बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 22 ऑगस्ट 2021 (17:31 IST)

अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत - यशोमती ठाकूर यांचा आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार आम्हाला साथ देत नाहीत, असा आरोप महिला आणि बालकल्याण मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
 
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात आयोजित अन्यायग्रस्त शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी म्हटलं, "बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. त्यांना 450 रुपये मिळत होते. आपण काही काळापूर्वी 1125 रुपये केले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की, किमान त्यांना कमीतकमी 2500 रुपये त्या लेकरांना द्यायला हवे. तसा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आम्ही पाठवलेला आहे."
यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बघत त्या पुढे म्हणाल्या, "उपमुख्यमंत्री साहेब आम्हाला जशी पाहिजे तशी साथ देत नाहीयेत. तुम्ही जोर लावला तर ती साथ मिळेल."
महाविकास आघाडी सरकारमध्ये डावललं जात असल्याचं काँग्रेस नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. त्यातच आता यशोमती ठाकूर यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 
याविषयी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू जाणून घेतली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य मिश्किल पद्धतीनं केलं आहे. त्याला फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही.
 
"कोरोनामुळे राज्याच्या वित्त विभागाची अवस्था काही कुणापासून लपून राहिलेली नाही. ही अवस्था जशी सुधारेल तसं त्यांनी पाठवलेल्या प्रस्तावावर विभाग विचार करेल."