850 वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर
श्री ज्ञानेश्वरांच्या कुळात त्यांच्या पिढीपूर्वी वारी होती. वारीच्या परंपरेतील 850 वर्षापूर्वीची एक निशाण सोलापुरात सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात पांडुरंग देवालया पाहावास मिळते. श्री ज्ञानेश्वर माउलींचे आजोबा श्री गोविंदपंत आणि त्यांच्या धर्मपत्नी भाग्यवंती नीराबाई या पंढरीच्या वारीस निघाल्या होत्या. ते दरवर्षी आषाढीला सोलापूरमार्गे जात असत. त्यांच्या एक मुक्काम सोलापूरला असायचा. एखदा पायी चालत ते सोलापूरला आले. दोघेही फार थकलेले होते. त्यावेळेस श्री सिद्धेश्वर महाराज यांचे भक्तांकडून श्रमदानाने तलाव खोदाईचे काम सुरू होते. तेव्हा तळकाठी एका झाडाखाली गोविंदपंत व नीराबाई मुक्कामासाठी थांबले. फेरफटका मारताना सिद्धरामेश्वरांच्या नजरेस झाडाखाली बसलेले वृद्ध दाम्पत्य दिसले.
त्यांच्याजवळील पताका पाहून हे वारकरी आहेत असे महाराजांनी ओळखले आणि महाराजांनी त्यांना विचारले की, आपण एवढय़ा थकलेल्या अवस्थेत कोठे निघालात? त्यावर गोविंदपंतांनी महाराजांना सांगितले की आम्ही दोघे श्री पांडुरंगाच्या दर्शनाला चालत निघालो आहोत. परंतु आम्ही फार थकलेले आहोत. आता चालवत नाही असे सांगितले. तेव्हा सिद्धेश्वर महाराजांनी त्यांना आहे तिथेच विठ्ठलाचे साक्षात दर्शन घडविले. आजही श्री विठ्ठलाची सुंदर सुबक मूर्ती आपणास पाहावास मिळते. या मंदिराच्या सेवेचे भाग्य पाठक घराण्याकडे पिढीजात आहे. आज श्री प्रकाश भिकाजी पाठक यांच्याकडून इ. स. 1961 पासून निष्काम व्रताची सेवा केली जाते.