बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आवश्यक माहिती
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2024 (12:48 IST)

पोलीस भरती कधी होणार, फॉर्म कसा भरायचा आणि कशी करायची तयारी? सविस्तर समजून घ्या

राज्यात पोलीत भरतीचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल 17, 441 हजार पोलीस शिपायांची पदे भरली जाणार आहेत. वित्त विभागाने 100 टक्के रिक्त पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे.
 
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पोलीस शिपाई संवर्गातील पदे भरण्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली आहे.
 
2022 च्या शासन आदेशानुसार वित्त विभागाने सुधारित आकृतीबंध मंजूर केले असून, विभागांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे भरण्यास अनुमती दिली आहे. मात्र पोलीस भरतीसाठी त्यामध्ये सूट दिली असल्याने पोलीस शिपायांची 100 टक्के पदं भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
पोलीस शिपाई, पोलीस वाहन चालक, बॅण्डसमन (पोलीस बॅंड पथक) , सशस्त्र पोलीस, कारागृह शिपाई या पदांचा रिक्त पदांमध्ये समावेश आहे.
 
पोलीस भरती कधी होणार?
दरवर्षी राज्यभरातील विविध पोलीस आयुक्तालयं आणि जिल्हा अधीक्षक कार्यालयांमधून निवृत्त झालेल्या रिक्त पदांची भरती सरकारला करावी लागते. ज्येष्ठतेच्या निकषानुसार दरवर्षी ठराविक जागा रिक्त होत असतात, मात्र दरवर्षी भरती केलीच जाते असं नाही.
 
गेली अनेक वर्ष पोलीस भरतीचं गणित बिघडल्याचं पाहायला मिळत आहे. सरकार अनेकदा अचानक रिक्त पदांच्या भरतीसाठी एकगठ्ठा मंजूरी देतं.
 
सरकारने नव्याने मान्यता दिलेल्या 17, 441 हजार पदांच्या भरतीचे वेळापत्रक अद्याप निश्चित केलेले नाही. सरकारने केवळ शासन निर्णय काढला आहे.
 
भरती प्रक्रियेसाठी सर्वप्रथम प्रशिक्षण व खास पथकांच्या पोलीस महासंचालकांद्वारे बाह्य सेवापुरवठादार कंपनीची निवड केली जाईल.
 
या कंपनीतर्फे अर्ज स्वीकृती, छाननी करण्यात येईल. यापूर्वीची पद्धत पाहता यावेळेची परिक्षादेखील ऑनलाइन पद्धतीने घेतली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
पोलीस भरती प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे
 
1. सर्वप्रथम सरकारतर्फे पोलीस भरतीची घोषणा करण्यात येते
 
2. पोलीस भरतीची जाहिरात वर्तमानपत्रांमधून प्रकाशित केली जाते.
 
3. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज आणि अर्जाची रक्कम भरावी लागते.
 
4. पात्र उमेदवारांना मैदानी परीक्षेसाठी बोलविण्यात येते.
 
5. मैदानी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाते.
 
6. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
 
7. पात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाते.
 
8. अंतिम यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना पोलीस मुख्यालयात 2-3 महिने प्रशिक्षण दिलं जातं.
 
9. मुख्यालयातील प्रशिक्षणानंतर महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण केंद्रांवर 9 महिने प्रशिक्षण दिलं जातं.
 
10. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयांमध्ये विविध विभागांमध्ये रुजू केलं जातं.
 
11. सुरक्षा देणं, विविध कार्यालयांची सुरक्षा, आरोपींना न्यायालयात नेणं, आरोपींना आरोग्य चाचणीसाठी नेणं, शस्त्रागाराची सुरक्षा यांसारखी कामे दिली जातात.
 
12. उमेदवारांच्या कौशल्यानुसार किंवा मधल्या काळात विशिष्ट परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मुख्यालयातून त्यांची बदली फोर्स वन, जलद प्रतिसाद पथक, लोकल क्राईम ब्रांच, पासपोर्ट डिव्हिजन, डॉग स्क्वॉड, बॉम्ब डिस्पोजल पथकामध्ये केली जाते.
 
अर्ज कसा भरायचा?
2019 पर्यंत भरतीचा क्रम पुढीलप्रमाणे असा होता- अर्ज भरणे, मैदानी परीक्षा आणि लेखी परीक्षा. मात्र 2019 मध्ये पहिल्यांदाच लेखी परीक्षा आधी आणि नंतर मैदानी परीक्षा घेतली गेली होती.
 
2019 पर्यंत एका उमेदवाराला पात्रतेनुसार एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येत असत. उदा. पात्र उमेदवार एकाचवेळी चालक आणि बॅण्डसमन पदासाठी अर्ज करू शकत होता. मात्र 2019 मधील भरती प्रक्रियेत एका उमेदवाराला केवळ एकच अर्ज भरता आला. उमेदवारांच्या विरोधानंतर ही अट काढून टाकण्यात आली होती.
 
अलीकडच्या काळात पोलीस भरतीच्या प्राथमिक अर्जाची जबाबदारी खासगी कंपन्यांना देण्यात आली आहे. यापूर्वी ‘टीसीएस’ आणि ‘आयबीपीएस’ या कंपन्यांवर ही जबादारी सोपविण्यात आली होती. आता जाहीर झालेल्या भरतीसाठी कोणत्या कंपनीला हे कंत्राट मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
 
पोलीस दलातील भरती काही हजार जागांसाठी होत असली तरी भरतीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या काही लाखांमध्ये असते. एक उमेदवार एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकतात. अर्ज भरताना खालील गोष्टी ध्यानात घ्यावा लागतात;
 
वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर नमूद केलेल्या कालावधीमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक.
अर्जासोबत रक्कम भरणे गरजेचे. अर्जाची फी पूर्वी रूपये 350-400 रूपये असायची, मात्र गेल्या काही ही प्रक्रिया खाजगी कंपन्यांमार्फत राबवली जाऊ लागल्यानंतर अर्जाची किंमत खुल्या वर्गासाठी रूपये 1000 आणि इतर वर्गांसाठी रूपये 950 होती. आगामी भरतीसाठी अर्जाची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
 
कोणत्या रिक्त पदासाठी अर्ज भरला जातोय, तो योग्य पर्याय निवडणे.
कोणत्या सामाजिक गटात आपण मोडतोय त्याची निवड करणे. उदा. खुला गट, राखीव गट, भूकंपग्रस्त इ.
अर्जासोबत सर्व उमेदवारांना पुढील तीन कागदपत्रे जोडणे आवश्यक असतं;
 
1) शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका
 
2) रहिवासी दाखला
 
3) राखीव गटात मोडत असल्यास जास्त प्रमाणपत्र.
 
याचबरोबर विशिष्ट पदांसाठी अर्ज भरताना संबंधित कौशल्य प्रमाणपत्रदेखील सोबत जोडावं लागतं. उदा. चालक पदासाठी अर्ज करताना ‘वाहन चालक परवाना’ जोडणं बंधनकारक आहे.
 
मुलीचे लग्न झालेले असल्यास आणि लग्नानंतर नाव बदलेलं असल्यास त्याचा दाखला जोडावा लागतो.
उमेदवार प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्यास अधिकृत सरकारी दाखला जोडणे बंधनकारक आहे.
उमेदवारांना जिल्हानिहाय अर्ज भरणं आवश्यक असतं. महाराष्ट्रातील अनेक उमेदवार उमेदवार स्वत:च्या जिल्ह्यासोबतच मुंबई जिल्ह्याचादेखील अर्ज भरतात. कारण मुंबईत पदांची संख्या सर्वांत जास्त असते.
 
पात्रता
 
मुलं आणि मुली अशा दोघांनाही रिक्त पदांसाठी अर्ज करता येतो.
मुलींसाठी स्वतंत्र जागांची तरतूद असते आणि त्याचा जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला असतो.
वय
 
उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे.
खुल्या वर्गासाठी वय 28 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. एससी, एसटी आणि ओबीसी इत्यादी राखीव प्रवर्गांतील उमेदवारांना वयाच्या 33 वर्षापर्यंत अर्ज करता येतो.
उंची
 
मुलांची उंची 165 सेंटीमीटर असणे आवश्यक.
सशस्त्र पोलीस दलासाठी मुलांची उंची 167 सेंटीमीटर असणे आवश्यक.
मुलींची उंची 150 सेंटीमीटर असणे आवश्यक.
वजन
 
मुलांचे वजन कमीतकमी 50 किलो असावे.
मुलींचे वजन कमीतकमी 45 किलो असावे.
शिक्षण
 
12 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
ड्रायव्हर आणि बॅण्डसमन पदासाठी उमेदवाराने 10 वी ची परीक्षा उर्तीर्ण असणे आवश्यक.
कौशल्ये
 
ड्रायव्हर पदासाठी अर्ज करताना उमेदवाराकडे वाहन चालक परवाना असायला हवा.
बॅण्डसमन पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला यादीत नमूद कलेल्या वाद्यांपैकी एखादं वाद्य वाजवता येणं आवश्यक आहे. वाद्य प्रशिक्षण देणाऱ्या नोंदणीकृत संस्थेचं प्रमाणपत्र असणे आवश्यक.
कोणत्याही पद्धतीने दिव्यांग/अपंग व्यक्तीला पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करता येत नाही.
पोलीस भरतीसाठी तयारी कशी करायची?
पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणीसोबतच लेखी परीक्षेचा अभ्यास देखील करावा लागतो. दोन्हीसाठी मिळून तयारीसाठी सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा असतो.
 
शारीरिक आणि लेखी परीक्षा मिळून 150 गुणांची असते. यामध्ये 50 गुणांसाठी शारीरिक चाचणी आणि 100 गुणांची लेखी परीक्षा असते.
 
सर्वप्रथम शारीरिक चाचणीचं म्हणजेच मैदानी परीक्षेचं स्वरूप समजून घेऊया.
 
मुलांसाठी
 
गोळाफेक (15 गुण) : गोळ्याचे वजन 7 किलो 50 ग्रॅम असते. 8.5 मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो.
100 मीटर धावणे (15 गुण) : कट ऑफ वेळ 11:50 सेकंद
1600 मीटर धावणे (20 गुण) : कट ऑफ वेळ 5 मिनिटे 10 सेकंद
मुलींसाठी
 
गोळाफेक (15 गुण) : गोळ्याचे वजन 4 किलो असते. 6 मीटर अंतराच्या पुढे गोळा फेकावा लागतो.
100 मीटर धावणे (15 गुण) : कट ऑफ वेळ 14:00 सेकंद
800 मीटर धावणे (20 गुण) : कट ऑफ वेळ 2 मिनिटे 50 सेकंद
सराव कसा करावा?
 
किमान सहा महिने दररोज धावण्याचा सराव करून स्टॅमिना वाढवावा.
धावण्याच्या सरावासोबत शारीरिक कवायती आणि वजन उचलण्याचा सराव करणं गरजेचं.
पूर्ण झोप घेणे आवश्यक. रात्री किमान 7 तास झोप घ्यावी. शरीराला रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी.
परिपूर्ण आहार घ्यावा. आहारात चणा-हरभरा, डाळी, भाज्या, अंडी यांचा समावेश असावा.
लेखी परीक्षेचं स्वरूप
लेखी परीक्षा 100 गुणांची असते. परीक्षेसाठी अंकगणित, बुद्धीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि सामान्यज्ञान व चालू घडामोडी या विषयांचा समावेश असतो. प्रत्येक विषयाला 25 गुण असतात. परीक्षेचा एकूण कालावधी दीड तासाचा असतो.
 
प्रत्येक विषयांमध्ये कोणत्या गोष्टींची तयारी करणं आवश्यक?
 
अंकगणित: संख्याप्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणकार, भागाकार, टक्केवारी, सरळव्याज सरासरी, लसावी-मसावी, गुणोत्तर प्रमाण, अपूर्णांक, काळ-काम-वेग, नफा-तोटा, वर्गमूळ, कोन, क्षेत्रफळावरील प्रश्न, चाकाच्या फेऱ्या इ. समावेश असतो.
 
बुद्धिमत्ता चाचणी: अक्षरमाला, सांकेतिक लिपी, अंकमालिका, दिनदर्शिका, बेन आकृती, नातेसंबंध, दिशा, कूटप्रश्नक व इतर घटक असतात.
 
मराठी व्याकरण: मराठी भाषा, उगम, शब्दांच्या जाती, वर्णमाला, समास, संधी, विभक्ती, अलंकार, म्हणी, वाकप्रचार, शुद्धलेखन, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द इ.
 
सामान्यज्ञान व चालू घडामोडी: महाराष्ट्र, भारतातील ठिकाणं, नद्या, पर्वतरांगा, राजधान्या, ऐतिहासिक घटना, जगाचा भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी, नियुक्त्या इ. गोष्टींवर प्रश्न विचारले जातात.
 
तयारी कशी करावी?
पोलीस भरतीसाठी शारीरिक आणि मानसिक तयारी दोन्ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. व्यायाम आणि अभ्यासाबरोबरच मन शांत ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
 
परीक्षेत जितके महत्त्व व्यायाम आणि शारीरिक क्षमतेला आहे तितकेच महत्त्व बौद्धिक आणि आकलन क्षमतेला आहे. त्यामुळे रोज अभ्यास करणे आवश्यक ठरते.
 
दररोजची वर्तमानपत्रे, पाक्षिकं वाचणे.
मागील वर्षांचे पेपर सोडवणे.
अभ्यास करताना महत्त्वाच्या नोंदी लिहून ठेवणे.
वैकल्पिक पुस्तकांचे वाचन.
गणितं सोडवण्याचा सराव करणे.
परीक्षेमधील 70 टक्के गोष्टी सारख्याच असतात. फक्त प्रश्नाचं स्वरूप बदलेलं असतं. 30 टक्के प्रश्न नवीन माहितीवर आधारित असतात.
 
नजिकच्या पोलीस प्रशिक्षण अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊ शकता, जेणेकरून नेमका अभ्यासकम आणि तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.
 
पोलीस भरतीसाठीची तयारी, अर्ज भरणे, मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा, अंतिम यादी लागणे, प्रशिक्षण हा संपूर्ण कालावधी लक्षात घेतल्यास पोलीस शिपाई म्हणून रुजू होईपर्यंत किमान 2 वर्षांचा कालावधी जातो.
 
Published By- Priya DIxit