सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. साईबाबा
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (16:05 IST)

साईसच्चरित - अध्याय ४२

Sai Satcharitra Marathi adhyay 42
॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
ॐ नमो जी सद्नुरु दातारा । श्रीमद्नोदातटविहारा । ब्रम्हामूर्ते कौपीनांबरा । संतवरा नमो तुजा ॥१॥
दावी भवनदी उतरूं दिना दे निजपदीं अवसरू । तो हा भक्तकाजकल्पतरू । संतावतारू साईंचा ॥२॥
गाताध्यायीं जाहले कथन । गोड कथा नवलविंदान । साईछबीचें जलनिमज्जन । टळूनि रक्षण झालें कसें ॥३॥
तैसीच एका भक्ताची कामना । साईंनीं पुरविली येऊनि स्वप्ना । लाविलें तया ज्ञानेश्वरीवाचना । देऊनि अनुज्ञा विस्पष्ट ॥४॥
सारांश गुरुकृपा - उजियेडें । फिटे भवभयाचें सांकडें । नि:श्रेयसमार्गद्वार उघडे । असुख रोकडें सुख होय ॥५॥
नित्य स्मरतां सद्नुरुचरण । विरे विन्घांचें विन्घपण । मरणासीही येईल मरण । पडे विस्मरण बवदु:खा ॥६॥
म्हणोनि या समर्थाची कथा । श्रोतां परिसिजे आपुलाल्या हिता । जयाचिया श्रवणें तत्त्वतां । अति पावनता लाधेल ॥७॥
आतां ये अध्याय़ीं आपण  । करूंया साईस्वभावनिरूपण । कैसें मनाचें तीव्रपण । अथवा मवाळपण तयांचें ॥८॥
आतां चित्त करूनि समाहित । परिसिलें आतांपर्यंत आचरित । तैसेंच बाबांचें देहोत्सर्ग - चरित । तेंही सुचित्त अवधारा ॥९॥
धन्य धन्य शिरडीचे लोक । जयां बाबांचें सहवाससुख । अर्ध - शतकाहुनीही अधिक । अति सुखकारक जाहलें ॥१०॥
शके अठाराशें चाळिसांत । दक्षिणायन प्रथम मासांत । विजयादशमी शुक्लपक्षांत । दिवसा देहान्त बाबांचा ॥११॥
नऊ तारीख मुसलमानी । कत्तलची रात्र तया दिनीं । तिसरे प्रहरीं साईनाथांनीं । केली निर्याणीं तयारी ॥१२॥
बुद्धाची तैं बुद्धजयंती । साईंची तैं पुण्यतिथी । देवादिकांची जी जयंती । तीच पुण्यतिथी संतांची ॥१३॥
साडेबारांचा घंटा पडला । दशमीचा काळ संपूर्ण झाला । एकादशी आली उदयाला । निर्याणकाला एकादशीं ॥१४॥
सूर्योदयाची उदयतिथी । तीच दसर्‍याचि तिथी मानिती । म्हणोनि विजयादशमी धरिती । उत्सव करिती ते दिनीं ॥१५॥
मंगळवार कक्तलची रात । ऐसा तो दिव्स अति विख्यात । म्हणवूनि ते दिनीं साई महंत । ज्योतींत ज्योत मिळविती ॥१६॥
वंगदेशींचा प्रसिद्ध सण । दुर्गापूजा - समाप्तिदिन । तो हा उत्तर हिंदुस्थानामधून । उत्सवदिन सकळांचा ॥१७॥
शके अठराशें अडतिसीं । विजयादशमीचेच दिवशीं । सायंकाळीं प्रदोषसमयासी । भविष्यासी सूचविलें ॥१८॥
कैसें ती कथितों अपूर्व लीला । होईल विस्मय श्रोतयांला । समर्थ साईंच्या अकळ कळा । तेणें सकळां कळतील ॥१९॥
इसवीसन एकूणीसशें सोळा  । सण दसरा शिलंगण वेळा फेरी परतातां सायंकाळा । लीला अद्भुत वर्तली ॥२०॥
नभप्रदेशीं मेघ गडगडे । अवचित विद्युल्लता कडकडे । तेवीं जमदग्नी - स्वरूप रोकडें । प्रकट केलें बाबांनीं ॥२१॥
सोडोनि शिरींचा सुडका । काढूनि कफनी तडकाफडका । फेडूनि कौपीन लंगोटा । केला भडका धुनींत ॥२२॥
आधींच तो अन्गि सोज्ज्वळ । साध्य होतां आहुती प्रबळ । उसळला शिखांचा कल्लोळ । भक्तांस घोळ पडियेला ॥२३॥
हें सर्व घडले अवचितीं । नकळे काय बाबांचे चित्तीं । शिलंगणकाळींची ती वृत्ति । महद्भीतिप्रद होती ॥२४॥
अग्नीनें पसरिलें निजतेज । त्याहूनि बाबा दिसले सतेज । झांकोळले नयन सहज । पराङमुख जन झाले ॥२५॥
संतहस्तींचें हें अवदान । सेवूनि प्रसन्न अग्निनारायण । दिगंबर बनले ते जामदग्य । धन्य नयन देखत्यांचे ॥२६॥
त्वेषें टवकारिले नयन । क्रोधें झाले आरक्त नयन । म्हणती “करा रे आतां निदान । मी मुसलमान कीं हिंदू” ॥२७॥
गर्जोनि बाबा वदती “पहा जी । मी हिंदू कीं यवन आजी । निर्धारा यथेच्छ मनामाजी । आशंका घ्या जी फेडूनियां” ॥२८॥
देखावा हा अवलोकून । मंडळी झाली कंपायमान । होईल कैसें शांतवन । नित्य चिंतन चाललें ॥२९॥
भागोजी शिंदा महाव्याधिष्ट । परी बाबांचा भक्त श्रेष्ठ । धीर केला आला निकट । नेसवी लंगोट बाबांसी ॥३०॥
म्हणे बाबा हें काय चिन्ह । आज शिलंगण दसर्‍याचा सण । म्हणती माझें हेंच शिलंगण । हाणित्ती सणसण सटक्यानें ॥३१॥
एणेपरी धुनीपाशीं । उभे बाबा दिगंबरवेषी । चावडी होती ते दिवशीं । घडते कैशी हे चिंता ॥३२॥
नवांची चावडी दहा झाले । परी बाबा नाहीं स्थिरावले । लोक जागजागीं तटस्थ ठेले । टकमक उगले पाहती ॥३३॥
होतां होतां झाले अकरा । बाबाही तेव्हां निवळले जरा । नेसोनियां लंगोटा कोरा । कफनी पेहराव मग केला ॥३४॥
चावडीची घंटा झाली । मंडळी होती तटस्थ बैसली । पालखी फुलांनीं शृंगारिली । अंगणीं आणिली आज्ञेनें ॥३५॥
रजतदंड पताका चवरी । छत्रध्वजादि राजोपचारीं । शृंगारिलीसे मिरवणूक - स्वारी । निघे बाहेरी एकांतरा ॥३६॥
झाला एकचि महागजर । साईनाथांचा जयजयकार । काय वर्णावा तो गिरागजर । आनंदा पूरलोटला ॥३७॥
मग शोधूनि शुभ्र धडका । बाबा डोक्यास गुंडिती फडका । घेती चिलीम - तमाखू सटका । जणूं तोच नेटका सुमुहूर्त ॥३८॥
कोणी छत्री कोणी चवरी । कोणी मोरचलें साजिरीं । कोणी गरुडटके अबदागिरी । घेती निजकरीं वेत्रदंड ॥३९॥
एणेपरी करूनियां मीस । बाबांनीं सुचविलें सर्वत्रांस । भवसागर - सीमोल्लंघनास । दसराच एक सुमुहूर्त ॥४०॥
तदनंतर एकचि दसरा । बाबांनीं दाखविला शिरडीकरां । पुढीलचि दसरा सुमुहूर्त बरा । देह धरार्पण केला कीं ॥४१॥
हें न केवळ सूचविलें । स्वयें अनुभवा आणूनि दाविलें । निजदेह शुद्ध वस्त्र वाहिलें । योगाग्नींत हविलें येच दिनीं ॥४२॥
सन एकोणीसशें अठरा । ते सालींचा तो सण दसरा । तोच सुमुहूर्त केला खरा । निज - परात्परा समरसले ॥४३॥
ऐसीच बाबांची आणीक प्रचीती । लिहितां लिहितां आठवली चित्तीं । कीं याच विजयादशमीची तिथी । निश्चित होती आधींच ॥४४॥
सिर्डीचे पाटील रामचंद्र दादा । झाले अति दुखणाईत एकदां । जीवास सोसवती न आपदा । अति तापदायक भोक्तृत्व ॥४५॥
उपाय कांहीं बाकी न राहिला । पडेना जंव दुखण्यास आळा । आला जीविताचा कंटाळा । अति कदरले पाटील ॥४६॥
होतां ऐसी मनाची स्थिती । एके दिवशीं मध्यरातीं । एकाएकीं बाबांची मूर्ति । त्यांचे उशागती प्रकटली ॥४७॥
तंव ते पाटील पाय धरिती । निराश होऊनि बाबांस वदती । कधीं येईल मज मरण निश्चिती । एवढेंच मजप्रती वद जी ॥४८॥
आला आतां जीवाचा वीट । नाहीं मज मरणाचें संकट । मरण कधीं मज देईळ भेट । पाहें मी वाट एवढीच ॥४९॥
तंव त्या बाबा करुणामूर्ति । म्हणती न करीं चिंता चित्तीं । टळली तुझी गंडांतरभीति । किमर्थ खंती करिसी रे ॥५०॥
तुजला नाहीं कंहींच भीती । तुझी हुंडी परतली पुरती । परी न तात्याची धडगती । दिसे मजप्रती रामचंद्रा ॥५१॥
शके अठाराशें चाळीस । दक्षिणायन आश्विणायन आश्विनमास । विजयादशमी शुक्लपक्ष । पावेल अक्षयपद तात्या ॥५२॥
परी न बोलावें तयापाशीं । हाय घेऊनि बैसेल जीवाशीं । झुरणीस पडेल अहर्निशीं । मरण कोणासी आवडेना ॥५३॥
अवघीं दोनच वर्षें उरलीं । तात्याचीवेळा जवळी आली । रामचंद्रास काळजी उद्भवली । बाबांची बोली वज्रलेप ॥५४॥
तात्यापासोनि गुप्त ठेवली । बाळा शिंप्याचे कानीं घातली । कोणी न कळवावी प्रार्थना केली । चिंता ती लागली उभयांतें ॥५५॥
खरेंच रामचंद्र पाटील उठला । त्याचा बिछाना तेथूनि सुतला । दिवस मोजतां मोजतां लोटला । नकळत गेला तो काळ ॥५६॥
नवल बाबांचे बोलाचा ताळा । चाळीसाचा भाद्रपद सरला । मास आश्निन डोकावूं लागला । तात्याबा पडला पथारीवर ॥५७॥
तिकडे तात्या तापानें आजारी । इकडे बाबांस भरली शिरशिरी । तात्याचा भरंवसा बाबांवरी । बाबांचा श्रीहरि रक्षिता ॥५८॥
सुटेना तात्याचा बिछाना । येववेना बाबांचे दर्शना । अनिवार देहाच्या यातना । सोनवेना तयातें ॥५९॥
एक तो निजव्यथाव्यथित । बाबांपाशीं लागलें चित्त । नाहीं चालवत ना हालवत । दुखणेंही वाढत गेलें तें ॥६०॥
इकडे बाबांचें कण्हणें कुंथणें । दिवसेंदिवस वाढलें द्विगुणें । हां हां म्हणतां तेंही दुखणें । अनावरपणें हटेना ॥६१॥
म्हणतां म्हणतां जवळ आला । दिवस बाबांनीं जो भाकित केला । बाळा शिंप्यास घाम सुटला । तैसाच पाटिला रामचंद्रा ॥६२॥
म्हणती बाबांचें खरें होतें । ऐसेंच आतां वाटूं लागलें तें । बरनें न कीं हें चिन्ह दिसतें । प्रमाण वाढतेंच दुखण्याचें ॥६३॥
झालें आली शुद्ध दशमी । नाडी वाहूं लागली कमी । तात्या पडला मरणसंभ्रमीं । आप्तेष्ट श्रमी जाहले ॥६४॥
असो पुढें नवल वर्तलें । तात्यांचेंही गंडांतर टळलें । तात्या राहिले बाबाच गेले । जणुं मोबदले केले कीं ॥६५॥
पह आतां बाबांची वाणी । नांव दिधलें तात्याचें लावुनी । केली तयारी निजप्रयाणीं । वेळा न चुकवुनी अणुभर ॥६६॥
नाहीं म्हणावें तरी ही सूचना । देउनी आणिलें भविष्य निदर्शना । गोष्ट घडेपर्यंत ही रचना । दिसली न मना कवणाचे ॥६७॥
जन म्हणती तात्यांचें मरण । निजदेहाचा बदला देऊन । बाबांनीं ऐसें केलें निबारण । तयांचें विंदान त्यां ठावें ॥६८॥
बाबांनीं देह ठेविल्यारातीं । अरुणोदयीं सुप्रभातीं । बाबा स्वप्नांत पंढरपुराप्रती । द्दष्टान्त देती गणुदासा ॥६९॥
“मशीद पडली ढांसळोनी । अवघे शिरडीचे तेली वाणी । त्रासवूनि सोडिलें मजलागुनी । जातों तेथूनि मी आतां ॥७०॥
म्हणोनि आलों येथवरी  । फुलांही मज ‘बख्खळ’ ड्बरी । इच्छा एवढी पुरी करीं । चल झडकरी शिरडींत” ॥७१॥
इतुक्यांत शिरडीहून पत्र जातां । कळली बाबांची समाधिस्थता । ऐकूनि गणुदास निघाले ही वार्ता । क्षण न लागतां शिरडीस ॥७२॥
सर्वें घेऊनि शिष्यपरिवार । येऊनियां समाधीसमोर । मांडिला कीर्तन - भजनगजर । अष्टौप्रहर नामाचा ॥७३॥
हरिनामाचा कुसुमहार । स्वयें गुंफोनि अति मनोहर । प्रेमें चढविला समाधीवर । अन्नसंतर्प्ण समवेत ॥७४॥
ऐकतां नामच गजर अकुंठ । शिरडी गमली भूबैकुंठ । नामघोषाची भरली पेठ । करविली लूट गणुदासीं ॥७५॥
दसर्‍याचीच कां बाबांस प्रीति । कीं तो मुहूर्त साडेतीन मुहूर्तीं । शुभ्रकाळ विशेषें प्रयाणकृत्यीं । हें तों विश्रुत सकळांतें ॥७६॥
हेंही बोअलणें नाहीं र्पमाण । जयास नाहीं गमनागमन । तयास कोठूनि असेल निर्याण । मुहूर्तप्रयोजन काय त्या ॥७७॥
जया न धर्माधर्मबंधन । जाहलें सकल बंधोपशमन । जयाचे प्राणास नाहीं उत्क्रमण । तयासी निर्याण तें काय ॥७८॥
“ब्रम्हौव सन्ब्रम्हाप्येति” । ऐशिया साईमहाराजांप्रती । नाहीं आगती अथवा गती । निर्याण स्थिती कैंची त्यां ॥७९॥
असो उत्तर वा दक्षिणायन । करणेंच नाहीं जया प्रयाण । ठायींच समरसती जयाचे प्राण । दीपनिर्वाणसम काळें ॥८०॥
देह तो आहे उसनवारि । पंचभूतांची सावकारी । निजस्वार्थ साधलियावरी । परतणें माघारीं ज्याचा त्या ॥८१॥
यापुढील होणाराचें सूचक । आधींच बाबांनीं दाविलें कौतुक । निघूनि गेली वेळ अमोलिक । कीर्ति स्थाईक राहिली ॥८२॥
ज्वर आलियाचें निमित्त । लौकिकी रीतीचा अनुकार करीत । कधीं कुंथत, कधीं कण्हत । सदैव सावचित्त अंतरीं ॥८३॥
दिवसा अष्ट घटका भरतां । निर्य़ाणकाळ निकट येतां । उठूनि बैसले ते निजसत्ता । अविकळ चित्तामाझारीं ॥८४॥
पाहोनि बाबांची तईं मुद्रा । भरती आली आशासमुद्रा । कीं ती वेळा भयंकर अभद्रा । टळली समग्रां वाटलें ॥८५॥
असो यापरी करीत खंत । सर्व बैसले असतां सचिंत । पातला बाबांचा निकट अंत । घडल वृत्तांत परिसा तो ॥८६॥
क्षणैक अवकाश प्राणोत्क्रमणाला । नकळे काय आलें मनाला । हस्त कफनीचे खिशांत घातला । ती धर्मवेळा जाणोनि ॥८७॥
लक्ष्मी नामें सुलक्षणी । नामासारिखी जिची करणी । नित्य निरत जी साईचरणीं । ती सन्निधानीं तैं होती ॥८८॥
तिजला कांहीं द्रव्यदान । बाब करीत अति सावधान । क्षणांत होणार देहावसान । चुकले कळून बाबंना ॥८९॥
हीच लक्ष्मीबाई शिंदे । बबांपाशीं मशिदीमध्यें । अक्षयी कामकाजासंबंधें । नेमनिर्बंधें वर्ततसे ॥९०॥
दिवसा नित्य हे परिपाटी । दरबार खुला सर्वांसाठीं । बहुश: कोणा न आडकाठी । मर्यादा मोठी रात्रीची ॥९१॥
सायंकाळची फेरी जैं सरते । तेथूनि मंडळी घरोघर परते । ती जंव दुसरे दिवशीं उजाडतें । तेव्हांच येते मशीदीं ॥९२॥
परी भगत म्हाळसापती । दादा लक्ष्मी यांची भक्ती । पाहूनि तयांस रात्रीच्याही वक्तीं । मनाई नव्हती बाबांची ॥९३॥
हीच लक्ष्मी अतिप्रीतीं । प्रत्यहीं पाठवी बाबांप्रती । भाजी भाकर वेळेवरती । सेवा ही किती वानावी ॥९४॥
या भाकरीचा इतिहास परिसतां । कळूं सरेल बाबांची दयार्द्रता । श्वानसूकरीं बाबांची ऐक्यता । आश्चर्य चित्ता होईल ॥९५॥
बाबा एकदां सायंकाळीं । भिंतीस टेकून वक्ष:स्थळीं । वार्ता चालतां प्रेमसमेळीं । लक्ष्मी आली ते स्थानीं ॥९६॥
तात्या पाटील जवळ होते । आणीक वरकड असतां तेथें । लक्ष्मीनें अभिवंदिलें बाबांतें । बाबा तियेतें तंव वदती ॥९७॥
“लक्ष्मी लागलीसे भूक मातें” । बाबा मी भाकर घेऊनि येतें । निघालें ही आतां आणितें । ऐसीच जातें माघारीं ॥९८॥
ऐसें म्हणूनि विघूनि गेली । भाकर्‍या भाजूनि घेऊनि परतली । कोरडयासमवेत अविलंबें आली । सन्मुख ठेविली ती न्याहारी ॥९९॥
बाबांनीं तें पान उचलिलें । कुत्र्यासमोर तैसेंच मांडिलें । बाबा हें काय आपण केलें । लक्ष्मीनें पुसिलें तात्काळ ॥१००॥
मी जी इतुकी गेलें सत्वरी । हातोहातीं भाजिल्या भाकरी । तयांची ही काय नवलपरी । श्वानाची खरी धन केली ॥१०१॥
लागली होती तुम्हांस भूक । त्या भुकेचें हें काय कौतुक । वदनीं सुदिला न एकही कुटक । लाविली चुटक मज ॥१०२॥
मग बाबा तियेस वदती । “व्यर्थ कशाची करितेस खंटी । या कुत्र्याची जे उदरपूर्ती । माझीच तृप्ति ती जाण ॥१०३॥
या श्वानाचा जीव नाहीं का । प्राणिमात्राच्या एकच भुका । जरी तो मुका आणि मी बोलका । मेद असे का भुकेंत ॥१०४॥
क्षुधेनें व्याकूळ जयाचे प्राण । तयांस देती जे अन्नावदान । माझिया मुखींच तें सूदिलें जाण । सर्वत्र प्रमाण मानीं हें” ॥१०५॥
प्रसंग सोपा व्यवहाराचा । बोध अवघा परमार्थाचा । ऐसी उपदेशपर साईंची वाचा । प्रेमरसाचा परिपाक ॥१०६॥
बोलूनि सोपी प्रपंचभाषा । आंखीत परमार्थरूपरेषा । न काढितां कोणाच्या वर्मा दोषा । शिष्यसंतोषा राखीत ॥१०७॥
तेथूनियां उपदेशानुसार । सुरू झाली लक्ष्मीची भाकर । करूनि ठेवी दुग्धांत कुस्कर । प्रेमपुस्सर प्रत्यहीं ॥१०८॥
पुढें बाबाही भक्तिप्रेमें । भाकर ती खाऊं लागले नियमें । वेळीं होतां विलंब न करमे । जेवण न गमे बाबांस ॥१०९॥
होतां लक्ष्मीच्या भाकरीस वेळ । जरी पात्रें तैं वाढिलीं सकळ । जेवावयाचा टळेना काळ । मुखीं न कवळ घालीत ॥११०॥
निवून जाईल पात्रींचें अन्न । भुकेनें बसतील खोळंबून । परी लक्ष्मीची भाकर आलियावीण । अन्नसेवन होईना ॥१११॥
पुढें कांहीं दिव्सवरी । बाबांनीं प्रत्यहीं तिसरे प्रहरीं । शेवया मागवाव्या लक्ष्मीच्या करीं । सेवाव्या शेजारीं बैसून ॥११२॥
बाबा सेवीत अति परिमित । शेष राधाकृष्णेस देत । याच लक्ष्मीचे हस्तें देववीत । उच्छिष्टप्रीत बहु तिजला ॥११३॥
असतां चालली देहविसर्जनवार्ता । ही भाकरीची भाकडकथा । किमर्थ ऐसें न म्हणिजे श्रोतां । साईव्यापकतानिदर्शक हे ॥११४॥
हें सकल द्दश्य चराचर । याच्याही पैल परात्पर । साई भरलासे निरंतर । जो अज अमर तो साई ॥११५॥
हें एक तत्त्व या कथेच्या पोटीं । ऐसी ही गोड लक्ष्मीची गोठी । सहज स्मरली उठाउठी । श्रोतयांसाठींच मी मानीं ॥११६॥
असो ऐसी लक्ष्मीची सेवा । कैसा विसर साईंस व्हावा सावधानाचा काय नवलावा । वृत्तांत परिसावा सादरता ॥११७॥
जरी आला कंठीं प्राण । शरीर विगलित नाहीं त्राण । बबा निजहस्तें करिती दान । देहावसानसमयीं तिस ॥११८॥
एकदां पांच एकदां चार । रुपये खिशांतूनि काढूनि बाहेर । ठेवीत तियेचे हातांवर । तीच कीं अखेर बाबांची ॥११९॥
कीं ही नवविधा - भक्तीची खूण । किंवा नवरात्र - अंबिकापूजन । झालें आज आहे शिलंगण । सीमोल्लंघन - दक्षिणा ही ॥१२०॥
किंवा श्रीमद्भागवतीं । श्रीकृष्णें कथिली उद्धवाप्रती । ती नवलक्षण शिष्यस्थिती । तियेची स्मृती देत बाबा ॥१२१॥
एकादशाच्या दशमाध्यायीं । षष्ठ्मश्लोकाची पहा नवलाई । शिष्यें कैसी करावी कमाई । कवण्या उपायीं वर्तावें ॥१२२॥
आधीं पूर्वार्धीं कथिलीं पांच । उत्तरार्धीं चारचि साच । बाबाही धरिती क्रम असाच । वाटे जणूं हाच हेतु पोटीं ॥१२३॥
अमानीं दक्ष निर्मत्सर । शिष्य निर्मम गुरुसेवापर । असावा परमार्थजिज्ञासातत्पर । निश्चल अंतर जयाचें ॥१२४॥
जया ठावी नाहीं असूया । वाचाविग्लापन करी न वायां । इंहीं लक्षणीं । निजगुरुराया । संतोषवाया झटावें ॥१२५॥
हाच श्रीसाईनाथांचा हेत । ऐसिया रूपीं व्यक्त करीत । केवळ स्वकीय भक्तहितार्थ । करुणावंत संत सदा ॥१२६॥
लक्ष्मी खाऊनि पिऊनि सधन । नवांची कथा काय तिजलागून । तीही तितुके टाकील ओवाळून । तथापि तें दान अपूर्व तिस ॥१२७॥
परम थोर भाग्यें आगळी । तेणेंच ऐशिया कृपेची नवाळी । पावती झाली नवरत्नावली । निजकरकमळीं साईंच्या ॥१२८॥
गेले जातील कितीसे नव । परी हें दान अति अभिनव । कीं जों तिचा जीवांत जीव । देईल कीं आठव साईंची ॥१२९॥
आलें सन्निध देहावसान । तरीही राखूनि अनुसंधान । चारापांचाची सांगड घालून । आमरण स्मरण दिधलें तिस ॥१३०॥
ऐसा दावोनि सावधपणा । निकटवर्ती पाठविले भोजना । मात्र ग्रामस्थांतील एका दोघांना । बैसवितांना देखिलें ॥१३१॥
परी कांहीं प्रेमळ भक्तांनीं । हट्टचि धरिला कित्येकांनीं । जाऊं नये बाबांपासुनी । वेळ ती कठिण मानुनी ॥१३२॥
परी प्रसंगीं अंतसमयीं । पडेन काय मोहाचे अपायीं । म्हणोनियां जणूं घाईघाई । अवघियांही दवडिलें ॥१३३॥
निर्याणसमय निकट अति । जानोनि बुट्टी - काकादिकांप्रती । बाबा वाडियांत जा जा म्हणती । भोजनांतीं मग यावें ॥१३४॥
पाहोनि इतरांची ही व्यग्रता । बाबा दुश्चित्त निजचित्ता । जा जा जेवूनि या जा आतां । ऐसें समस्तां आज्ञापिती ॥१३५॥
ऐसें हें नित्याचें सांगती । सखे अहर्निस निकटवर्ती । जरी मनाची दुश्चित्तवृत्ति । आज्ञेनें उठती जावया ॥१३६॥
आज्ञा तरी नुल्लंगवे । वेळीं सान्निध्यही न त्यागवे । बाबांचें मनही न मोडवे । गेले वाडिया भोजन ॥१३७॥
भयंकर दुखण्याचेम प्रमण । कैचें जेवन कैचें खाण । बाबांपाशीं गुंतले प्राण । विस्मरण क्षण साहेना ॥१३८॥
असो जाऊनि जेवूं बैसले । इतुक्यांत मागूनि बोलावूं आले । अर्धपोटींच धांवत आले । तंव ते अंतरले भेटीला ॥१३९॥
आयुर्दायस्नेह सरतां । प्राणज्योती मंद होतां । बयाजीचे अंकावरता । देह विश्रामता पावला ॥१४०॥
नाहीं पडून वा निजून । स्वस्थपणें गादीसी बैसून । ऐसा स्वहस्तें धर्म करून । केलें विसर्जन देहाचें ॥१४१॥
समर्थांचें मनोगत । न होतां कोणासही अवगत । देह विसर्जिला हातोहात । ब्रम्हीभूत जाहले ॥१४२॥
घेऊनि देहमायोचि बुंथी । संत सृष्टीमाजी अवतरती । होतां उद्धार - कार्यपूर्ती । तात्काळ समरसती अव्यक्तीं ॥१४३॥
नट धरितो वेष नाना । अंतरीं पूर्ण जाणे आपणा । तया अवतारिया परिपूर्णा । सांकडें मरणाचें तें काय ॥१४४॥
लोकसंग्रहार्थ जो अवतरला । कार्य संपतां अवतार संपविला । तो काय जन्म - मरणाचा अंकिला । विग्रह स्वलीला धरितो जो ॥१४५॥
परब्रम्हा ज्याचें वैभव । तया कैंचा निधनसंभव । निर्ममत्व जयाचा अनुभव । कैंचा भवाभव त्या बाधी ॥१४६॥
दिसला जरी कर्मीं प्रवृत्त । कधीं न कर्में केलीं यत्किंचित । सदा कर्मीं अकर्म देखत । अहंकाररहितत्वें ॥१४७॥
“नाभुक्तं क्षीयते कर्म । हें तों स्मृत्युक्त कर्माचें वर्म । परी ब्रम्हाज्ञात्याचा न संभ्रम । देखे जो ब्रम्हाचि वस्तुमात्रीं ॥१४८॥
क्रियाकारक फलजात । हें तों अवघें प्रसिद्ध द्वैत । तेंही ब्रम्हाविद मानित । जेवीं कां रजत शुक्तिकेवरी ॥१४९॥
बाबांसारखी मायाळू जननी । पडली कैसी काळाचे वदनीं । दिवसा ग्रासी अंधारी रजनी । तैसीच ही कहाणी झाली कीं ॥१५०॥
आतां हा अध्याय संपवूं येथें । राखूं मासिक मर्यादेतें । अति विस्तारें दुश्चित्ततेतें । नातरी श्रोते पावतील ॥१५१॥
पुढील अवशेष निर्याणकथा । येईल यथाक्रम पुढें परिसतां । शरण हेमाड साईसमर्था । पावला कृतार्था यत्कृपें ॥१५२॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । श्रीसाईनाथनिर्याणं नाम द्विचत्वारिंशोत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥
 
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥