1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Updated : रविवार, 10 जुलै 2022 (00:28 IST)

वारी पंढरीची...

vari
पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या धार्मिक, साामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतला एक चमत्कार आहे. यामध्ये  पुरुष आणि स्त्रियाही मोठ्या संख्येनं सहभागी होतात. या वारीत भेदभाव विसरून मिळून मिसळून असणारं, एकमेकांचं सुख-दुःख वाटून घेणारं, गाणं-नाचणं, फुगडी असलेलं हे एक विलक्षण जगच असते. देशी-परदेशी लोकांना, अभ्यासकांना कुतूहलाचा विषय ठरणार्‍या या वारीमध्ये फक्त वारकरी नव्हे तर उच्च शिक्षित मंडळी सहभागी होतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकरर्‍यांच व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत या  दिंड्या परब्रह्माला भेटायला येतात. 
 
 वारकरी महाराष्ट्रातून नव्हे तर कर्नाटक, आंध, गोव्यातून सुद्धा येतात. वारी हा एक संस्कार आहे, प्रेमसुखाचा अनुभव आहे. या संप्रदायाची शिकवण साधी-सोपी आहे. विठ्ठलाचे फक्त नामस्मरण करावे हीच भक्ती. त्यात कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही. तसं पाहता तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी ज्ञानेश्वर माउली आणि तुकोबाराायांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून 'ज्ञानोबा तुकाराम' असे भजन करीत आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी वारी जाण्याची परंपरा सुरू केली. हा पालखीचा सोहळा 1680 पासून सुरू झाला. पुढे 1835 पासून वै. हैबतबाबा आरफळकर यांनी माउलींची पालखी आळंदीहून स्वतंत्रपणे नेण्यास सुरुवात केली. माउलींच्या  स्वारीसाठी घोडा, पालखीचा नगारा, त्यामागे काही दिंड्या, मध्यभागी रथात माउलींची पालखी आणि पालखीच्या मागे चाललेल्या शेकडो दिंड्या या वैभवात हा भव्य सोहळा सुरू झाला. वारीच्या मुक्कामात  महिलांच्या ओव्यांनी तर रात्र न्हाऊन निघते. ती अशी
 
 ... पंढरीची वाट से कशानं गं सादळली। 
 कावड गं बाई एकनाथाची हिंदळली । 
 पंढरीची वाट से कशानं गं वली झाली।
राही रखमाबाई केस वाळवीत गेली । 
वेशीतून पंढरीत प्रवेश करताना मायाबहिणींचे असे संवाद कानी गुंजी घालतात. अशा या संवादाचे अप्रूप विठुरायाला जास्त. आणि तोही
रुक्मिणिला म्हणतो...
चल रुक्णिी तेल आणू 
ज्ञाना-तुकयाच्या पायी  आपण तेल लावू... 
 
इतकी काळजी साक्षात परमेश्वर आपल्या भक्ताची घेतो. असं म्हणतात, आपण फक्त विठ्ठलाचं नामस्मरण करायचं. काळजी, चिंता हे सर्व त्या परेश्वरावर सोडून द्यायची  आणि आपण निश्चिंत व्हायचं. असा भाबडा वारकरी. गळ्यात तुळशीची माळ घालून पायी वारी करतो. पण, ही पायी वारी या वर्षी होणार नाही असे दुसर्‍यांदा होत आहे.
यापूर्वी  स्वातंत्र्यकाळापूर्वी  1944 साली देश ब्रिटिश अमलाखाली असताना दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीच्या पर्वात ब्रिटिशांनी अन्नधान्याचे कारण सांगून वारीवर बंदी घातली होती. जनता या विरोधात होती. जनतेने एकमताने ही बंदी उठवण्याबाबत शासनाकडे अर्ज केला होता. पंढरपूरची वारी ही पंढरपूरचा आर्थिक कणा असल्याने   पंढरपूरचे अर्थकारण अडचणीत आले होते. त्यामुळे लोकांनी शासनाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. सोलापूरकरांनी हजारो सह्याचा अर्ज मुंबई सरकारच्या चीफ  सेक्रेटरीकडे पाठवला होता. आळंदी येथून पालखी हलवण्यासाठीही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे 1944 मध्ये नियोजित वेळी पालख्या पुण्यातच आल्याच नाहीत. त्यावेळचे जगन्नाथ महाराज, सोनोपंत दांडेकर, सरदार विंचूरकर, आळंदी संस्थानचे केळकर, प्रा. धनंजयराव गाडगीळ आदींनी एकत्रित येऊन प्रयत्न करून जिल्हाधिकारी तसेच चीफ सेक्रेटरी यांच्याकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. म्हणून या प्रयत्नांना ब्रिटिश सरकारने थोडी सवलत दिली आणि 1,2 व 3 जुलै 1944 या काळात बंदी तात्पुरती उठवून पादुका मोटारीने पंढरपूरला नेऊन लगेच परतण्याची ताकीद दिली होती.
 
आता दुसर वेळेस या कोरोनामुळे ना वारी ना वारकरी. यावेळी लाखो वारकर्‍यांनी मनावर दगड ठेवला असेल. ही परंपरा खंडित झाली दुसर्‍या वेळेस या विषाणूमुळे..! मार्च महिन्यात चैत्री एकादशी झाली पण त्यावेळीही पंढरपुरात काय कोणत्याही विठ्ठलाच्या मंदिरात कोणताही भक्त विठ्ठलासमोर नव्हता. काय वाटलं असेल विठ्ठलाला
आणि त्या भक्ताला...! वर्षातून चार मोठ्या एकादशा असतात. पंढरपूरच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले वारकरी आज घरातच बसून व्याकूळ होत आहेत. वारकर्‍याला  असं वाटत असेल....
माझी पावलं विठूला भेटाया झाली अधीर ।
पण माझ्या पावलाआधीच मन पोचलं पंढरपूर ॥
 
विठूला भेटायची आस एवढी की, त्याच्या अगोदर त्यांचं मन  त्या पंढरपूरला पोहोचले सुद्धा..! खुद्द विठ्ठलही भावूक झाला असेल यावेळी. स्वप्नातसुद्धा वारकर्‍याला पांडुरंग, वारी सअसेच दिसत असेल यात काही शंका नाही. तो म्हणतो
आता हे दर्शन तुझे । घरातूनीच घेतो ।
आलिंगनही  मनातूनीच करतो । या विषाणू कारणे ॥
या कारणे विनवितो तुज । माझ्या पांडुरंगा ।
थांबव हा विषाणूचा दंगा । सांभाळी जगता ॥
 उमेश मोहोळकर