रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By मनोज पोलादे|

अमोल पालेकर

मध्यमवर्गाचा नायक ते कलात्मक दिग्दर्शक

जन्म- 24 नोव्हेंबर,1944
मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करणारा कलावंत ते संवेदनशील दिग्दर्शक असा अमोल पालेकर यांचा प्रवास आहे. सत्तरच्या दशकांत आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना रिझवले. सत्तरच्या दशकात एकीकडे अमिताभ बच्चन यांच्या रूपाने अॅंग्री यंग मॅन उभा रहात होता. त्याचवेळी देशात मध्यमवर्गही वेगाने वाढत होता. या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारा नायक नव्हता. अमोल पालेकर यांनी ही गॅप भरून काढली.
पालेकर यांचा नायक थोडासा बावळट, घाबरट परंतु, सरळ- साधा व मनाने निरागस होता. तेव्हाच्या मध्यमवर्गीय तरूणांना पालेकर यांच्या पात्रात कोठेतरी आपण फिट बसत असल्याचे जाणवत असे. त्यातूनच आलेले त्यांचे चित्रपट गाजले. गोलमाल, रंगबिरंगी, नरम गरम, बातो बातो मे, चितचोर, दामाद, घरौंदा, छोटी सी बात, मेरी बिबी की शादी, खामोश हे त्यांचे काही चित्रपट. गोलमाल हा त्यांचा अविस्मरणीय विनोदी चित्रपट आहे. घरौंदामध्ये मुंबईत घर घेऊन लग्न करणार्‍या जोडप्याची कथा आहे. हे चित्रपट मध्यमवर्गाला अपील करणारे ठरले.
हलके फुलके किस्से, छोटे - छोटे प्रसंग यातून विनोदाच्या निर्मितीसोबतच अनेक प्रश्न व परिस्थितीवर मार्मिक टिप्पणी करित त्यांचे चित्रपट खुमासदार मनोरंजन करायचे. अमोल पालेकरांचा एक ब्रँड तयार झाला होता. उत्कृष्ठ संगीत व गीते यामुळे त्यांचे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात रूंजी घालतात.
नायक म्हणून वेगळा ट्रेंड सेट केल्यानंतर परिपक्व वयात त्यांनी आपला मोर्चा दिग्दर्शनाकडे वळविला. वेगळे विषय मांडणे ही त्यांची खासीयत. म्हणूनच अनेक वर्षांपासून वाचलेली व मनात राहिलेली व्यंकटेश माडगूळकरांची बनगरवाडी ही कादंबरी त्यांनी पडद्यावर आणली. तिचे खूप कौतुक झाले. कुटुंबनियोजनात मोलाचे कार्य करणार्‍या व उपेक्षित राहिलेल्या र. धो. कर्वेंच्या जीवनावर काढलेला ध्यासपर्व हा चित्रपटही समीक्षक व अभिजात प्रेक्षकांची कौतुकाची पावती मिळविणारा ठरला. जीए. कुलकर्णींच्या कथेवर आधारीत कैरी हा चित्रपटही हटके होता. पहेली, दायरा, अनाहत, आक्रीत हे त्यांचे इतर चित्रपट. नियोगाचा विषय घेऊन काढलेला अनाहतही चर्चेचा ठरला. स्त्रियांच्या भावनांच्या अभिव्यक्तीला शेवटी बंडखोरीचे रूप देणारी नायिका त्यांनी यात रंगवली. धाडसी विषय घेवून अभ्यासपूर्ण मांडणी करणे यात त्यांचा हातखंडा आहे. विषयाची संयत, संवेदनशील मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य. म्हणूनच मध्यंतरी केलेल्या एका पाहणीत सर्वोत्कृष्ट दहा दिग्दर्शकात त्यांचा समावेश करण्यात आला होता.

अमोल पालेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट- अक्स, गोलमाल, रंगबिरंगी, नरम गरम, बातो बातो मे, चितचोर, दामाद, घरोंदा, छोटी सी बाते, मेरी बिबी की शादी, खामोश.

अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट- बनगरवाडी, कैरी, ध्यासपर्व, अनाहत, पहेली, थांग,आक्रित
थोडासा रूमानी हो जाये, दायरा, अनकही.