सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (10:40 IST)

मनसेचे आमदार राम कदम यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांना आणखी एक झटका बसला आहे. मनसेचे घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचे आमदार राम कदम यांनी अखेर अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे पुरते पानिपत झाले होते. 
 
राम कदम यांनी मनसेला ऐन विधानसभेच्या रनधुमाळीत जबरदस्त झटका दिला आहे. राम कदम यांची पाच वर्षांची कारकीर्द विवादांमुळेच गाजली. विशेष म्हणजे राम कदम गेल्या काही दिवस भाजपच्या राज्यातल्या प्रमुख नेत्यांच्या संपर्कात होते. कदम हे मनसेला 'जय महाराष्‍ट्र' करतील अशा शक्यता आधीपासून होतीच. विधानसभा निवडणुकीत राम कदम यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष वसंत वाणी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
 
राज ठाकरे आणि शर्मिला वहिनी माझे श्रद्धास्थान असल्याचे राम कदम यांनी प्रसारमाध्यमाशी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितले. राजसाहेबांवरील श्रद्धा कायम राहील. पितृ पंधरवड्यात मला पक्ष सोडावा लागतोय म्हणजे माझ्यावर किती वाईट वेळ आली असेल, याची कल्पना न करणेच  बरे असल्याचेही राम कदम यांनी सांगितले.