शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2022 (16:13 IST)

भक्त पुंडलिक कथा Bhakt Pundalik Katha

bhakt pundlik story
भक्त पुंडलिक श्री विठ्ठल कथा 
 
 
भक्त पुंडलिक आणि श्री विठ्ठल कथा 
 
एकदा पुंडलिक नावाचा तरुण काशीच्या प्रवासाला निघाला होता, तो जंगलातून जात असताना त्याचा रस्ता चुकला, तेव्हा त्याला वाटेवर एक आश्रम दिसलं… ते आश्रम एका कुकुटस्वामीचे होते... आश्रमात पोहोचल्यानंतर पुंडलिकाने महर्षी कुक्कुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला.
 
तेव्हा ऋषींनी सांगितले की आजपर्यंत ते कधी काशीला गेले नाही आणि त्यामुळे त्यांना मार्गही माहीत नाही, हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवत म्हणाला, “तुम्ही कसले ऋषी आहात??, जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीलाही गेले नाही.'' कुक्कुट ऋषीची खिल्ली उडवून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला.
 
पुंडलिक आश्रमापासून थोड्याच अंतरावर गेला असताना त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला. आवाज कुठून येत होता... हे इकडे तिकडे बघितल्यावर त्याला कळले की आवाज आश्रमातूनच येत आहे, आश्रमात एकही बाई नव्हती… म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला…जेव्हा तो आश्रमात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की 3 स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत, जेव्हा त्याने त्यांना विचारले तेव्हा त्याला कळले की त्या तीन स्त्रिया आई गंगा, आई सरस्वती आणि आई यमुना आहेत.
 
पुंडलिक आश्चर्याने स्तब्ध झाला… काशीचे दर्शन सोडा तेथे जाण्याचा मार्गही माहित नसणार्‍या ऋषींच्या आश्रमाचे पावित्र्य हे तिघे कसे राखत आहेत. तेव्हा आई गंगा, यमुना आणि सरस्वती यांनी त्याला सांगितले की "मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत, हे आवश्यक नाही.''
 
''कुक्कुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आई-वडिलांची सेवा केली आहे. त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे. आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता प्राप्त झाली आहे.” 
 
पुंडलिक आपल्या वृद्ध आई-वडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता, यामुळे त्याचे डोळे उघडले कारण त्याने आपल्या आई-वडिलांची त्यांना काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती आणि स्वत: मोक्षासाठी भटकत होता. तो घरी आपल्या आई-वडिलांकडे परतला आणि त्याने त्याच्या पालकांना काशीत आणले. 
 
या घटनेनंतर पुंडलिकचं आयुष्यच बदलून गेलं... आता त्यांचा जीव आईवडिलांच्या सेवेत जात असे. पुंडलिकाची मातृ-पितृभक्ती इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला. 
 
भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आई-वडिलांची सेवा करत होता. देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेला पाहून त्याला खूप आनंद झाला, पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही, त्याने आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाला उभं राहण्यासाठी दिली आणि तो आपल्या आई-वडिलांच्या सेवेत लीन झाला.
 
आई-वडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली, त्यांची मातृ-पितृ भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले.
 
पुंडलिक म्हणाला, "देव स्वत: माझी प्रतिक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू ?" पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह केला, तेव्हा पुंडलिक म्हणाले की, "तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या, तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या" तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवास करण्यास राजी झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर.
 
आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले. विठोबाचा अर्थ "विटेवरी उभा देव" असाही आहे. पंढरपुरात असलेली विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे, ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नसून ती अस्तित्वातच त्याच आकारात आली आहे.