रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2016 (12:40 IST)

संसार सुफळ झाला गे माय

वारकर्‍यांचा बावीस दिवसांचा प्रवास संपला आणि ते पंढरपुरात पोहोचले आहेत. एखादी सासूरवाशीण आपल्या माहेरात पोहोचल्यानंतर तिला जितका आनंद होतो त्याच्यापेक्षाही जास्त आनंद वारकर्‍यांना पंढरपुरात पोहोचल्यानंतर होतो. पंढरपूरची वारी म्हणजे निष्काम भक्तीचा अलौकिक सोहळा आहे. अन्यही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक मोठय़ा संख्येने जातात. मात्र तिथे जाणार्‍या भाविकांच्या मनात कोणती ना कोणती अभिलाषा असते. काही ठिकाणी गेल्यानंतर आपल्या संसारातील दु:ख नाहीशे होण्याची आशा असते, काही ठिकाणी धन-प्राप्तीची अभिलाषा असते. मात्र पंढरपूरच्या वारीत येणार्‍या वारकर्‍याची पांडुरंगाकडून कोणतीच अपेक्षा नसते. ज्याप्रमाणे सासूरवाशिणीला आपल्या   माहेराकडून कोणतीच अपेक्षा नसते. आपल्या आईच्या गळ्यात पडावं, वडिलांनी आला-पाला घ्यावी.. एवढीच माफक अपेक्षा तिची असते. तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ ही अशीच पराकोटीची होती. म्हणूनच ते म्हणतात - कन्या सासुर्‍याशी जाय । मागे परतोनी पाहे । तैसे झाले माझ्या जीवा । केव्हा भेटशी केशवा ।। हीच अवस्था सर्व वारकर्‍यांची झालेली असते. त्यांना एकच अपेक्षा असते ती म्हणजे फक्त त्या विठ्ठलाचं दर्शन व्हावं, ते सावळं-सगुणरूप आपल्या डोळ्यात साठवावं. त्याचं दर्शन हा त्यांच्यासाठी आनंदाचा मोठा ठेवा असतो. कारण विठेवर उभा असणारा हा पांडुरंग हाच सुखरूप असल्याची वारकर्‍यांची श्रध्दा असते. म्हणूनच तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात-
 
सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा ।
 
माझ पांडुरंगा सारिखा तो ।
 
माझ्या पांडुरंगासारखं सुखरूप कोण आहे ते सांगा असे आवाहनच तुकाराम महाराज देतात. पांडुरंग नुसता सुखरूपच नाही तर सर्व सुखाचे आगर आहे असे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात - सर्व सुखाचे आगर । बाप रखुमा देवीवर । या पांडुरंगाला पाहिल्यानंतर किती सुख प्राप्त होते याचे वर्णन करताना तुकाराम महाराज एकाठिकाणी म्हणतात-
 
पाहता श्रीमुख सुखावले सुख । डोळियाची भूक न वजे माझ्या । या पांडुरंगाला पाहिल्यानंतर सुखालाही सुख प्राप्त होते. जिथे सुखाच्या   सुखाची अपेक्षा पूर्ण होते तेथे इतरांचे काय? म्हणून या पांडुरंगाच्या भेटीच्या आवडीने सर्व पंढरपूरच्या दिशेने जातात. नुसते हे वारकरी स्वत: पंढरपूरला जातात असे नाही तर जी मंडळी सुखासाठी तळमळ करीत आहेत.
 
दु:खामध्ये होरपळून निघत आहेत. त्यांनाही हे वारकरी सल्ला देतात की, सुखासाठी करीशी तळमळ । तरी तू पंढरीशी जा एकवेळ ।। मग तू अवघाची सुखरूप होशी । जन्मजन्मोची दु:ख विसरलाशी ।।
 
पांडुरंगाच्या भेटीसाठी अशा तर्‍हेने आतुर झालेल्या वारकर्‍यांचीही अवस्था पाहिल्यानंतर अनेकांना प्रश्न पडेल की वारकर्‍यांनात त्या विठ्ठलाची भेटीची ओढ आहे की त्या विठ्ठलालाही वारकर्‍यांच्या भेटीची अपेक्षा असते. एकटय़ा वारकर्‍यांना भेटावे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु त्या पांडुरंगाला जर यांची भेट आवडत नसेल तर.. वारकर्‍यांची भक्ती एकतर्फी आहे का, असा प्रश्न पडू शकतो. तुकाराम महाराज त्यांच्या शंकेचे निरसन करताना म्हणतात- संसाराला आलेल लोकांनो पंढरीला जा. कारण तो पांडुरंग तुमच भेटीच अपेक्षेने उभा आहे. 
 
पंढरीशी जा रे आलनो संसारा ।
 
दिनाचा सोसा पांडुरंग ।।
 
वाट पाहे उभा भेटीची आवडी ।
 
कृपाळू तातडी उतावेळ ।।.
 
तो सुध्दा मोठय़ा आवडीने तुमची वाट पाहात आहे. नव्हे नव्हे तो तुमच्या भेटीसाठी उतावीळ झालेला आहे. कारण देव भक्तांपासून वेगळा राहू शकत नाही. याबाबत भागवताच्या दशमस्कंदामध्ये फार सुंदर प्रसंग पाहायला मिळतो. भगवान गोपाल कृष्ण गोपाळांना नेहमी आपल्या गायी सांभाळायला लावायचा. सर्व गोपाळही निमूटपणे च्यांच सर्व ऐकाचे. खरं बळीराम दादा हे भगवंतांचे मोठे भाऊ होते. पण त्यांच्या   काही कोणी ऐकाचं नाही. हे काही दादांना सहन व्हायचं नाही. मग एके दिवशी त्यांनी सर्व गोपाळांना वेगळं करून कुणाच्या विरोधात बहकवले. तो तुमचकडून कामे करून घेतो, तुमच्या चांगल शिदोर्‍या खातो.
 
आपण आज गायी घेऊन त्याच्या सोबत जायचे नाही तर वेगळ्या बनात जायचे. त्या प्रमाणे गोपाळ एके दिवशी ज्या जंगलात कृष्ण आपल्या गाई चारायला गेला आहे त्या बनात न जाता दुसर्‍या बनात जातात. कृष्णाला हे कळल्यानंतर तो ज्या बनात गोपाळ गेले आहेत त्या बनात जातो. मात्र गोपाळ त्याला आपल्यात घेत नाहीत. त्याच्या गायी आपल्या गायीत मिसळू देत नाहीत. त्याला आपल्या सोबत खेळायला घेत नाहीत. गोपाळांनी आपल्याला वेगळं टाकलं आहे, हे कळल्यानंतर देव कासावीस होतो आणि गोपाळांना विनंती करतो. अरे मला असे वेगळे टाकू नका. त्याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात-
 
काकुळती येतो हरी। क्षणभरी निवडिता।।
 
क्षणभर जरी देवाला वेगळं केलं तरी तो भक्तांपासून वेगळा राहू शकत नाही. म्हणून वाट पाहे उभा भेटीची आवडी. या पांडुरंगाकडे गेले की सुख मिळते म्हणून सर्वजण जातात. परंतु विश्वात्मक दृष्टिकोन असलेले आणि विश्वासाच्या सुखाचा विचार करणारे ज्ञानेश्वर महाराज मात्र आपल्या एकटय़ाच्या सुखाची सोय पाहात नाहीत. तर संपूर्ण संसार (जग) सुखमय करून टाकील अशी प्रतिज्ञा करतात. मग महाराजांना लोकांनी प्रश्न केला की तुम्ही संपूर्ण जग सुखमय करण्याचा विचार करत आहात, परंतु ते तुम्हाला कसे शक्य होईल. त्याच्यासाठी तुम्ही काय साधन वापरणार आहात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात..
 
अवघाची संसार सुखाचा करीन।
 
आनंदे भरीन तीही लोक।
 
जाईन गे मो ता पंढरपुरा
 
भेटेन माहेरा आपुलिया।।
 
ज्ञानेश्वर महाराज अशी संपूर्ण जगाला सुखरूप करण्याची प्रतिज्ञा करीत असताना एकनाथ महाराज तर म्हणतात माझ्या दृष्टीने संपूर्ण त्रैलोक्य आता सुखरूप झाले आहे. ते लोकांनी त्यांना विचारलं की त्रैलोक्य सुखमय झाल्याची अनुभूती तुम्हाला केव्हा मिळाली. तेव्हा एकनाथ महाराज सांगतात-
 
अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता।
 
चरणी जगन्नाथा चित्त ठेले।
 
त्या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं. असं वारकरी संप्रदायातील प्रत्येक संताने पांडुरंगाच्या भेटीची आवड व्यक्त केलेली आहे. त्यांच्यावर श्रध्दा ठेवून भाविक पंढरपूरला येऊन त्या पांडुरंगाचे दर्शन घेतात. त्या देवावर इतकं निष्काम लोकांचं प्रेम असायचं कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रत्येक देवाला आपलं आपलं असं शास्त्र आहे. याचाच अर्थ त्या देवांनी काहींचं रक्षण केलेलं असताना काहींचा संहार केलेला आहे. या देवाच्या हातात एकही शस्त्र नाही. त्याने कुठला चमत्कार केल्याची उदाहरणे नाहीत. हेच या देवावर भक्तांच्या असलेल्या निस्सीम प्रेमाचं कारण आहे. केवळ करुणा हाच त्याचा आद्य ठेवा आहे. म्हणून त्याकडे येणारा भाविक कोणत्याही अपेक्षेने येत नाही. म्हणूनच कोणतीही अपेक्षा भंग होत नाही. या पालखी सोहळ्याकडे सुखाचा सोहळा म्हणून पाहिले जाते. आज अनेकाकडे पैसा आहे, ऐश्वर्य आहे, गाडय़ा आहेत, बंगले आहेत परंतु सुखाची आणि त्यांची मात्र भेट होत नाही. अशी संसाराने गांजलेली माणसे या पालखी सोहळ्यात येऊन सुखाचा शोध घेताना दिसतात. म्हणून पंढरपूरला जाणार्‍या पालखी सोहळ्याला एकवेळच्या  जेवणाची चिंता असणार्‍या गरिबापासून ते कुबेराशी स्पर्धा करणार्‍या श्रीमंतापर्यंत सर्व स्तरातील लोक या वारीत सहभागी होतात. जात, धर्म, गरीब, श्रीमंत हे सर्व भेद इथे नष्ट झालेले असतात. सर्वाना केवळ त्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली असते. या सोहळ्यातील प्रत्येक  चराचर विठ्ठलम झालेले असते.
 
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडी उच्चारा।
 
विठ्ठल अवघा भांडवला। विठ्ठल बोलावा विठ्ठल।।
 
अशी त्यांची अवस्था झालेली असते. विठ्ठलाच्या ओढीने बावीस दिवसांचा प्रवास करून वारकरी पंढरपुरात पोहोचतात आणि जेव्हा त्या  सावळ्या सगुण पांडुरंगाचे दर्शन त्यांना होते तेव्हा त्यांच्या मुखातून आपोआपच अभंग बाहेर पडतो-
 
आजी संसार सुफळ झाला गे माय।
 
देखियेले पाय विठोबाचे।।

ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर