ज्यांची कीर्ती कस्तुरी अखिल भारत वर्षात दरवळत आहे, असे महान लोकोत्तर महापुरुष आणि परम आदरस्थान असलेले महान अवतार सद्गुरुश्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली शिर्डी आज जागतिक पातळीवर साधनाभूमी आणि समाधीभूमी म्हणून परिचित आहे. अहमदनगर जिल्ह्यात अर्वाचीन काळात एक महान यग्याच्या आगमनाने आणि अकृत्रिम प्रेममुग्ध सहवासामुळे त्या स्थानास महत्त्व आलं. ते धाम म्हणजे शिर्डी. शिर्डीचे अतिप्राचीन नाव ‘शिलधी’ शके 1212 च्या दरम्यान यदुवंशी राजा रामदेवराय यादव याच्या कारकीर्दीत या भागात जुन्या वाड्याचे फक्त अवशेषच काय ते उरलेले होते. भग्नावस्थेत असलेल्या त्या गावाचा उपोगय केवळ मृतांना जाळण्या-पुरण्यासाठी करण्यात येऊ लागला. या शिलधीचेच पुढे शिर्डीत रुपांतर झाले. ‘शिलधी’ हा शब्द श्री बाबांनी आपल्या कठोर तपोबलाने पुढे प्रभावी बनविला आणि पवित्रतेचे धाम म्हणजेच ‘शिलधी’ अशा अर्थाने त्या नावाचे अक्षरश: शिर्डी क्षेत्रात रुपांतर करून टाकले. श्री साईबाबांचे वास्तव्य शिर्डीत कित्येक वर्षे होते. 1910 सालार्पत त्यांची नगर किंवा शिर्डीबाहेर फारशी प्रसिध्दी नव्हती. पण त्या आधी ते सुरुवातीला निंबवृक्षाखाली मौनधारण करून बसत. दिवसरात्र भोजन न करता त्यांनी बारा वर्षे कठोर तपश्र्चर्या करून सार्या भारतात श्रेष्ठ संत म्हणून कीर्ती संपादित केली. त्या काळात जे जे योगी, सिध्द, तपस्वी शिर्डी श्री बाबांच्या दर्शनार्थ आले त्या सर्वाची खात्री पटली होती की, श्री साईबाबा हे महान दत्तावतारी सत्पुरुष आहेत. ते योगीयांचे योगी, गुरुंचे गुरु आहेत. सर्वसाक्षी, सर्वज्ञ, आनंदमय, निरजंन आहेत.