गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Updated : बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (08:28 IST)

विठ्ठल मंदिर, पंढरपूर Shri Vitthal Rukmini Mandir Pandharpur

Pandharpur Temple
पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात. पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नावे भक्तांनी दिली आहे. बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. 
 
विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली यावर अनेक इतिहासकारांनी अभ्यास केला आहे. संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली - वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा. 
 
 
श्री विठ्ठल मुर्ती
पंढरपूर मंदिरात विठुरायाची मूर्ती स्वयंभू असून वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी ज्याचा आकार शिवलिंगासारखा आहे. श्रींचे मुख उभट, गाल फुगीर, दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले तर गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके आणि ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. श्रींच्या दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले असून उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहेत तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला असून छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आणि कमरेला वस्त्र ज्याचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मृतकेषी नावाचे दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. 
 
पंढरपूर मंदिर कथा
द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होता. देव-दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागिल्यावर राजाने पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होवून वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाले की मी अत्यंत श्रमामुळे थकलो आहे आणि मला एकांती गाढ निद्रा हवी. जो कोणी माझी निद्राभंग करील, तो माझ्या दृष्टीक्षेपाने भस्म व्हावा. देवांनी तथास्तु म्हटले आणि राजा एका गुहेत निद्राधीन झाला. नंतर कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला. हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नव्हता. भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास त्या गुहेत नेले ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता. झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकून स्वत: श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून काळयौवनास वाटले की कृष्णच झोपला आहे म्हणून त्याने निद्रिस्त राजावर प्रहार केले. मुचकुंद राजाची निद्राभंग झाल्याने त्यांनी क्रोधित नजरेने कालयौवनाकडे पाहिले आणि दैत्य जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन देत सर्व प्रसंग सांगितला. तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन असे वचन दिले. नंतर मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीर वनात अर्थातच पंढरपूर क्षेत्राजवळ चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला.
 
पुंडलिक माता-पित्याचा द्रोह करीत पत्नीच्या हट्टापोटी तिच्यासोबत काशीयात्रेस निघाला. रस्त्यात कुक्कुट मुनीच्या आश्रमात राहिला. कुक्कुट मुनींना माता-पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. गंगा, यमुना, सरस्वती या नद्या आश्रमात रोज सेवा करीत असे. हा प्रसंग जेव्हा पुंडलिकाने अनुभवला तेव्हा नद्यांनी देवीरूपात त्यास उपदेश केला आणि पुंडलिकाने माता-पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली. तो पुन्हा पंढरीस आला आणि भक्तिभावाने माता-पित्याची सेवा करू लागला.

इकडे श्रीकृष्णांना मुख्य भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ बसवून घेतल्याचे बघून रूक्मिणी देवी रागाने निघून दिंडिर वनात तपश्चर्या करत बसल्या. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले. मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वराप्रमाणे रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले.
 
येथे पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती व सेवा पाहून भगवंत संतुष्ट झाले आणि ते पुंडलिकाचे भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न असताना भगवंताने त्यास दर्शन दिले. पुंडलिकाने त्याचे माता-पित्याची सेवा कार्य पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतिक्षा करण्याची विनंती केली. भगवंतानी त्याची प्रार्थना मान्य केली म्हणून पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली. ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका, भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे.
 
पंढरपूर मंदिर इतिहास
इसवी सन 516 मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख आढळतो. याबरोबरच देवळाचा ' लहान माडू ( देऊळ) उल्लेखही नंतरच्या काही शीलालेखांमध्ये पाहायला मिळतो. विशेषतः बाराव्या शतकात सापडलेल्या ' 84 वा लेख ' हा शीलालेख सध्याच्या मंदिराबाहेर उत्तरेकडच्या भिंतीवर लावण्यात आला आहे. आधीच्या देवळानंतर 84 वर्षांनी या देवळाचा जीणोर्द्धार झाला आहे असे समजुन 84 लक्ष योनीतून मुक्ती मिळण्यासाठी भाविक त्याला पाठ घासून मगच देवळात प्रवेश करतात. यामुळे हा शीलालेख झिजल्याने त्यास आता तारेचं कुंपण बसवलं आहे.

गाभारा, अंतराळ आणि सभामंडप हे आताच्या देवळाचे मुख्य घटक असून सभामंडपाच्या 16 खांबांपैकी एकावर चांदीचं आवरण बसवलं असून तोच गरूडस्तंभ म्हणून ओळखला जातो.
 
सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती; पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली. सोळखांबी मंडपात त्यांची समाधी असून आत जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी होय. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जीणोर्द्धार करण्यात आलेलं पांडुरंगाचं मंदिर हे 16, 17 आणि 18 व्या शतकातलं बांधकाम असावं, असा जाणकारांचा अंदाज आहे. असं असलं तरीही मूळ मंदिराचे 12 व्या शतकातले अवशेष अजूनही तिथे आढळतात. या देवळाच्या दक्षिणेला खंडोबा, व्यंकटेश अशा देवतांची लहान लहान देवळंही आहेत. 1946 मध्ये साने गुरुजींनी हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले.
 
पंढरपूर मंदिर महिमा
केवळ वारकर्‍यांचे, वैष्णवसंप्रदायांचे, महाराष्ट्रीयांचेच नव्हे तर कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश इतर प्रांतातील अनेक भक्तांचे पंढरीनाथ हे आराध्य दैवत आहे. अनेक संतानी या देवाचे माहात्म्य गायलेले आहे.
 
पंढरपूर वारी
वारी म्हणजे पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला पायी जायचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. वारीत अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात. त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात.  वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त पायी प्रवास करुन पंढरपूरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनास येतात.
 
वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते, असे सांगितले जाते. मुख्य चार वार्‍या असतात ज्यात चैत्री यात्रा असते ज्यात पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. दुसरी आषाढी यात्रा जी पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल" आणि "जय जय राम कृष्ण हरी" या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. तिसरी कार्तिकी यात्रा जी कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. आणि चौथी माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते. या एकादशीस जया एकादशी म्हणतात.
 
पंढरपूर कसे पोहचाल?
पंढरपूर हे शहर सोलापूर जिल्ह्यात आहे. पंढरपूर हे शहर वेगवेगळ्या रस्त्यांनी जोडलेले आहे. पंढरपूर हे दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील कुर्डूवाडी या रेल्वेजंक्शनने जोडलेले आहे. तसेच मिरज - पंढरपूर रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. या मार्गावर धावणाऱ्या प्रमुख रेल्वे मुंबई- पंढरपूर, मिरज -पंढरपूर, लातुर - पंढरपूर, उस्मानाबाद - पंढरपूर अशा आहेत. पंढरपूर पासून जवळ असणारी विमानतळे सोलापूर- 75 कि.मी. आणि पुणे -210 कि.मी. अंतरावर आहे.