शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 16 जानेवारी 2023 (19:00 IST)

सानिया मिर्झा- टेनिस सुपरस्टार जिने रुढीपरंपरांना मोडत रचला इतिहास

sania
Author,शारदा उगरा
शुक्रवारी (13 जानेवारी) टेनिसपटू सानिया मिर्झाने भावुक पोस्ट लिहून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचं स्पष्ट केलं.
 
सानियाने लिहिलं, 'डोळ्यात अश्रू आहेत आणि मनात प्रेम भरुन आलंय.'
 
येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचा डबल्सचा ड्रॉ जाहीर होईल. सानिया महिला दुहेरीत कझाकिस्तानच्या अनाना डानिलिनाच्या बरोबरीने, तर मिश्र दुहेरीत ती भारताच्याच रोहन बोपण्णाच्या साथीने खेळणार आहे.
 
गेल्या वर्षी जानेवारीत सानियाने 2022 वर्ष खेळाडू म्हणून शेवटचं वर्ष असेल असं म्हटलं होतं पण स्नायूपेशींना झालेल्या दुखापतीमुळे सानियाला अमेरिकन ओपन स्पर्धेत सहभागी होता आलं नव्हतं.
 
यामुळे सानियाची निवृत्ती काही महिने लांबणीवर पडली. सानियाने ऑस्ट्रेलियन ओपननंतर निवृत्त होण्याचं जाहीर केलं आहे. पहिली ग्रँड स्लॅम खेळल्यानंतर 18 वर्षानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या माध्यमातून मी निवृत्त होणार आहे असं सानियाने सांगितलं.
 
ऑस्ट्रेलियन ओपननंतर सानिया 19 ते 15 फेब्रुवारीदरम्यान दुबई ड्युटी फ्री स्पर्धेतही खेळणार आहे. मेलबर्न आणि दुबई ही आंतरराष्ट्रीय टेनिसची दोन मोठी केंद्र आहेत. गेल्या तीन दशकभराच्या काळात सानियाच्या कारकीर्दीतीलही ही प्रमुख शहरं आहेत.
 
सानियाला आपण सगळ्यांनी 18 वर्षांपूर्वी मेलबर्नमध्ये पाहिलं तेव्हा ती 18 वर्षांची होती आणि आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये स्वत:ची जागा निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न होता. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सेरेना विल्यम्ससारख्या मातब्बर खेळाडूला ती खणखणीत फटक्याद्वारे उत्तर देत होती.
 
सानियाची कमाल
तेव्हाही तिचा खेळ पाहताना हे जाणवलं की कोणत्याही भारतीय महिला खेळाडूंच्या तुलनेत फोरहँडचा फटका जास्त आक्रमक होता.
 
इस्लामोफोबियाच्या त्या काळात या युवा मुस्लीम खेळाडूला तिची ताकद काय हे माहिती होतं. टेनिस कोर्टवर खेळताना काय परिधान करायचं हेही तिला कळत होतं.
 
शॉर्ट स्कर्ट आणि बोल्ड संदेश लिहिलेले टीशर्ट यांनी कट्टरतावाद्यांना अस्वस्थ केलं. सानिया आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस खेळत होती.
 
विजय अमृतराज (सर्वाधिक रँकिंग 18), रमेश कृष्णन (सर्वाधिक रँकिंग 23) यांच्यानंतर सर्वोच्च रँकिंग गाठण्याचा पराक्रम सानियाने केला होता.
 
रमेश कृष्णन यांच्यानंतर 22 वर्षांनंतर सानियाने जागतिक क्रमवारीत अव्वल 30 खेळाडूंमध्ये स्थान पटकावलं. या विक्रमाला 16 वर्ष झाली आहेत आणि सानिया अजूनही खेळते आहे.
 
27 ऑगस्ट 2007 मध्ये सानिया जागतिक क्रमवारीत 27व्या स्थानी होती. तिने हैदराबाद इथे आयोजित डब्ल्यूटीए स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडकही मारली होती.
 
पुढची चार वर्ष सानिया जागतिक क्रमवारीत अव्वल 35 खेळाडूंमध्ये होती. पुढची चार वर्ष सानिया जगातल्या सर्वोत्तम 100 खेळाडूंमध्ये तिच्या नावाचा समावेश होता. पण पायाचा घोटा आणि मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे तिच्या सिंगल्सच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला. पण याने खचून न जाता सानियाने दुहेरी प्रकारावर लक्ष केंद्रित केलं.
 
पटकावली अनेक जेतेपदं
 
डबल्स प्रकारात सानियाने डब्ल्यूटीए स्पर्धेची 43 जेतेपदं पटकावली. 2015 मध्ये सानियाने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली. सानियाने सहावेळा ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा केला.
 
सानियाने तीन ग्रँड स्लॅम जेतेपदं मिक्स्ड डबल्स प्रकारात पटकावलं. मार्टिना हिंगिसच्या साथीने तिने विम्बल्डन, अमेरिकन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.
 
43 डब्ल्यूटीए स्पर्धेच्या जेतेपदांच्या बरोबरीने सानियाने 23वेळा डब्ल्यूटीए डबल्सच्या अंतिम फेरीत धडक मारली. 2022 मध्ये सानिया चेक प्रजासत्ताकच्या लुसी हार्डेकाच्या बरोबरीने क्ले कोर्टवर दोन डब्ल्यूटीए स्पर्धेत खेळली.
 
सानिया कारकीर्दीतला शेवटचा सामना दुबईत खेळणार आहे, जिथे ती पती आणि मुलासह राहते. मेलबर्न ते दुबई हा प्रवास वरकरणी सरळसोट दिसत असला तर सानियाच्या व्यक्तिमत्वाशी परस्पर विपरीत ठरला आहे. कारण कारकीर्दीत अनेकदा सानियाने सातत्याने वादविवादांचा सामना केला आहे.
 
भारतीय टेनिसची पहिली सुपरस्टार
 
सानियाला 'भारतीय महिला टेनिस सुपरस्टार' असं म्हटलं जातं. पण वास्तव हे आहे की सायना नेहवालच्या बरोबरीने सानिया मिर्झा या दोघी महिला सुपरस्टार आहेत. पण टेनिस अधिक देशांमध्ये खेळला जाणारा आणि ग्लॅमरमय खेळ असल्याने सायनाच्या तुलनेत सानियाच्या लोकप्रियतेत वाढ झाली.
 
दोन दशकांपूर्वी सानिया तत्कालीन भारतीय महिला खेळाडूंच्या तुलनेत वेगळी होती. तिला संकोच नव्हता, ती घाबरायची नाही. नव्या सहस्रकाच्या नव्या पिढीची ती शिलेदार होती. तिच्यात प्रचंड आत्मविश्वास होता. आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडणं ही तिची खासियत होती. ती बिनधास्त आणि बेडरपणे बोलायची.
 
2005 मध्ये इंडिया टुडे मासिकाने पहिल्यांदा तिची मुलाखत घेतली होती.
 
त्यावेळी ती म्हणाली होती, "काही माणसं म्हणतात की मुस्लीम मुलींनी मिनी स्कर्ट परिधान करायला नको. दुसरीकडे काही लोक म्हणतात की तुम्ही मुस्लीम समाजासाठी अभिमानास्पद आहे. मला आशा आहे की आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात अल्लाह मला माफ करेल. आपल्याला कारकीर्दीत जे करायचं असतं ते करावंच लागतं".
 
सानिया जे बोलली ते तिने सलग दोन दशकं केलं. सानियाचे फोरहँडचे वेगवान फटके टेनिस चाहत्यांच्या प्रदीर्घ काळ स्मरणात राहतील.
 
वादविवादांच्या भोवऱ्यात
 
भारतीय टेनिसच्या इतिहासात सानियाने खेळलेले अविस्मरणीय फटके कायमस्वरुपी आनंद देत राहतील. सानिया मिर्झाला आपण सोसायटी सारख्या मासिकाच्या मुखपृष्ठावरही पाहिलं. कारण टेनिस खेळण्याच्या बरोबरीने ती सुपर सेलिब्रेटीही आहे.
 
पण सानिया ज्या गुणवैशिष्ट्यासाठी ओळखली जाते हे तिच्या निवृत्तीच्या भावुक पोस्टमध्ये जाणवतं. शुक्रवारी (13 जानेवारी) लिहिलेल्या भावनिक पोस्टमध्ये सानियाने त्याचा उल्लेख केला आहे.
 
सानिया जेव्हा सहा वर्षांची होती तेव्हा ती हैदराबादच्या निझाम क्लब कोर्टच्या प्रशिक्षकांशी भांडली होती. टेनिसची कौशल्यं शिकण्यासाठी तिचं वय लहान आहे, असं प्रशिक्षकांचं म्हणणं होतं.
 
टेनिस कोर्टवर खेळताना सानिया वेगळीच भासते. मुकाबला कडवा होतो, प्रतिस्पर्ध्यांशी असलेला स्कोअरचा फरक कमी होतो, दबाव वाढतो तेव्हा सानिया आपले केस बांधते. पुढचा पॉइंट पटकावण्यासाठी तय्यार होते.
 
टेनिसकोर्टच्या बाहेर सानियाला अनेकदा कसं वावरायचं हे सांगितलं जातं. तिला विनाकारण वादविवादांचा सामना करायला लागला. रुढीवादी कर्मठ परंपरावाद्यांशी टक्कर देताना एक वेळ अशी होती की जेव्हा तिच्याभोवती सुरक्षारक्षकांचा गराडा असे. पण याने सानिया मागे हटली नाही आणि ती थांबलीही नाही.
 
त्यामुळेच सानिया जेव्हा शेवटची मॅच खेळायला उतरेल तेव्हा तिला सर्वाधिक अभिवादन आणि पाठिंबा मिळेल. कारकीर्दीदरम्यान ज्या महिला खेळाडूंनी, पुरुष खेळाडूंनी, चाहत्यांनी सानियाला खेळताना, संघर्ष करताना पाहिलं तर त्यांच्यासाठी सानियाने भारतीय खेळांच्या इतिहासातला जणू एक अध्यायच लिहिला.

Published By -Smita Joshi