सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: कोल्हापूर , गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (13:59 IST)

अमित शहा यांनी सासरवाडीत शिवसेनेला ठणकावले

महाराष्ट्रात राजकारणातील व्यापारीकरणाला शरद पवार जबाबदार असल्याची टीका भाजपचे राष्ट्राध्यक्ष अमित शहा यांनी केली. एवढेच नव्हे तर आपल्या सासरी अर्थात कोल्हापूरला आलेल्या शहा यांनी शिवसेनेलाही चांगलेच ठणकावले. महाराष्ट्रात भाजपची सत्ता असेल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचे चिरंजिव अमल महाडिक यांनी शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. महायुतीतील जागावाटपाचे गुर्‍हाळ अजून कायम आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह अल्पकाळासाठी कोल्हापूरात आले होते. महालक्ष्मीचे दर्शन घेऊन शहा यांनी विमानतळ परिसरातच छोटेखानी सभा घेऊन त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला.

यावेळी, शहांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली. महाराष्ट्रात राजकारणाचे  व्यापारीकरण करण्याचे काम शरद पवारांनी केल्याची टीका शहा यांनी केली. शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांचे माहेर कोल्हापूर आहे.

‘भाजपने एक पाऊल पुढे टाकले आहे. शिवसेनेनेही नरमाईने घ्यावे, असेही अमित शाह यांनी यावेळी ठणकावून सांगितले. शिवसेना भाजपमधील जागावाटपाबाबत तणाव शिगेला पोहचला असताना अखेर भाजपाने काहीसे नरमाईचे धोरण स्वीकारले आहे. शिवसेनेबरोबरची युती कायम ठेवायची असल्याचेही शहा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, भाजपच्या 288 जागांमधील वाटपाबाबतच्या अपेक्षा भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथुर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर ठेवल्यात. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या भाजप कोरकमिटीच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.