त्र पडताना दिसत आहे. 30 सेकंदांचा हा व्हिडिओ एका वृत्तसंस्थेने जारी केला आहे, जो सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विमानतळाजवळील इमारतीवर क्षेपणास्त्र आदळले, त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि धुराचे लोट उठताना दिसत आहेत. युक्रेनच्या गृहमंत्रालयाचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी सांगितले की, रशियन सैन्य क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. युक्रेनच्या लष्करी तळांवर हे हल्ले केले जात आहेत. रशियन सैन्य कीव, खार्किव आणि डनिप्रो शहरातील युक्रेनियन एअरबेस आणि लष्करी डेपोंना लक्ष्य करत आहे. तथापि, रशियन सैन्य सातत्याने सांगत आहे की ते लोकवस्तीच्या भागात हल्ले करत नाहीत. युक्रेनची राजधानी कीवमध्ये काही स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की कीवमध्ये पहाटे 5 च्या सुमारास काही स्फोट ऐकू आले.
कीवमध्ये काही स्फोट झाले आणि नंतर लोकांनी गोळीबाराचे आवाज ऐकले. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे.