1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (09:51 IST)

रशिया - युक्रेन युद्ध संपवण्यासाठी पुतीन यांनी ठेवल्या 'या' 5 मागण्या

रशिया आणि युक्रेनमध्ये मध्यस्त म्हणून टर्की फारच काळजीपूर्वक काम करतोय. याची फळं आता दिसायला लागली आहेत.
 
17 मार्चला दुपारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी टर्कीचे अध्यक्ष रेसिप तय्यीप एर्दोगान यांना फोन केला आणि युक्रेनसोबत शांतता करार करायचा असेल तर आपल्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत ते सांगितलं.
 
हा फोन झाल्या झाल्या अर्धा तासातच मी एर्दोगान यांचे वरिष्ठ सल्लागार आणि प्रवक्ते इब्राहिम कलीन यांची मुलाखत घेतली. कलीन त्या काही थोडक्या अधिकाऱ्यांपैकी होते ज्यांनी हा कॉल ऐकला.
 
रशियाच्या मागण्या दोन प्रकारात मोडतात. कलीन यांच्यानुसार पहिल्या चार मागण्या पूर्ण करणं युक्रेन तितकं अवघड नाहीये.
महत्त्वाची मागणी म्हणजे युक्रेनने तटस्थ राहिलं पाहिजे आणि नाटोत सहभागी होण्यासाठी अर्ज करायला नको. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी हे आधीच मान्य केलेलं आहे.
 
या पहिल्या प्रकारात आणखीही मागण्या आहेत ज्या मुख्यत्वे रशियाने आपली इभ्रत वाचवण्यासाठी पुढे केल्या आहेत.
युक्रेनला आपली शस्त्र नष्ट करावी लागतील म्हणजे त्यांच्याकडून रशियाला धोका निर्माण होणार नाही.
 
युक्रेनमध्ये रशियन भाषेचं संरक्षण केलं जाईल. अजून एक गोष्ट म्हणजे डि-नाझीफिकेशन.
 
ही डी-नाझीफिकेशनची प्रक्रिया झेलेन्स्की यांच्यासाठी खूपच अपमानास्पद असेल कारण ते स्वतः ज्यू आहेत आणि त्यांचे काही नातेवाईक नाझींनी केलेल्या ज्यूंच्या नरसंहारात मारले गेलेत.
 
टर्किश बाजूला वाटतं की ही अट मान्य करणंही झेलेन्स्की यांच्यासाठी सोपं असू शकेल. युक्रेनला नव्या-नाझीझमच्या सगळ्या प्रकारांची जाहीरपणे निंदा करावी लागेल आणि त्यांना आळा घालावा लागेल.
 
मागण्यांचा दुसरा प्रकार अवघड आहे. त्यांच्या फोन कॉलमध्ये पुतीन यांनी म्हटलं की त्यांना युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी समोरासमोर वाटाघाटी करायच्या आहेत. तरच त्यावर करार होऊ शकतो.
 
झेलेन्स्की यांनी आधीच म्हटलंय की ते रशिया राष्ट्राध्यक्षांना भेटायला तयार आहेत आणि त्यांच्याशी समोरासमोर वाटाघाटी करायलाही तयार आहेत.
 
पण या अवघड प्रकारातल्या मागण्या कोणत्या हे कलीन यांनी स्पष्ट स्वरूपात सांगितलं नाही. ते इतकंच म्हणाले की यात पूर्व युक्रेनमधल्या डोनबासचा दर्जा, ज्याचे काही भाग आधीच युक्रेनमधून फुटून निघालेत आणि आपलं रशियनत्वावर जोर देत आहेत आणि क्रायमियाचा दर्जा या दोन गोष्टींचा समावेश आहे.
 
कलीन यांनी स्पष्ट सांगितलं नसलं तरी रशिया युक्रेन सरकारसमोर मागणी ठेवेल की त्यांनी पूर्व युक्रेनमधला भाग रशियाच्या हवाली करावा असा अंदाज आहे. यावरून वादंग होईल.
 
दुसरा एक अंदाज असा आहे की रशिया म्हणेल की युक्रेनने आता अधिकृतरित्या मान्य करावं की क्रायमियावर रशियाचा हक्क आहे. 2014 मध्ये रशियाने क्रायमियावर बेकायदेशीररित्या ताबा मिळवला होता. असं झालं तर युक्रेनला हे मान्य करणं म्हणजे कडू औषधाचा घोट गिळण्यासारखं असेल.
 
क्रायमिया रशियात गेलं आहे, भले युक्रेन काही म्हणो. अर्थात काहीही असलं तरी रशियाला क्रायमियवर ताबा मिळण्याचा काहीही हक्क नव्हता. कम्युनिझमचा पाडाव झाल्यानंतर पण पुतीन सत्तेवर यायच्या आधी रशियाने एक आंतरराष्ट्रीय करारवरही सही केली होती ज्यात म्हटलं होतं की क्रायमिया युक्रेनचा भाग आहे.
 
तरीही पुतीन यांच्या मागण्या तितक्या कठोर नाहीयेत जितकी लोकांना भीती वाटत होती. रशियाने युक्रेनमध्ये जितका विद्ध्वंस केला, जी हिंसा केली, जे रक्त सांडलं त्या तुलनेत या मागण्या काहीच नाहीत.
 
पण रशियाच्या माध्यमांवर पुतीन यांची जबरदस्त पकड आहे त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या मागण्या म्हणजे मोठ्ठा विजय आहे असं दाखवणं अजिबात अवघड नाही. पण युक्रेन मात्र भयात जगेल.
 
कारण या कराराचे बारीकसारीक तपशील जर अत्यंत काळजीपूर्वक तपासले गेले नाहीत, त्यावर चर्चा झाली नाही तर पुतीन किंवा त्यांच्यानंतर येणारे रशियाचे नेते या कराराचा वापर युक्रेनवर पुन्हा हल्ला करण्यासाठी करतील.
 
युद्धबंदी करून जरी युक्रेनमधली हिंसा थांबली तरी शांतता करार पूर्ण व्हायला बराच वेळ जाऊ शकतो.
 
गेल्या काही आठवड्यांमध्ये युक्रेनची अतोनात हानी झाली आहे. रशियाने उद्धवस्त केलेली शहरं आणि गावं नव्याने वसवण्यासाठी खूप वेळ जाईल. लाखो लोक या युद्धामुळे देश सोडून पळून गेलेत. त्यांनाही पुन्हा घरं देणं आव्हानात्मक असेल.
 
व्लादिमीर पुतीन यांचं काय? काही जणांचं म्हणणं आहे की ते आजारी आहेत किंवा त्यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये. कलीन यांना त्यांच्या बोलण्यात काही विचित्र जाणवलं का?
 
अजिबात नाही, ते म्हणाले. पुतीन यांनी त्यांचं म्हणणं अगदी सुस्पष्टपणे मांडलं.
 
आता जरी त्यांनी युक्रेनसोबतचा शांतता करार हा आपला निओ-नाझीझवरचा भव्य विजय म्हणून लोकांसमोर मांडला तरीही त्यांच्या देशात त्यांच्या जागेला धक्का बसला आहे.
 
आता अधिकाधिक लोकांना कळेल की त्यांनी आपल्या ताकदीबाहेरचं युद्ध हाती घेतलं. रशियाच्या पकडल्या गेलेल्या किंवा मारल्या गेलेल्या सैनिकांच्या गोष्टी तर आधीच कर्णोपकर्णी व्हायला लागल्या आहेत.