रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By वेबदुनिया|

लहानपणचे बाबूजी

(हरिवंशराय बच्चन जन्मशताब्दी विशेष)

- पुष्पा भारत

NDND
अमिताभ बच्चन यांच्या वयाचे पासष्ठावे वर्ष म्हणजे त्यांचे वडिल व प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. हरिवंशराय बच्चन यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. अमिताभ स्वतः दोन मुलांचे वडील आहेत. शिवाय दोन गोड नातवांचे ते आजोबाही बनले आहेत. या वयातही त्यांची दिनचर्या अतिशय व्यस्त आहे. अशा परिस्थितीत अर्धशतकापलिकडच्या त्यांच्या आयुष्यासंदर्भात बोलण्यास ते तयार होतील का, या शंकेची पाल मनात चुकचुकत होती. पण त्यांच्याशी असलेल्या दीर्घकालिन संबंध चांगलेच दृढ बनले होते. त्या अधिकारापोटीच, एक दिवशी त्यांना सांगितलं, अमित, थोडा वेळ काढा. आपण बसून फक्त बाबूजींवर बोलूया. त्यांनी चक्क हो म्हटले. आणि वेळ काढून ते बसले, त्यावेळी काळ जणू थांबला आहे, असे वाटत होते. आठवणींच्या प्रदेशात शिरल्यानंतर तर जणू स्मरणानंदीच त्यांची टाळी लागली होती.....

अमिताभ म्हणतात, की ``माझा जन्म आई आणि बाबूजींसारख्या आई-वडिलांच्या घरी झाला हे मी माझे भाग्य समजतो. माझ्यावर चांगले संस्कार करण्याचे संपूर्ण श्रेय त्यांना जाते. वस्तुतः ते दोघेही अतिशय वेगळ्या वातावरणात, संस्कारात वाढलेले होते. आई एका श्रीमंत शीख घराण्यातली मुलगी, तर बाबूजी कनिष्ठ मध्यमवर्गीय कायस्थ कुटुंबातून आले होते. आई लाहोरसारख्या त्यावेळच्या आधुनिक शहरात वाढलेली, तर बाबूजी ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक व साहित्यिक नगरी समजल्या जाणाऱ्या अलाहाबादमध्ये रहात होते. दोन्ही कुटुंबांची कौटुंबिक मुल्ये अतिशय उच्च होती. पण सामाजिक दर्जानुसार दोन्ही कुटुंबे दोन ध्रुवांवर होती. एक पाश्चात्य तर दुसरे पौर्वात्य. आईचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले तर वडिलांचे हिंदी व फारसीत. पण दोघांत एक बाब मात्र समान होती, ती म्हणजे धार्मिक श्रद्धा. त्यामुळेच लहानपणापासून रामचरितमानस आणि गुरूवाणी दोन्ही कानावर पडायचे. आजचा मी जो काही बनलोय ते या मिश्रणातूनच.``

``आम्ही दोघे भाऊ याच विचारधारांच्या सुंदर मेळ असलेल्या वातावरणातच वाढलो. आई आणि बाबूजी आमच्यासाठी परस्परांचे पूरकही होते. इथे मला एक गोष्ट आठवते, तेव्हा आम्ही अलाहाबादमध्ये १७ क्लाईव्ह रोड येथे रहात होतो. तिथे राणी बेतियाचे एक मोठे घर होते. त्याच्या चारही बाजूंनी उंच उंच भिंती होत्या. आत कोणालाही जाता येत नसे.

अतिशय रहस्यमय जागा होती. मी मात्र आत जायला अतिशय उत्सूक होतो. एके दिवशी तिथला चौकीदार म्हणाला, आत जायचं असेल तर चार आणे दे. आईच्या ड्रेसिंग टेबलवर एक डब्बा कायम असायचा. त्यात ती बांगड्या, क्लिप वगैरे ठेवायची. कधी कधी त्यात पैसेही टाकताना तिला मी पाहिलं होतं. एके दिवशी मी हळूच त्यातले चार आणे चोरले आणि त्या चौकीदाराला दिले. त्या दुष्टाने ते पैसे तर घेतलेच, पण आत काही सोडलं नाही. मी अतिशय निराश झालो. घरात माझी चोरी पकडली गेली. आई मार मार मारलं. पण बाबूजींना मात्र या मारण्याचं वाईट वाटलं. मुलांना असं मारायला नको असं त्यांनावाटंलं. त्यांनी आईला काही सांगितलं नाही, पण मला बाजूला घेऊन गेले आणि चोरी करू नये असं समजावून सांगितलं. `तुला कोणत्याही वस्तूची गरज असेल, तर आम्हाला सांगून घे. देणे शक्य असेल तर आम्ही जरूर देऊ. पण शक्य झाले नाही, तर ती आमच्या आवाक्याबाहेर आहे, हे समजून घे. शिवाय त्यासाठी थोडी वाट पहायलाही शिकलं पाहिजे.` अशा प्रकारच्या गोष्टी त्या असे काही सांगायचे की आमच्या बालमनावर त्याचा कायमस्वरूपी प्रभाव पडायचा.``

चर्चेच्या ओघात अमिताभला अशा अनेक गोष्टी आठवल्या. हरिवंशरायजी, लहानपणी अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करायचे. पण जेव्हा ते आजारी पडले तेव्हाही ते अमिताभचा शक्तीस्त्रोत बनले होते. प्रत्येक समस्येवेळी ते बोलत होतेच असे नाही, पण त्यांच्याजवळ बसल्यानंतर अमिताभनाला आपल्यावरचे ओझे कमी झाल्याचा अनुभव यायचा. अमिताभ यांनीच हा अनुभव एकदा सांगितला होता, त्याची आठवण त्यांना करून दिली असता, अमिताभ म्हणाले, ``हो, ही अगदी नैसर्गिक बाब आहे.

दुःखात कोणी आपलं माणूस काहीही न बोलता आपला हात हातात घेते, तेव्हा एक आत्मबल, धैर्य मिळतं. धाडस वाढतं. आपण देवाच्या मंदिरात जाऊन असंच बसतो ना. तो कुठे काही बोलतो. आपल्याला? पण त्याच्या त्या पवित्र सहवासात आपल्याला छान वाटते. आपण केलेले कष्ट त्याला अर्पण करतो. त्याच्याकडून आपल्याला शक्ती मिळते. आत्मविश्वास उंचावतो. माता पित्याचे स्थान आपल्या जीवनात असेच आहे. त्यांच्याकडून आपल्याला आधार मिळतो, शक्ती मिळते. बाबूजींजवळ बसतानाही हाच अनुभव मला यायचा. माझ्या अतिशय कठीण काळातही मी जेव्हा त्यांच्या साहित्यकृती वाचायचो, तेव्हा माझ्या मनात जे प्रश्नांचं तुफान उठलेलं असायचं त्याची उत्तरं मिळालेली असायची. बाबूजी आज नाहीत. पण माझ्या मनात त्यांची प्रतिभा आहे. त्यांचे साहित्य आहे. त्यांच्या पुस्तकातून मी त्यांना भेटतो.``

तेजीजींनी मला सांगितलं होतं, की लहानपणी तुम्ही खूप आजारी पडला होतात. त्यावेळी बाबूजी फार घाबरले होते. देवाला साकडं घातलं, की देवा याला बरं कर. मी दारूला हात लावणार नाही. असंच बंटी (अजिताभ) आजारी पडला तेव्हा मांसाहार सोडून दिला होता. माझ्यादृष्टीने देवासमोर ते भिकारी बनून साकडे मागायला गेले नाहीत, तर दयेची मागणी करत होते. त्याच्या बदल्यात ते त्यागालाही तयार होते. शेवटी आत्मसंयमनापेक्षा मोठी बाब काय असते?

अमितजी म्हणाले, `बाबूजींनी बंटी व माझ्यासाठी जे काही केलं, ते परमेश्वराप्रती त्यांची अतूट श्रद्धा व विश्वासाचे उत्तम उदाहरण आहे. त्याचवेळी त्यांच्या असामान्य आत्मबलाचेही. ईश्वराकडून मागणे ही सोपी बाब आहे. पण जसे आपण सांगितलं की त्याला आपलं आत्मसंयमनसुद्धा अर्पित करणं ही बाब फार कठीण आहे. ईश्वराला आव्हान दिल्यासारखं आहे ते. प्रार्थना, दक्षिणा, फळं, फुलं, नैवैद्य यांच्यासबोत त्यांनी आत्मसंयमनही अर्पण केला. तुम्ही खेळा मीही खेळतो, बघूया कोण विजयी होतं ते.`

NDND
अमितजींचं हिंदी ऐकल्यावर जणू लहानपणी त्यांना भाषेची बाळगुटी पाजली होती, की काय असं वाटतं. ते जेव्हा अतिशय मनापासून बोलतात, तेव्हा त्यांचे हिंदी अगदी रेशमी वाटतं. नदीसारखं वाहत जातं. मी त्यांना विचारलं, की तुमचे शिक्षण कॉन्वेंहटमध्ये झालं. पण बाबूजींचा मात्र त्याला विरोध होता ना? तेव्हा ते म्हणाले, `` हो. बाबूजींचे आत्मचरित्र वाचल्यानंतर ही बाब मला समजली. बाबूजी व आईमध्ये यावरून वाद होत असत हेही समजले. पण जे झालं, ते योग्य झालं असं मला आजही वाटतं. पूर्व व पश्चिम यांच्यातील मिश्रण खऱ्या अर्थाने आमच्यात आलं. बाबूजींना आपल्या मातृभाषेप्रती अतूट प्रेम होते, ते अगदी स्वाभाविकही होतं. त्याचवेळी आईवर पाश्चात्य विचारांचा प्रभाव होता. येणाऱ्या काळाची पावलं कदाचित तिने ओळखली असावीत. बाबूजी स्वतःशी व आपल्या परिस्थितीवर संतुष्ट होते. आजच्या ग्लोबल व्हिलेजचे वातावरण पाहून तिने त्यावेळी घेतलेला निर्णय किती खरा होता, ते आज कळतंय. विकसित देशांमध्ये जी आऊटसोर्सिंग होते आहे, ती बरीचशी भारतात होते आहे. कारण आम्ही हिंदी भाषक तर आहोच, पण आम्हाला इंग्रजीही चांगले समजते. चीन आमच्यापेक्षा जास्त विकसित आहेत. पण त्यांच्याकडेही एवढे आऊटसोर्सिंग होत नाही. कारण भाषेची समस्या.``

मी म्हटले, चला बरे झाले बाबूजी आईपुढे झुकले. पण ते कथित भारतीयत्वाचे अंधश्रद्ध रखवालदार नव्हते. म्हणूनच त्यांनी अनेक अनिष्ठ रितीरिवाजांच्या विरोधात विद्रोह केला होता. त्यावर अमितजी म्हणाले, हो. बाबूजींच्या मनात एक आतून आक्रोश होता. रिती रिवाज, जातपात हे ओलांडून ते पुढे गेले होते. पण आपल्या विचारांवर सारी दुनिया चालावी असा विचार मात्र ते करत नसत. त्यांचे विचार अतिशय उदारमतवादी व विचारस्वातंत्र्याचा आदर करणारे असत.

१९४२ मध्ये परंपरावादी अलाहाबाद शहरात लाहोरसारख्या आधुनिक शहरातील एका सरदारणीशी विवाह करून ते आले होते. पण संपूर्ण अलाहाबाद शहराने असे करावे, असा विचार मात्र त्यांनी कधीच केला नाही. त्याचवेळी आई आम्हाला गुरूवाणीचा पाठ शिकवायची. तिने असे करू नये असेही ते कधी म्हटले नाहीत. त्याचवेळी त्यांचा एक मुलगा बंगाली मुलीशी लग्न करतोय व दुसरा सिंधी मुलीशी यावरही त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही. ते जिवंत असते तर आपल्या नातवाचा विवाह एका दक्षिण भारतीय मुलीशी होतोय याचाही त्यांना आनंद वाटला असता.``

सर्व जण असे म्हणतात, की तुमच्यात खूप संयम आहे. तुमच्याबरोबर काम करणारे लहानमोठे कलाकार तुमच्या वेळेविषय़ीचा आग्रह, कामाच्या प्रती असलेले प्रेम व शिस्त यांनी प्रभावित होतात. हा संयम कसा कमावला?

``मी तो कमावला की आपोआप आला माहित नाही. पण दिलेल्या वेळी पोहोचणे मला आवडते. माझी आई व वडिल दोघेही कमालीचे शिस्तप्रिय होते. शिवाय लहानपणी पंडित नेहरू व इंदू आंटी ( इंदिरा गांधी) यांच्याबरोबर राहिल्याने त्याचाही प्रभाव पडला. मला आठवतंय की लहानपणी रस्त्यावरचा दिवा लागण्यापूर्वी घरी पोहोचणे गरजेचे असायचे. मग खेळ अर्धवट सोडला तरी चालेल. सायकल जोरात चालवून घरी पळायचे एवढेच एक ध्येय असायचे. अनेकदा या विषयावरून मी अनेकदा रागाचा धनी झालोय. प्रसंगी मारही खाल्ला आहे. पण एक गोष्ट आहे. बाबूजींनी स्वतः आम्हाला मारलं तरी इतर कुणी आम्हाला मारलं तर ते त्यांना सहन होत नसे. एकदा तर आमच्या प्रिन्सिपॉलसरांना सुद्धा त्यांनी यासंदर्भात फटकारलं होतं.``

``अशा गोष्टींनी आत्मबल वाढतं. कौटुंबिक साथ व त्यांचे सहकार्य यापेक्षा कोणतीच मोठी गोष्ट या जगात नाही. कुटुंब तुमच्याबरोबर असेल तर जगातील कोणताही ताकद तुमच्यापुढे टिकू शकत नाही. जीवनातील अशा अनेक बाबी बाबूजींना माहित झाल्या होत्या. मी अतिशय़ भाग्यवान आहे. माझ्या आई-वडिलांनी अतिशय हलाखीच्या स्थितीतही आमचे लाड केले. आम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आणून देण्यासाठी ते प्रयत्नशील असायचे. आपल्या व्यक्तिगत अडचणींना सामोरे जात असतानाही त्यांनी आम्ही मागितले ते दिले. आणि बघा काय वेळ आली. ज्यावेळी आई, बाबूजींच्या आशीर्वादाने आमची स्थिती अशी झाली, की आम्ही त्यांना काही तरी देऊ शकू. त्यावेळी त्यांनी सांगितलं, नको, बेटा. आम्हाला काही नको. फक्त दिवसभरात एकदा आम्हाला भेटत जा. बस. हे सांगताना अमिताभना भावना आवरत नव्हत्या.``

मग विषय बदलण्यासाठी त्यांना विचारले, अमितजी, बाबूजींनी तुमचा कोणता चित्रपट सर्वांत पहिल्यांदा पाहिला? ते म्हणाले, ``बाबूजींनी माझे सर्व चित्रपट पाहिले. सुरवातीपासून शेवटापर्यंत सर्व. आम्ही एकत्र बघू शकलो नाही, तरी वेगळा वेळ काढून ते चित्रपट पहात. आपल्या मित्रांमध्येही त्याचा प्रचार करत.``

``ते अस्वस्थ असत तेव्हा ते रोज संध्याकाळी माझ्या चित्रपटाची व्हिडीयो कॅसेट मागवून पहात असत. काही चित्रपट तर चारपाच वेळा पाहिले. सध्याचे काही चित्रपट मात्र त्यांना फारसे आवडले नाही. ते टीका करत नव्हते. पण बेटा समजला नाही. असे सांगत. त्यांना काय म्हणायचे ते मी समजून जायचो.

पुन्हा एकदा डोळे बंद करून अमिताभ गंभीर झाले, माणूस आपल्या आयुष्यात कितीही कमावू दे, आपली मुळं, आपला भूतकाळ तो कधीच विसरू शकत नाही. मला माहितेय, मी कुठे जन्मलो. कुठल्या परिस्थितीत माझ्या आई-वडिलांना मला वाढवलं. मोठं केलं. मला हेही माहितेय की जे काही थोडेफार माझ्याकडे आहे, ते उद्या कदाचित माझ्याकडे नसेल तरी मला त्याचे दुःख होणार नाही. माझा जन्म झाल्यानंतर माझे आई-वडिल मला कापडाच्या ताग्यात गुंडाळून आले होते. त्याच परिस्थितीत मी पुन्हा जाऊ शकतो. आणि अगदी आनंदात राहू शकतो.

ईश्वराची कृपा आहे आणि थोरांचा आशीर्वाद आहे. मटरियल कंफर्टस्, सुख, सुविधा सगळे आपल्या जागी असते. त्या येतात आणि जातात. पण आपला भूतकाळ कुठेही जात नाही. उद्या जर मला जमिनीवर किंवा रस्त्यावर झोपायची वेळ आली तर विश्वास ठेवा की नक्की झोपेन. देवाने बरेच काही दिले आहे. पण उद्या मला काही मिळाले नाही, तर मी हे समजून घेईन की माझ्या खात्यावर एवढेच लिहिले होते. यातलं सगळं काही गेलं तरी माझ्याबाबतीत असेच होणार होते, हे मी समजून घेईल.

आम्हा चित्रपट कलावंतांबाबत असंच होत असतं. आज लोकांनी डोक्यावर बसवलंय. उद्या कदाचित आमच्यपेक्षा चांगला कलाकार आला तर आम्हाला विसरूनही जातील. पण साहित्यात असं होत नाही. सूरदास, तुलसीदार, कबीर आजही जिवंत आहेत. प्रेमचंद, प्रसाद, निराला यांची उद्याही पूजा होत राहील. माझे बाबूजीही साहित्याकाशातील नक्षत्रांपैकीच एक होते व ते चमकत रहातील. हे माझे मोठे भाग्य आहे, की मला त्यांच्यासारखा पिता मिळाला.