रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By वेबदुनिया|

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा

पंढरपुरात विटेवर अठ्ठावीस युगापासून उभा असलेला तो सावळा विठ्ठल नेमका आहे तरी कोण? त्याची दैवत परंपरा तरी कोणती तो शैव की वैष्णव परंपरेतला? सामान्य वारकऱ्याला हे प्रश्न पडायचे कारण नाही. कारण द्वैतवादाचा सिद्धांतच मुळी त्याच्या चरणी लीन झाले की संपुष्टात येतो. पण त्याचे गुणगान गाणाऱ्या संतांनी तरी त्याला कोणत्या रूपात पाहिलंय? संतांनी त्याला विविध रूपांत पाहिले असले तरी ज्ञानोबांपासून निळोबांपर्यंत सर्वांमध्ये तो कृष्णरूप आहे, यावर मात्र एकमत आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक रां. चि. ढेरे यांनी आपल्या विठ्ठल- एक महासमन्वय या पुस्तकात यासंदर्भात केलेले संशोधन मांडले आहे.

विठ्ठलाच्या पंढरपुरातील प्रकटानाबाबतीत चार कथा आहेत. या चारही कथात विठ्ठलाच्या कृष्णारूपावरच शिक्कामोर्तब होते.
स्कांद पुराणातील पांडुरंग महात्म्यातली कथा हेच सांगते. द्वापार युगाच्या अंती अठ्ठाविसाव्या कल्पात पंढपूरजवळ असलेल्या पुष्करिणी नदीच्या तीरावर आश्रम बांधून पुंडरीक मातापित्यांची सेवा करीत होता. त्या भक्तीने संतुष्ट होऊन कृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी येतो. त्याच्या आग्रहाखातर तो पंढरपूरास वास्तव्य करतो. ही कथा परिचित आहेत.

पद्मपुराणातील पांडुरंग महात्म्यात वेगळीच कथा आहे. दिंडीरव वनात उन्मत्त झालेल्या दिंडीरव दैत्याचा वध करण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचे रूप धारण करून लोहदंडाने त्याचा वध केला.'' शेवटी यातील विष्णू म्हणजे हरीच आहे. कृष्ण हाही हरीच. त्यामुळे याही कथेत कृष्ण आहेच.

त्याच पद्मपुराणाच्या पहिल्या अध्यायात, कृष्णाने रुसलेल्या रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी भिमेच्या काठी असलेल्या दिंडीरवनात गोपवेषात प्रवेश केला. तेथे त्याने तिची समजूत काढली. या कथेतही कृष्ण आहे.

पांडुरंग प्रकटनासंदर्भात आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. पद्मा नावाच्या एक सुंदर युवतीने इष्टवर प्राप्तीच्या इच्छेने तपश्चर्येला आरंभ केला. त्यावेळी देव तिच्याहून सुंदर रूप धारण करून तिच्यासमोर प्रकट झाला. देवाचे सुंदर रूप पाहून तिचे भान हरपले. तिचे वस्त्र गळाले. केस मोकळे झाले. तिच्यामुळेच पंढरपूरजवळ असणारे मुक्तकेशी हे तीर्थ निर्माण झाले.(स्कंद पुराणानुसार ती एक अनाम गोपी होती तर पद्मपुराणानुसार ती चंद्रसेनाची मुलगी होती.)

या चारही कथा विठ्ठल हा मूळ कृष्णरूपच होता, हे सांगणाऱ्या आहेत. पण त्याचवेळी पुंडलिकासाठी पंढरीत प्रकटलेला देव हा गोपवेषधर आहे हीच धारणा ज्ञानदेव-नामदेवांपासून सर्व संतांनीही पुन:पुन्हा उच्चारली आहे.
ज्ञानेश्वर म्हणतात.

पुंडलिकाच्या भावार्था। गोकुळाहूनी जाला येता।।
निजप्रेमभक्ति भक्ता। घ्या घ्या आता म्हणतेस।

पुंडलिक गोकूळातून आला होता, याचे स्पष्टिकरण ज्ञानेश्वरांनी यातच दिले आहे. शिवाय ज्ञानदेवांनी `गोपवेषे, निराळे` या ओळीत कृष्ण-विठ्ठल रूपाची एकात्मता साधली आहे. ज्ञानेश्वरांच्या भावविश्वात कृष्ण आणि विठ्ठलाची पूर्ण एकरूपता झाली आहे.

तोहा विठ्ठल बरवा।
तो हा माधव बरवा।

या ओळीतून ज्ञानदेव त्यांच्यातील भेद संपवून टाकतात. ज्ञानदेवांच्या अनेक विराण्या गोपीच्या विरहवेदनेतून साकारल्या आहेत.


MH GOVT
'रूप पाहतां तरी डोळसु । सुंदर पाहतां गोपवेषु।

अशा शब्दात ज्ञानेश्वरमाऊली त्याच्या सौंदर्याचे कौतुक करतात, तर,

'विटेवरी समचरण सुंदर। बाळ सुकुमार यशोदेचे।।

असे नामदेव सांगतात.

'तोचि भीमातीरी उभा दिगंबर।
केवी कटीं कर भक्तांसाठी (1179)
'गोकुळीहुनी देव पंढरपुरा पातला (974)
नवलक्ष गोधने पाचशे सवंगडक्ष (974) या सर्व ओळी त्याचे कृष्णरुपच सांगतात.

एकनाथांनी तर एका आख्यायिकेला धरूनच देवाच्या रूपाचे वर्णन केले आहे.
धरूनिया राधा मीस। देव येती पंढरीस।।
रुक्मिणी रुसली। ती दिंडीरवना आली।।
त्यामागें मोक्षदानी। येता जाला दिंडीरवनीं।।
गाई-गोपाळांचा मेळा। गोपाळपुरी तो ठेविला।।
आपण गोपवेषधरी। एका जर्नादनी श्रीहरी।।

या ओळीतून त्यांनी विठ्ठलाचे कृष्णरूप मांडले आहे.

तो हा गोपवेषें आला पंढरपुरा
भक्तसमाचारा विठ्ठल देवो।। (609)

हाच ठेवा पुढे चालवणारे तुकोबाही याच गोष्टीची पुष्टी देतात.

नागल गोडें बाळपण। ते स्वरूप काळीचें।।
गाई गोपाळांच्या संगे। आले लागे पुंडरिका।।
ते हे ध्यान दिगंबर। कटींकर मिरवती।। (1724)

ते पुन पुन्हा या गोष्टीचे समर्थन करतात

पुडरीकाच्या घरी प्रकटलेला विठ्ठल हा 'गाई गोधनाचे वाडे। गोपाळ सवंगडे समवेत ।। (264)
असा आहे असे निळोबांनी म्हटले आहे, 'गाई गोपाळ संगती (306) घेऊन आलेला 'बाळमूर्ती पांडुरंग (325) यमुनेकाठचा विहार सोडुन पंढरपुरी दहीदुधाचा काला खातो (350) हे निळोबा सांगतात.

(संदर्भ -विठ्ठल एक महासमन्वय- लेखक रा. चिं. ढेरे)