ताप 'स्वाइन फ्लू'चा !
नितीन फलटणकर
'
स्वाइन फ्लू'ची दहशत देशभरात पसरली आहे. पण 'चिंता विश्वाची वाहणार्या पुण्यनगरीत' या फ्लूचा अंमल अंमळ जरा जास्तच चढलाय. एरवी कोणताच ज्वर अंगी भिनू न देता निरपेक्ष बुद्धीने सगळ्यांकडे पाहणार्या पुणेकरावर हा 'वराह ज्वरा' मात्र चांगलाच चढलाय. त्यामुळेच की काय चिकित्सक पुणेकर या रोगाचा संशय जरी आला तरी डॉक्टरकडे पळतोय. त्याच्या या भीतीचा डॉक्टरांना चांगलाच 'ताप' झालाय. पण एकूणतः या सगळ्या घडामोडींमुळे पुण्यनगरीत अनेक किस्से जन्माला आले आहेत. त्यातलेच काही खास आपल्यासाठी. आणि हो आपल्याकडेही काही किस्से, अनुभव असल्यास खाली लिहायला विसरू नका. * स्वाईन फ्लूला मराठीत काय म्हणतात? '
काही नाही. स्वाईन फ्लूच'. '
नाही रे'. स्वाईन म्हणजे काय? '
डुक्कर'मग?फ्लू म्हणजे? ताप मग 'स्वाइन फ्लू' म्हणजे 'डुक्कर ताप'.* पुण्यातल्या पाट्या जगप्रसिद्ध. स्वाईन फ्लूनंतर लागलेली ताजी पाटी वाचा. अर्थातच डॉक्टरच्या दवाखान्याची. '
कृपया ताप असेल तर तो स्वाईन फ्लू असेल असे समजू नका. समज असलाच तर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांनी दिलेला इलाज मान्य करा. डॉक्टरांकडे रक्त तपासणीचा हट्ट धरू नका. ते डॉक्टर आहेत. त्यांना समजते. हा रोग कशाने होतो याची चौकशी डॉक्टरकडे करून त्यांचा वेळ वाया घालवू नका. पेपर, टीव्ही, अथवा रुग्णालयाबाहेर लावलेला फलक वाचा.' (
वेबदुनियाच्या 'पुण्या'तील वाचकाने कळवलेला हा किस्सा नक्की खरा असावा या खात्रीने छापला आहे!)
* मिसळवाल्याकडील पाटी. '
आपण स्वच्छता पाळता आणि हातही स्वच्छ धूता असे आम्ही समजतो. फक्त हात धुण्यासाठी साबण मागू नका.' * एकाला गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतोय. संशय आल्याने त्याने कंपनीतील वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांनी तातडीने सात दिवसाची सुटी देऊन टाकली. अवघ्या काही मिनिटांमध्ये अँम्बुलन्स आली नि त्याला रुग्णालयात नेले. पण याचा फायदा घेऊन इतर अनेकांमध्ये म्हणेज स्वाइन फ्लूची लक्षणे दिसू लागली आहेत. एरवी सुटी न देणारा बॉस स्वाइन फ्लू म्हटला की धास्तावून जाऊन सुटी मंजूर करतोय. हे बेट मात्र मस्तपैकी ही सुटी एंजॉय करताहेत. सबब पुण्यातली अनेक ऑफिसेस सध्या ओस पडली आहेत. * अनेक वर्तमानपत्रांना सुरवातीला या स्वाइन फ्लूचे काय करायचे ते कळलेच नाही. म्हणजे त्याचे भाषांतर वगैरे. लोकमताची दखल घेणार्या एका पेपरने त्याला 'वराह ज्वर' असे नाव दिले. काहींनी त्याला 'डुक्कर ताप' असे संबोधले. ग्रामीण भागात जास्त वाचक असलेल्यांनी 'डुकर्या ताप' असे म्हटले. डुक्कर फ्लू, डुकर्या, वराह फ्लू ही आणखी काही याच रांगेतली नावं. * पुण्यात मुलींनी दुचाकीवरून जाताना अतिरेक्यांसारखा 'मास्क' घालावा असा अघोषित कायदा आहे, असे म्हणतात. परंतु, सध्या स्वाइन फ्लूमुळे असाच मास्क चढवून पुरूषमंडळीही 'तेच' सुख अनुभवताहेत. यात मजा आहे ती प्रेमी युगलांची. असा मास्क घालून ही मंडळी पुण्यनगरीत बिनधास्त फिरत आहेत. मास्क चढविल्याने या 'चेहर्याआड दडलंय काय?' हे कळतंच नाही. * आमच्याकडे काही किस्से असे होते. आपल्याकडेही असेच किस्से असतील तर आम्हालाही ते पाठवा आम्ही ते वेबदुनियावर प्रकाशित करू.