२९ सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध, हे श्राद्ध कोणासाठी आणि कधी केलं जातं?
पितृपक्षात ज्या दिवशी अपराह्ण काळात (दुपारच्या वेळी) भरणी नक्षत्र असते, त्या दिवशी हा विधी केला जातो. मृत्यूचे देवता यमराज हे भरणी नक्षत्राचे अधिपती मानले जातात. या नक्षत्रावर पितरांचे श्राद्ध केल्यास यमराजांची कृपा लाभते आणि पितरांना शांती मिळते.
भरणी श्राद्ध हे पितृपक्षामध्ये (महालय पक्षात) भाद्रपद किंवा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात जेव्हा 'भरणी नक्षत्र' असते, त्या दिवशी केले जाते. या वर्षी (२०२६ मध्ये) महा भरणी श्राद्ध २९ सप्टेंबर २०२६, मंगळवार रोजी आहे.
महत्त्व आणि फळ
गया श्राद्धासमान पुण्य: शास्त्रात असे सांगितले आहे की, भरणी नक्षत्रावर केलेले श्राद्ध हे थेट पवित्र गया क्षेत्र (बिहार) येथे जाऊन केलेल्या पिंडदानाइतकेच पुण्यकारक व फलदायी ठरते.
तीर्थयात्रेचे फळ: ज्या व्यक्तींच्या हयातीतू गया, पुष्कर किंवा अन्य प्रमुख तीर्थक्षेत्रांची यात्रा घडलेली नसते, त्यांना त्या तीर्थक्षेत्रांवरील श्राद्धाचे फळ मिळावे म्हणून हे श्राद्ध केले जाते.
आत्म्याची मुक्ती: हे श्राद्ध केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती लाभते आणि प्रेतयोनीतून किंवा भवसागरातून मुक्त होण्यास मदत होते.
कधी केले जाते?
हे श्राद्ध सामान्यतः पितृपक्षातील चतुर्थी किंवा पंचमी तिथीला (भरणी नक्षत्रयुक्त दुपारी) येते.
काही रूढीनुसार हे मृत्यूनंतर पहिल्या वर्षश्राद्धानंतर केले जाते, तर धर्मसिंधू ग्रंथाच्या आधारे काही लोकांमध्ये दरवर्षी हे पाळण्याची पद्धत आहे.
धर्मशास्त्रानुसार, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर पहिले वर्षश्राद्ध (वरशी) पूर्ण झाल्यावर येणाऱ्या पहिल्या पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर हे श्राद्ध आवर्जून करावे. मृत्यूच्या पहिल्याच वर्षात (वर्षश्राद्धापूर्वी) येणाऱ्या पितृपक्षात भरणी श्राद्ध केले जात नाही.
किती वेळा करावे?
काही परंपरेनुसार हे श्राद्ध वर्षश्राद्धानंतर एकदाच करण्याची पद्धत आहे, तर धर्मसिंधू ग्रंथानुसार ते दरवर्षी पितृपक्षात भरणी नक्षत्रावर केले तरी चालते, ज्यामुळे पितरांना गती मिळते
हे श्राद्ध कोणासाठी केलं जातं?
नुकत्याच दिवंगत झालेल्या व्यक्तींसाठी: कुटुंबातील ज्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे आणि तिचे पहिले वर्षश्राद्ध पूर्ण झाले आहे, त्या व्यक्तीच्या आत्म्याला प्रेतत्वातून मुक्ती मिळून पितृलोकात स्थान मिळावे यासाठी प्रामुख्याने हे श्राद्ध केले जाते.
सर्व पितरांसाठी: भरणी नक्षत्राचा स्वामी हा मृत्यूचा देव प्रत्यक्ष यमराज आहे. त्यामुळे या नक्षत्रावर केलेले श्राद्ध थेट पितरांपर्यंत पोहोचते. कुटुंबातील ज्ञात-अज्ञात, पूर्वज किंवा ज्यांची पुण्यतिथी (तिथी) माहीत नाही, अशा सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्याच्या शांतीसाठी हे श्राद्ध केले जाते.
यामध्ये स्त्री किंवा पुरुष असा कोणताही भेद नाही; घरातील दिवंगत पुरुष आणि स्त्री या दोघांसाठीही भरणी श्राद्ध केले जाऊ शकते.
भरणी श्राद्धाचे महत्त्व
शास्त्रात भरणी श्राद्धाला 'महा भरणी श्राद्ध' असे म्हटले गेले आहे. या दिवशी श्राद्ध किंवा पिंडदान केल्याने गया (बिहार) या तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्ध केल्यासारखेच महापुण्य आणि फळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या विधीमुळे पितृदोष दूर होऊन घरात सुख-समृद्धी लाभते.

