रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. चंद्रावर पाणी
Written By वेबदुनिया|

चंद्रावर 'बॉम्बस्फोट' !

ND
ND
'नासा' या अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावर पाणी शोधण्याच्या दृष्टिने एक महत्त्वाचा प्रयोग करताना चक्क चंद्राच्या पृष्ठभागावर बॉम्बस्फोट घडवून आणला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्वालामुखीच्या मुखात हा स्फोट घडवून आणला. यातून पृष्ठभागात रूतून बसलेल्या बर्फाळ पाण्याचा शोध लागेल असा अंदाज आहे.

आज अमेरिकेतील ११ वाजून ३१ मिनिटांनी २.३ टनी रॉकेट चंद्राच्या ज्वालामुखीमय पृष्ठभागावर जाऊन आदळले. त्यामागून गेलेल्या अन्य एका यानाने या स्फोटानंतर उडालेल्या धुराळ्यातून जात आवश्यक ती माहिती गोळा केली. नासाने हा अवकाशातील महत्त्वपूर्ण 'सोहळा' इंटरनेटवरून लाईव्ह दाखवला. चंद्रावर घडणार्‍या या घडामोडीची माहिती घेण्यासाठी जगभरातील अभ्यासूंच्या दुर्बिणी आज चंद्राच्या दिशेने रोखल्या गेल्या होत्या.

चंद्रावर पाणी असल्याचा शोध भारताने पाठवलेल्या चांद्रयानाद्वारे गोळा केलेल्या माहितीतून लागला आहे. हे पाणीही अपेक्षेपेक्षा बरेच असल्याचेही समजले आहे. त्यामुळे आता या पाण्याविषयी अधिक माहिती मिळविण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न आहेत. त्याअंतर्गतच हा स्फोट घडविण्यात आला.

चंद्रावरील ज्वालामुखीच्या मुखात हे पाणी बर्फाळ स्वरूपात असावे असा अंदाज आहे. या पाण्यापर्यंत आजपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे या पाण्याचे अतिशय कठीम अशा बर्फात रूपांतर झाल्याची शक्यता आहे. हा स्फोट हे पाणी बाहेर काढेल अशी शास्त्रज्ञांना अपेक्षा आहे.