विठू नामाच्या गजराने दुमदुमले इंदूर
व्हिडीओ पहाण्यासाठी फोटोवर क्लिक करा..टाळ मृदंग आणि विठूनामाचा गजर करत मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखी आणि दिंडी काढण्यात आली. मागील वर्षांपासून येथील महाराष्ट्रीयन मंडळाने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. आपल्या घरापासून आणि विशेषतः महाराष्ट्रापासून दूर असल्याने आषाढी एकादशी दिवशी इंदूरमधील तमाम मराठी भाविक एकत्र येत दिंडी आणि पालखी काढतात. या वर्षीही ही परंपरा कायम राखत अशा प्रकारची दिंडी काढण्यात आली. यात अनेक महाराष्ट्रीय संस्था आणि संघटना सहभागी झाल्या होत्या. तरुणांचा यात विशेष सहभाग दिसत होता. पांढरा वेष परिधान केलेले वारकरी, एका तालात एका आवाजात मृदंगाच्या तालावर विठूचाच जयघोष करत नाचताना दिसत होते. त्यांच्या हातातील ध्वज, पताका पंढरपुरची आठवण करून देत होत्या. आपण पांढरीच्या विठ्ठला जवळ नाहीत अथवा पंढरपुरला जाऊ शकणार नाहीत याची खंत अनेक वारकऱ्यांनी या वारीत व्यक्त केली. परंतु इंदूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वारीमुळे आपली ही खंत पुसून निघाल्याचेही अनेकांचे म्हणणे होते. त्यांनी आयोजकांना अनेक धन्यवादही दिले. येथील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असलेल्या राजवाडा येथून निघालेली ही पालखी अखेरीस पंढरीनाथ मंदिराच्या पायथ्याशी आली आणि पुन्हा विठूनामाचा गजर करत डोळ्यात विठ्ठलाचे रूप साठवत हे वारकरी येथेच विसावले.