स्वाईन फ्लूग्रस्त २२८ रूग्ण बरे झाले
राज्यात सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंतच्या माहितीनुसार इन्फ्ल्युएंझा ए (एच१एन१) (स्वाईन फ्लू) या आजाराने बाधित रुग्णांची आत्तापर्यंतची संख्या ३२७ असून त्यापैकी २२८ व्यक्ती औषधोपचारानंतर पूर्ण बर्या झाल्या असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या विविध रुग्णालयात १४० व्यक्ती दाखल असून त्यापैकी ९५ व्यक्ती बाधित आहेत. तर इतरांचे प्रयोगशाळेत तपासणीचे निष्कर्ष आप यावयाचे आहेत, अशी माहिती मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांनी दिली.मुंबईत मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अप्पर मुख्य सचिव शर्वरी गोखले, वैद्यकीय शिक्षण सचिव भूषण गगराणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर आदी उपस्थित होते.या आजाराने आतापर्यंत राज्यात ४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून मुंबईतील सध्याच्या सहा रुग्णालयांव्यतिरिक्त आणखी सहा ठिकाणी तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती देऊन मुख्य सचिव जोसेफ म्हणाले की, यामध्ये पार्ल्याचे कुपर रुग्णालय, सांताक्रुझचे व्ही.एन.देसाई रुग्णालय, मालाडचे एस.के. पाटील रुग्णालय, कुर्ल्याचे भाभा कुर्ला रुग्णालय, गोवंडीचे शताब्दी रुग्णालय आणि विक्रोळीचे कन्नमवार रुग्णालयांचा समावेश आहे. उद्यापासून (मंगळवार) या रुग्णालयात तपासणी सुरु होईल.या आजारासंबंधीची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या असून मंत्रालयातील राज्यस्तरीय हेल्पलाईनचा दूरध्वनी क्रमांक २२०२६५७९ आहे, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हेल्पलाईनचा नंबर २३०८३९०१ व ठाणे येथील हेल्पलाईनचा नंबर २५३४७७८५ (विस्तार १४५) असा आहे. नवी मुंबई व इतर ठिकाणी हेल्पलाईन मंगळवारपर्यंत सुरु होतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.