मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (11:15 IST)

रशिया युक्रेनला कमकुवत करण्यासाठी नवीन युद्धनीती वापरणार

युक्रेनने दोनेत्स्कवर केलेल्या क्षेपणास्त्रं हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आपण युक्रेनच्या संरक्षण उद्योगाला आता लक्ष्य करणार असल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय.
 
फुटीरतावाद्यांच्या ताब्यातल्या दोनेत्स्क भागावर युक्रेनने सोमवारी (14 मार्च) क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा रशियाचा दावा आहे.
 
एका ऑनलाईन पोस्टमध्ये रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलंय, "दोनेत्स्कवर टोकता-यू क्षेपणास्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्याचं उत्तर म्हणून रशियाच्या फौजा हत्यारांचं उत्पादन करणाऱ्या युक्रेनच्या संरक्षण उद्योगाशी संबंधित कंपन्यांना लक्ष्य करतील. या कंपन्यांच्या जागा इथे काम करणाऱ्या आणि परिसरात राहणाऱ्या युक्रेनियन नागरिकांनी सोडाव्यात असं आवाहन आम्ही करतो."
 
दोनेत्स्कमध्ये युक्रेनने केलेल्या हवाई हल्ल्यात 20 नागरिकांचा जीव गेल्याचा आरोपही यापूर्वी रशियाने केला होता.
 
पण युक्रेनने आपण असे हल्ले केले नसल्याचं म्हणत यासाठी रशियन क्षेपणास्त्रं जबाबदार असल्याचं म्हटलंय.
 
दरम्यान चेर्नोबिल अणुभट्टी प्रकल्पाचा वीज पुरवठा पुन्हा सुरू झाल्याचं इंटरनॅशन अटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)ने म्हटलंय.
 
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबच्या या काही महत्त्वाच्या घडामोडी
रशिया आणि युक्रेनमधली बोलणी मंगळवारी 15 मार्चलाही सुरू राहणार असल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलंय.
युद्धाचा निषेध करणाऱ्या एका आंदोलक महिलेने रशियाच्या मुख्य टीव्ही चॅनलवर सुरू असलेल्या संध्याकाळच्या बातमीपत्रात व्यत्यय आणला. तिला अटक करण्यात आल्याचं समजतंय.
चीनने रशियाला मदत केली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेने चीनला दिला आहे. यासोबतच युक्रेनला आपण शस्त्रास्त्रं पुरवठा, अन्न आणि आर्थिक मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलंय. युक्रेनमधले निर्वासित अमेरिकेत आले तर त्यांचं आपण स्वागत करू असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारशी संबंध असलेल्या 100 व्यक्तींवर नवीन अतिरिक्त निर्बंध लादण्याची तयारी युकेने केली आहे.
तर युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून जपानने आणखी 17 रशियन नागरिकांवर निर्बंध घालण्याची कारवाई केली आहे.
न्यूझीलंडमध्ये असणाऱ्या युक्रेनमध्ये जन्म झालेल्या नागरिकांच्या आणि रहिवाशांच्या 4000 नातेवाईकांना आसरा देण्याची तयारी न्यूझीलंडने दाखवली आहे.