शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जुलै 2020 (09:46 IST)

"पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत"

१. आळंदी - पालखी आळंदीतून (वद्य ।।९।।) निघते. आळंदी म्हणजे आत्मानंद. पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. 
 
२. पुणे - पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. (भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो.) 
 
३. दिवेघाट - नंतर पालखी संवत्सर ग्राम उर्फ सासवड या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या अष्टांगयोगाच्या आचार दिव्यातून जावे लागते. 
 
४. सासवड - वड म्हणजे सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन सोपानदेवांच्या समाधीचे दर्शन घ्यावे.
 
५. जेजुरी - नंतर पालखी जेजुरीला येते. ज = जितेंद्र ,जोरी = जास्त त्रास न घेणे. म्हणजेच जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो. 
 
६. वाल्ह्या - भर दुपारी वाल्ह्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसाने वाल्हे= कोमल, प्रेमळ, जिव्हाळासंपन्न झाले पाहिजे. (वाल्ह्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते.) 
 
७. लोणंद - त्यानंतर पालखी  लोणंदला मुक्कामाला येते. लो = देणे, आनंद = परमसुख. श्रीविठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो. 
 
८. तरडगाव - जर तू ब्रम्हानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल या सिध्दांताचे चिंतन करण्यासाठी पालखी तर + रड =तरडगावला येते. 
 
९ फलटण - ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या। म्हणजे ब्रम्ह हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो. हे जीवनाचे सत्य समजल्यावर
 
१०. बरड - संसारातील सुखदुःखादि द्वद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरुपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे बरड जमिनीसारखे होते. 
 
११. नातेपुते - नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्रीविठ्ठलाचा होतो.
 
१२. माळशिरस - माळ = साखळी + शिरस = ज्ञान = माळशिरस. पायी चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठलध्यासाने मानसिक तपाबरोबर कीर्तन - प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप करते. 
 
१३. वेळापूर - त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापूरात होतो. क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान होते. 
 
१४ वाखरी - वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी प्रासादिक व वाचासिद्ध होऊन.
 
१५. नंतर तो पंढरपूर जाऊन पांडुरंगमय होतो.
 
पांडुरंग... पांडुरंग 
 
- सोशल मीडिया