गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Updated : शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (12:51 IST)

Shaniwar Marutichi Kahani कहाणी शनिवारची मारूतीची

shanivar maruthi katha
एक नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहात होता. त्याला एक मुलगा - सून होती. मुलगा प्रवासाला गेला होता. ब्रह्मण व त्याची बायको दररोज देवळात जात होते. सून घरात स्वयंपाक करून ठेवायची. सासूसार्‍यांना आल्यावर वाढायची व उरलंसुरलं स्वत: खात होती. असं होतां होतां श्रावण मास आला आणि संपत शनिवार आला.
 
त्या दिवशी त्यांच्या घरी एक मुलगा आला. बाई बाई, मला न्हाऊं घाल, माखू घाल. सून बाई म्हणाली, बाबा घरामध्ये तेल नाही. तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्या पुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल. जेवू घाल माखू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेवू घालतं, उरलं, सुरलं आपण खाल्ल. असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला.
 
इकडे घराचा वाडा झाला. गोठभर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी बटकींनी घर भरलं! सासूसासरे देवाहून आले, तर घर काही ओळखेना. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढं आली. मामांजी, सासूबाई इकडे या! अंग, तू कोणाच्या घरात राहिली आहेस?
 
तिनं सर्व हकीकत सांगितली. शनिवारी एक मुलगा आला, बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशानं घालू? माझ्यापुरतं घागरीत तेल असेल, थोडं शेंडीला, लावून न्हाऊ घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं. त्याला न्हाऊ घातलं. जेवू घातलं. उरलंसुरलं आपण खाल्लं असे चार शनिवार झाले. चवथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जातेवेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले. असं म्हणून त्यांची आरती केली. सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारूती प्रसन्न झाला, तसा तु्हां आम्हां होवो.