पंढरीची वारी
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
तुकोबा आपल्या कुळाचाराबद्दल किती दक्ष आहेत पाहा. ते सांगतात, पंढरीची वारी, आहे माझे घरीं आणीक न करीं | तीर्थव्रत || व्रत एकादशी, करीन उपवासी | गाइन अहर्निशीं | मुखीं नाम || नाम विठोबाचें, घेईन मी वाचे | बीज कल्पांतीचें | तुका म्हणे || साहजिकच माझ्या मनाला आत केवळ ध्यास काय तो पंढरीचाच. त्यामुळे कधी एकदा आषाढ येतो आणि मी आषाढी एकादशीला जातो असे मला होते. अहो, माझ्यासारखी अशी वारीची उत्कटता ज्यांना असते, ज्यांना पंढरीची पराकोटीची ओढ असते, त्यांची तो विठ्ठलही तेवढय़ाच उत्कटतेने वाट पाहात असतो. संपदा सोहळा, नावडे मनाला | लागला टकळा | पंढरीचा || जावें पंढरीसी, आवढी मनासी | कधीं एकादशी | आषाढी ये हें || तुका म्हणे ऐसें, आर्त ज्याचे मनीं | त्याची चक्रपाणी | वाट पाहे || घरातल्यांपासून गावातल्यांपर्यंत सगळे म्हणतात की, मी संसाराबद्दल पार उदास झालो आहे. मला संपत्तीबद्दल,संसाराबद्दल काहीच मायामोह उरलेला नाही. ते म्हणतात ते खरेच आहे. मी खरोखरच सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग केला आहे. पण तो करण्यामागे मी फायदाच पाहिला आहे. पंढरीची वारी केली तर मोक्षासारखा श्रेष्ठतम लाभ होतो. हा फायदा मी डोळ्याआड कसा करणार ? मी त्याचा अनुभव घेतला आहे. पटले तर तुम्ही सार्यांनी तो अनुभव घ्या. माझ्याबरोबर तुम्हीही चला. चंद्रभागेचे नुसते दर्शन घेतले ना, तरी सगळ्या तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्य घडते, फळ मिळते. एका पुंडलिकाचे दर्शन घेणे हे सर्व संतांना भेटण्यासारखे आहे आणि त्या वीटेवरच्या लबाडाचे दर्शन घेतले ना की कसे जन्माचे सार्थक होते, धन्य धन्य वाटते. मग काय चलणार ना पंढरीच्या वारीला ? अहो, शरीराने नाही, तर निदान मनाने तरी |