जाय नेमे पंढरीसी । चुको नेदी तो वारीसी ।।2।।
आषाढीसी कार्तकी । सदा नाम गो मुखी ।।3।।
एका जनार्दनी करी वारी ।
धन्य तोचि बा संसारी ।।4।।’
जीवन धन्यतेची कारणेही त्यांनी आणखी सांगितली आहेत. कोणती म्हणाल? तर न चुकता पंढरीची वारी करणारा वारकरी तर धन्य होतोच. मुखीनाम आणि वाटचाल सन्मार्गाची हीच जर त्याची आचारप्रणाली असेल, तर त्यातून प्राप्त होणारे सुख-समाधान आणि शांती हीच तर त्याचे जीवन धन्य करते. शिवा दुसरे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे देव नि भक्त या वारीच्या निमित्त एकत्र येतात. भक्त भक्तिमध्ये काहीजण संतही असतात. त्यांची सत्संगती तिथे समूहरूपाने प्राप्त झाल्याने विठ्ठलनामाचे विस्मरण होत नाही. तसेच तिथे सुरू असणार्या भजन-कीर्तनातून भक्तिभाव उचंबळून येतो. तो मनावर ठसतो.‘भक्त येती लोटांगणी। दैव पुरवी मनोरथ मनी’ त्यामुळेच भक्त त्याचेपायी मिठी घालतो. त्यांनी म्हणूनच-‘माझे माहेर पंढरी । विठ्ठल उभा विटेवरी ।।1।।
संत मिळाले अपार । करिताती जयजयकार ।।2।।
टाळ घोष पताका । नाचतात वैष्णव देखा ।।3।।
विठ्ठलनामे गर्जती । प्रेम भरीतनाचती ।।4।।
एका जनार्दनी शरण । विठ्ठलनामे लाधे पूर्ण ।।5।।
हा ‘कृपालाभ’ महत्त्वाचा.
प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे