भारतीय टेनिस स्टार सुमित नागल पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला
ऑलिम्पिक 2024 फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. यावेळी जास्तीत जास्त पदके जिंकण्याकडे भारताचे लक्ष आहे. या मोठ्या कार्यक्रमापूर्वी भारतीय टेनिस स्टार सुमित नागल याने आपल्या चाहत्यांना मोठी बातमी दिली आहे. आगामी पॅरिस ऑलिम्पिकमधील पुरुष एकेरीसाठी अधिकृतपणे पात्र ठरल्याची पुष्टी सुमित नागलने केली आहे.
सुमित नागल दुसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. याआधी तो 2020च्या टोकियो गेम्ससाठी पात्र ठरला होता. त्याने टोकियोमध्ये दुसरी फेरी गाठली. नागलने इंस्टाग्रामवर पोस्ट केले, “मी 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी अधिकृतपणे पात्र ठरलो हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. माझ्यासाठी हा संस्मरणीय क्षण आहे कारण ऑलिम्पिकचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे माझे ध्येय होते. ऑलिम्पिकमध्ये माझी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे.
26 वर्षीय सुमित नागलसाठी 2024 चा हंगाम चांगला राहिला आहे. त्याने चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळवले.
नागलने या महिन्याच्या सुरुवातीला हेलब्रॉन चॅलेंजर जिंकून पात्रतेच्या संधी वाढवल्या होत्या कारण त्याने एटीपी एकेरी क्रमवारीत अव्वल 80 मध्ये प्रवेश केला होता. हेलब्रॉन जिंकणे हे नागलचे या मोसमातील दुसरे चॅलेंजर विजेतेपद आहे.
ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) ने सांगितले की 10 जून रोजी आयटीएफनुसार पात्रतेसाठी खेळाडूंच्या क्रमवारीचा विचार केला गेला तेव्हा नागल पर्यायी खेळाडूंच्या यादीत होता. रोहन बोपण्णा आणि एन श्रीराम बालाजी पॅरिस गेम्समध्ये पुरुष दुहेरी स्पर्धेत भाग घेणार आहेत.
Edited by - Priya Dixit