रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By अभिनय कुलकर्णी|

गुलजार

भावभावनांची गुंफण करणारा दिग्दर्शक नि तरल कवी

कवी, गीतकार, लेखक, दिग्दर्शक. चित्रपटसृष्टीत वावरणार्‍या गुलजार यांची नेमकी ओळख तरी कोणती ? अर्थात त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या मूळाशी मात्र एक संवेदनशील, तरल कवी आहे हे मात्र, नक्की. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कलाकृतीत एक तरलता जाणवते. मानवी भावभावनांचा सारा खेळ त्यांच्या लेखणीतून असा काही उतरतो की माध्यम कवितेचं असो वा कथेचं किंवा चित्रपटाचं, आपल्यावर प्रभाव पडल्याशिवाय रहात नाही.
त्यांच्या समजत्या वयात झालेल्या घटनांची बीजे गुलजार यांच्या तरल प्रतिभेत जाणवतात. गुलजार आता पाकिस्तानात असलेल्या झेलम जिल्ह्यातील दीना गावात जन्मले. पण फाळणीनंतर दिल्लीत आले. पण मनावर जखमा वागवतच. मूळातच हा माणूस कविप्रतिभेचा. त्यामुळे नैसर्गिक ओढाच तिकडे होता. म्हणून ते प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनबरोबर काम करू लागले. नंतर त्यांना संधी मिळाली ती बिमल रॉय यांच्याबरोबर काम करण्याची. त्यांनी बिमलदांच्या बंदिनीसाठी पहिलं गाणं लिहिलं, 'मेरा गोरा अंग लै लै, मोहे श्याम रंग दै दे ' . प्रियकराला भेटायला जाणार्‍या प्रेयसीला लोकांच्या नजरा चुकवत जायचंय. त्यासाठी ती चंद्राला म्हणते माझा गोरा रंग तू घे आणि त् तुझ्यातील कृष्णवर्ण दे असे सांगत े. गुलजार यांच्या तरल प्रतिभेची जाण येण्यासाठी एवढे एक गाणे पुरेसे होते. त्यामुळे मग चित्रपटसृष्टीत त्यांना पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. बिमलदांचे तर ते पूर्णवेळ सहाय्यक झाले. पटकथा लेखनालाही त्यांनी सुरवात केली. र्‍हषिकेश मुखर्जी, असित सेन विविध दिग्दर्शकांसाठी त्यांनी चित्रपट लिहिणे सुरू केले. सत्तरच्या दशकात एकीकडे अमिताभ बच्चनच्या रूपाने अँग्री यंग मॅन थैमान घालत असताना दुसरीकडे हळूवार, संवेदनशील, नर्मविनोदी चित्रपटही येत होते. ते गुलजार यांच्या लेखणीतून अवतरले होते. आनंद, गुड्डी, बावर्ची, नमक हराम हे र्‍हषिदांचे तर दो दुनी चार, खामोशी, सफर हे असित सेन यांचे चित्रपट गुलजार यांनीच लिहिले होते. दोघांच्या चित्रपटांची जातकुळी संपूर्णतः वेगळी आहे. हीच बाब गुलजार यांची व्यापक प्रतिभाही दाखवून देते.
इतरांसाठी चित्रपट लिहिल्यानंतर मग गुलजारही निर्मितीच्या क्षेत्रात पडले. त्यातून अनेक चांगले चित्रपट तयार झाले. त्यांनी बनविलेला पहिलाच चित्रपट परिचय 1972 मध्ये आला. आणि बऱ्यापैकी गाजला. नंतर कोशिश हा अप्रतिम चित्रपट आला. ज्याच्यात संजीव कुमार व जया बच्चन यांनी मुकबधीर जोडप्याची अविस्मरणीय भूमिका केली होती. या चित्रपटाने गुलजार व संजीवकुमार या दोघा प्रतिभावंतांची जोडी जमली. त्यानंतर मग आंधी, मौसम, अंगूर व नमकीन पर्यंत कायम राहिली. आंधी हा चित्रपट राजकारणी स्त्री व तिचा राजकारणात नसलेला पती यांच्यातील बेबनाव व नंतर एका अवचित क्षणी एकत्र भेटल्यानंतर त्यांचं पुन्हा एक होणं या संकल्पनेवर आधारीत आहे. हा चित्रपट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींवर आधारीत असल्याची चर्चा असल्याने वादात अडकला होता. त्यावर काही काळ बंदीही घातली होती. मात्र, नंतर ती उठवण्यात आली. यातील अर्थपूर्ण गाणीही खूप गाजली.
गुलजार यांचे नाव नंतर आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये आले. त्यांच्याकडे काम करणे अर्थात प्रतिष्ठेचे ठरू लागले. त्यामुळेच परिचय, खुशबू, किनारामध्ये जितेंद्र, अचानक, मीरा आणि लेकीनमध्ये विनोद ख्नन्ना, खुशबू, किनारा, मीरा यामध्ये हेमामालिनी यांनी काम केले.
गुलजार स्वतः कवी असल्याने त्यांच्या सर्वच चित्रपटांची गाणी सुमधूर व अर्थवाही चालींची आहेत. संगीताच्या बाबतीत गुलजार यांची जोडी जमली आर. डी. बर्मन यांच्यासोबत. वास्तविक तोपर्यंत आरडी म्हणजे पॉ़प संगीत असे समीकरण झाले होते. मात्र, गुलजार यांच्यासोबत काम करताना आरडींनी अप्रतिम संगीत दिले. उदाहरणच द्यायचं झालं तर बीती ना बितायी रैना, ओ माझी रे अपना किनारा, इस मोड पे आतें है, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है या गाण्यांचे देता येईल.
80, 90 च्या दशकात गुलजार यांनी चित्रपट कमी केले. लेकीन, इजाजत, माचिस हे चित्रपट याच काळातले. हुतूतू हा नजीकच्या काळातील त्यांचा शेवटचा चित्रपट. पण तो फसल्याने फारसा चालला नाही. चित्रपट कमी केले तरी त्यांनी मिर्झा गालिब यांच्यावर नसरूद्दीन शहा यांना शीर्षक भूमिकेत घेऊन मालिका केली. दूरदर्शनवरील या मालिकेची लोक आजही आठवण काढतात.गुलजार यांनी काही डाॅक्यमेंटरीसुद्धा केल्या. अमजद अली खान, पंडित भीमसेन जोशी यांच्यावर त्या आधारीत आहेत. चित्रपट बनविणे कमी केले तरी इतरांसाठी चित्रपट लिहिणे मात्र त्यांनी सुरूच ठेवले होते. मासूम, रूदाली हे त्यांनी इतरांसाठी लिहिलेले चित्रपट. शिवाय या काळात गीतकार गुलजार जास्त पुढे आले. थोडीसी बेवफाई, सदमा, गुलामी, माया मेमसाब, सत्या अगदी आताच्या बंटी और बबली या चित्रपटांतील गीते त्यांचीच आहेत. शिवाय त्यांचे अनेक कथा, कविता संग्रहही आहेत. रावीपार हा त्यांचा संग्रह खूप गाजला. लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या एकता या काव्यसंग्रहाला एनसीईआरटीचे पारितोषकही मिळाले आहे. गुलजार यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्याही मोठी आहे. पद्गमभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शिवाय तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार व चौदा वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात त्यांच्यातील दिग्दर्शक, पटकथा लेखक व गीतकार या सर्व भूमिकांचा सन्मान करण्यात आला आहे.

गुलजार यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट ः आंधी, मौसम, माचिस इजाजत अंगुर, हुतूतू परिचय, अचानक, आंधी, लेकिन.

गुलजार यांनी गीतलेखन केलेले काही चित्रपट- किनारा आंधी, मासूम, परिचय, कोशिश, घरौंदा, किनारा, लेकिन, इजाजत, गुलामी, सदमा, अंगुर, बंटी और बबली, युवा, मकबूल, पिंजर, साथिया, ओमकारा, पहेली, गोलमाल, देवता, स्वयंवर, फिजा, खूबसुरत.