शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: पॅरिस , शुक्रवार, 9 जून 2017 (12:59 IST)

बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीला फ्रेंच ओपनचे विजेतेपद

फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीत  भारताच्या रोहण बोपन्नाने गुरुवारी कॅनडाची त्याची सहकारी ग्रॅब्रियला डाब्रोवस्कीच्या साथीने अजिंक्यपद पटकावताना कारकीर्दीत प्रथमच ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले. ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला.
 
बोपन्ना व डाब्रोवस्की या सातव्या मानांकित जोडीने अंतिम फेरीत शानदार पुनरागमन केले. त्यांनी दोन मॅच पॉर्इंटचा बचाव करताना जर्मनीच्या अन्ना लेना गोरेनफिल्ड व कोलंबियाच्या रॉबर्ट फराह या जोडीची झुंज २-६, ६-२, १२-१० ने मोडून काढली.
 
भारत व कॅनडा यांची जोडी एकवेळ दोन गुणांनी पिछाडीवर होती, पण गोरेनफिल्ड व फराह यांनी संधी गमावली. बोपन्ना व डाब्रोवस्की यांनी पूर्ण लाभ घेतला आणि दोन मॅच पॉर्इंट मिळवले. जर्मनीच्या खेळाडूने दुहेरी चूक करताच बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीचे जेतेपद निश्चित झाले.
 
बोपन्नाने कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याने २०१० मध्ये पाकिस्तानच्या ऐसाम-उल-हकच्या साथीने यूएस ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्यावेळी त्याला अंतिम लढतीत ब्रायन बंधूंच्या आव्हानाला सामोरे जावे लागले होते.
 
पहिला सेट गमावणाऱ्या बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीने दुसऱ्या सेटममध्ये सरशी साधत १-१ अशी बरोबरी केली. निर्णायक सेटमध्ये बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीने ३-० अशी अघाडी घेतली होती. त्यानंतर सलग पाच गुण गमावल्यामुळे ही जोडी ३-५ ने पिछाडीवर पडली. त्यानंतर त्यांनी ५-५ अशी बरोबरी साधली. सामन्याचे पारडे अखेरपर्यंत दोलायमान असलेल्या या लढतीत शेवटी बोपन्ना-डाब्रोवस्की जोडीने सरशी साधली.