युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाने मारियोपोलवर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले केले आहेत. हे शहर बरंच उद्ध्वस्त झालं आहे. रशियाचे या शहरावरचे हल्ले सुरूच आहेत.
मारियोपोल हे रशियाच्या युक्रेनमधील लष्करी मोहिमेसाठी कळीचं ठिकाण आहे. पण का?
हे बंदराचं शहर रशियासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं असण्याची चार प्रमुख कारणं आहेत.
1.क्रिमिया आणि डोन्बासला जोडणाऱ्या पट्ट्यावर ताबा मिळवणं
नकाशावर पाहिलं तर मारियोपोल हे अतिशय छोटंसं शहर आहे. पण क्रिमियन द्वीपकल्पातून अचानकपणे बाहेर पडावं लागलेल्या रशियन फौजांच्या वाटेत हे शहर उभं आहे.
रशियन सैनिक ईशान्य दिशेकडे आगेकूच करण्याचा प्रयत्न करत आहेत. डोन्बासमधल्या फुटीरतावादी सहकाऱ्यांसोबत जाण्यासाठी ते पराकाष्ठा करत आहेत.
यूके जॉइंट फोर्सेस कमांडचे माजी कमांडर जनरल सर रिचर्ड बॅरन्स यांनी सांगितलं-रशियाच्या युद्धविषयक प्रयत्नांचा विचार करता मारियोपोलचा ताबा मिळवणं हे महत्त्वाचं आहे.
"जेव्हा रशियाला वाटेल की, त्यांनी यशस्वीपणे युक्रेन मोहीम पार पाडली आहे, तेव्हा रशिया ते क्रीमियामधला पूल ते पूर्ण करतील आणि हे यश त्यांच्यासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं असेल."
जर त्यांनी मारियोपोलचा ताबा मिळवला तर त्यांना युक्रेनच्या ब्लॅक सीच्या किनाऱ्याच्या 80% भागावर रशियाला वर्चस्व मिळेल. त्यामुळे रशिया युक्रेनचा समुद्री मार्गानं होणारा व्यापार थांबवू शकेल आणि जगापासून युक्रेनला तोडताही येईल.
पण गेल्या तीन आठवड्यांपासून युक्रेनच्या फौजांनी रशियाला रोखून धरण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं आहे. पण अत्यंत वेगाने या शहरावर ताबा मिळण्यात आलेल्या अपयशामुळे रशियाने आपला हल्ला तीव्र करत जवळपास अगदी मध्ययुगीन पद्धतीनेच आक्रमणाला सुरुवात केली.
त्यांनी रॉकेट, मिसाइल्स, बॉम्बचा माराचा या शहरावर सुरू केला. 90 टक्क्यांहून अधिक शहरचा विध्वंस झाला आहे. मारियोपोलचा विद्युतपुरवठा, पाणीपुरवठा, अन्न आणि वैद्यकीय मदतही रशियाकडून अडवली गेलीये. यातून लोकांचे जे हाल सुरू झाले, त्यासाठी मॉस्कोनं युक्रेनलाच जबाबदार धरलं आहे. मुदत संपल्यानंतरही शरण यायला नकार दिल्यामुळे ही वेळ आल्याचं रशियानं म्हटलं आहे.
दुसरीकडे युक्रेनच्या खासदारांनी 'मारियोपोलनं शरणागती पत्करावी यासाठी रशियाकडून उपासमारीची वेळ आणली जात आहे,' असा आरोप केला आहे.
जोपर्यंत शेवटचा सैनिक शहराच्या रक्षणासाठी लढत आहे, तोपर्यंत आम्ही शहराचं रक्षण करू असं युक्रेननं स्पष्ट केलं आहे. कदाचित ती वेळ येऊही शकते. कारण रशियन फौजा हळूहळू पुढे सरकत आहेत आणि दोन्ही देशांना मान्य होईल असा कोणताही तोडगा शांततेसाठी निघाला नसल्यानं रशियाकडून हल्ल्यांची तीव्रता वाढवली जाऊ शकते.
2. युक्रेनच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या आवळणं
मारियोपोल हे काळ्या समुद्राचा भाग असलेल्या सी ऑफ अझोव्हमधलं सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं बंदर आहे.
या बंदरामध्ये जहाजं थांबण्यासाठी आवश्यक ती खोली आहे. त्यामुळे अझोव्ह समुद्राच्या भागातलं हे मोठं बंदर असून लोह आणि पोलाद उद्योगाचं केंद्र आहे. युक्रेनमधील स्टील, कोळसा आणि मका हे मध्य पूर्वेत तसंच इतर ठिकाणी निर्यात करण्यासाठी प्रामुख्यानं मारियोपोल बंदराचाच वापर केला जातो.
आठ वर्षांपासून म्हणजेच मॉस्कोने 2014 साली बेकायदेशीररित्या क्रिमियावर ताबा मिळवल्यापासून हे शहर या द्वीपकल्पातल्या रशियन फौजा आणि लुहान्स्क तसंच दोन्तास्कमधील रशियन समर्थक फुटीरतावाद्यांमध्ये अडकलं आहे.
त्यामुळेच मारियोपोल गमावणं हा युक्रेनच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा फटकाच असू शकतो.
3. प्रचारतंत्राची संधी
युक्रेनचं अझोव्ह ब्रिगेड हे लष्करी युनिट मारियोपोलमध्ये स्थित आहे. अझोव्ह समुद्रावरून नाव ठेवलेल्या या युनिटमध्ये अत्यंत कडवे, उजव्या विचारांचे लोक आहेत. त्यांची विचारसरणी ही इतकी कट्टर आहे की, त्यातील काहीजण नव-नाझी म्हणूनही ओळखले जातात.
त्यांचं युक्रेनच्या लष्करातलं प्रमाण हे अतिशय कमी असलं तरीही रशियासाठी यात प्रचारतंत्राचीही एक नामी संधी आहे. या नव-नाझींपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रयत्न केले, असं रशियाकडून सांगितलं जाऊ शकतं.
या अझोव्ह ब्रिगेडमधल्या सैनिकांना मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेणं जर रशियाला शक्य झालं तर ते या सैनिकांना सरकारी माध्यमांसमोर हजर करू शकतात. युक्रेन आणि युक्रेनियन सरकारचे दावे खोडून काढणाऱ्या माहिती युद्धात आघाडी घेण्याच्या दृष्टिने रशियासाठी महत्त्वाची ठरू शकते.
4. मनोधैर्य वाढवणारा विजय
रशियाला जर मारियोपोलचा ताबा मिळवता आला, तर रशियासाठी ही गोष्ट मनोधैर्य वाढविण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
सरकार नियंत्रित माध्यमांद्वारे क्रेमलिन आपल्या नागरिकांसमोर हे चित्र उभं करू शकतं की, रशिया आपली उद्दिष्टं साध्य करत आहे आणि प्रगतीपथावर आहे.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासाठी आता हे युद्ध वैयक्तिक यशापयशाचा भाग झालं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी मारियोपोलचा ताबा हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. युक्रेनची काळ्या समुद्राची किनारपट्टी ही पुतिन यांच्या संकल्पनेतील 'नवीन रशिया'चाच भाग आहे. पुतिन यांचा हा नवीन रशिया' म्हणजे 18 व्या शतकापर्यंत रशियन साम्राज्याचाच भाग असलेला प्रदेश.
'कीव्हमधील पाश्चिमात्य सरकारांना धार्जिण असलेल्या हुकूमशाहीतून रशियन लोकांना मुक्त केलं' ही गोष्ट पुतिन यांना बिंबवता येईल. मारियोपोल पुतिन यांच्या या उद्दिष्टाच्या आड उभं आहे.
दुसरीकडे युक्रेनच्या बाजूने पाहिलं तर मारियोपोल गमावणं हे केवळ लष्करी किंवा आर्थिक नुकसान नसेल. पण जे लोक आपल्या देशाच्या रक्षणासाठी लढत आहेत, त्यांच्यासाठी मानसिक आघात असेल.
मारियोपोलनं आतापर्यंत रशियन फौजांना कडवा विरोध केला आहे पण त्याची जबर किंमतही त्यांना मोजावी लागलीये. शहर मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झालंय, अनेक ठिकाणी केवळ ढिगारेच दिसत आहेत. ग्रोझ्नी आणि अलेप्पोप्रमाणेच या शहराचीही अवस्था होऊ शकते. या शहरांवर रशियानं बॉम्बहल्ले केले आणि जवळपास त्यांना बेचिराख केलं.
युक्रेनमधल्या इतर शहरांसाठीही हा एकप्रकारे इशारा असेल- मारियोपोलप्रमाणेच जर आम्हाला विरोध केला, तर तुमचीही हीच गत होईल.