1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 जुलै 2021 (12:07 IST)

कहाणी धरित्रीची

Shravan Katha Kahani Dritrichi in Marathi
ऐका परमेश्वरा, धरित्रीमाये, तुमची कहाणी.
 
आटपाट नगर होतं. नगरांत एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी? धरित्री मायेचं चिंतन करी. वंदन करी. ‘धरित्रीमाये, तूंच थोर, तूच समर्थ, कांकणलेल्या लेकी दे. मुसळकांड्या दासी दे. नारायणासारखे पांच पुत्र दे. दोघी कन्या दे. कुसुंबीच्या फुलासारखे स्थळ दे.
 
हा वसा कधीं घ्यावा? आखाड्या दशमीस घ्यावा, कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतीयेला घ्यावा, माघी तृतीयेला संपूर्ण करावा. सहा रेघांचा चंद्र काढावा, सहा रेघांचा सूर्य काढावा, सहा गाईचीं पावलं काढावीं व त्यांची रोज पूजा करावी. संपूर्णाला काय करावं? वाढाघरची सून जेवू सांगावी. कोरा करा, पांढरा दोरा, चोळीपोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं.
 
ही धरित्रीमायेची कहाणी, साठां उत्तरांची पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.