महाराष्ट्र ही संतांची भूमी. या पवित्र भूमीत संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई या चार भावंडांसोबतच संत तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखामेळा, कर्ममेळा, गोरा कुंभार, सावता माळी, संत जनाबाई, कान्होपात्रा, नरहरी सोनार यांसारख्या संतांची मांदियाळी निर्माण झाली. चातुर्वर्णाधिष्ठित समाजव्यवस्थेत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र असे चार वर्गाचे समाजात विभाजन झाले होते.
वेद पुराणातील तत्त्वज्ञान समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हते. संस्कृतसारख्या अवघड भाषेतील तत्त्वज्ञान सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडील होते आणि म्हणूनच बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसारखा गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला.
अमृतालाही पैजेवर जिंकणार्या या रसाळ भाषेतून भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान त्यांनी सोप्या भाषेतून सांगितले. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांचा अतोनात त्रास त्यांना सहन करावा लागला. समाजात धर्माचा खरा अर्थ सांगण्यासाठी त्यांनी या यातना सोसल्या. त्यांच्या या समाजप्रबोधनाच्या कार्यात संत तुकाराम, संत नामदेव यांचाही मोलाचा वाटा होता.
सुमारे सातशे वर्षापूर्वी याच संतांनी भागवत धर्माचा पाया रचला आणि विठ्ठल भक्तीचे माहात्म्य सामान्यांपर्यंत पोहोचवून वारकरी संप्रदायाची रचना केली. ज्ञानेश्वरांनी स्थापिलेल्या या संप्रदायाचे स्वरूप धार्मिक असले तरी ते मानवतेवर आधारित होते. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना वेद पुराणांचा अर्थ जाणून घेण्याचा अधिकार आहे हा संदेश त्यांनी दिला आणि म्हणूनच सर्व धर्मियांना विठ्ठल आपला वाटू लागला.