शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (15:34 IST)

ब्रेस्ट कॅन्सर : गर्भपातात जे बाळ गेलं, त्यानंच मला वाचवलं

lara
डेबी जॅक्सन
social media
गर्भपातात जे बाळ गेलं ते आपल्यासाठी देवदूतच होतं, असं स्कॉटलँडच्या एका ब्युटिशियननं म्हटलं आहे. या गर्भपातामुळे तिला एकदम गंभीर ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं समजलं.
 
लॉरा स्ट्रॅदर्न आणि तिचे पती फ्रेजर हे आपण आईबाबा होणार म्हणून अत्यंत आनंदी होते. मात्र गर्भपात होऊन मूल गेल्यावर हाच आनंद त्यांच्यासाठी दुःखाचा महापूर घेऊन आला.
 
गर्भपात झाल्यावर उपचार घेताना तिला कर्करोग असल्याचं निदान झालं. हा कॅन्सर वाढलेला होता आणि गरोदरपणासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या इस्ट्रोजेन हार्मोनवर वाढलेला दिसला.
 
बीबीसी स्कॉटलँडच्या द नाईन प्रोग्रॅममध्ये बोलताना लॉराने आमच्या बाळानंच माझा जीव वाचवला असं विधान केलं.
 
35 वर्षांच्या लॉरा म्हणाल्या, "या प्रकारची गाठ इस्ट्रोजेनवर वाढत असते. त्यामुळे जर मी तेव्हा गरोदर झाले नसते तर त्याची वाढ झालीच नसती (आणि हा कर्करोग असल्याचं लक्षातच आलं नसतं)."
 
"त्यावेळेस हे सगळं धक्कादायक उद्ध्वस्त करणारं वाटत होतं. पण आता समुपदेशकांशी बोलल्यावर माझी समजूत पटली आहे. असं झालं नसतं तर मी आता इथे नसतेच."
 
सप्टेंबर 2020मध्ये लॉरा गरोदर राहिल्या. 12 आठवड्यांनी करायची आरोग्य तपासणी डिसेंबरमध्ये येत होती. त्यावेळेस बाळाच्या हृदयाचे ठोके लागत नव्हते. त्यानंतर काहीच दिवसांत तिचा गर्भपात झाला.
 
लॉरा या नेहमीच स्वतःच्या करिअरमध्ये व्यग्र असायच्या. त्यांना यातून बरं व्हायला काही वेळ सुटी घ्यावी लागली. आपल्या स्तनावर एक निळसर वाहिनी दिसल्यावर त्यांना याचा उलगडा झाला.
 
डॉक्टरकडे जाण्यासाठी त्या ख्रिसमस संपण्याची वाट पाहात होत्या. आणि नंतर त्यांना डॉक्टरांनी गार्ट्नावेल या ग्लासगोतील ब्रेस्ट क्लिनिकमध्ये पाठवलं तेव्हा लॉरा यांना धक्काच बसला.
 
जानेवारी 2021मध्ये त्यांची अल्ट्रासाऊंड चाचणी झाली. तेव्हाही त्यांना फार गांभीर्य समजलं नव्हतं.
 
लॉरा सांगतात, डॉक्टरांना अजूनही तिथं काही भयंकर घडतंय असं वाटलं नव्हतं. इतकं काही भयंकर असेल असं वाटलं नव्हतं.
 
पण जेव्हा तपासणीचा अहवाल घ्यायला लॉरा हॉस्पिटलात परत गेल्या तेव्हा मात्र त्यांना जबर धक्का बसला.
 
त्या सांगतात, हे सगळं कोरोनाची साथ सुरू असताना चालू होतं. माझे पती बाहेर थांबले होते. मला वाटलं आपण तपासणी अहवाल लगेच घेऊन बाहेर पडू. पण तेव्हाच मला ही वाईट बातमी मिळाली. ती मला आजिबातच अपेक्षित नव्हती.
 
मला अजूनही आठवतं डॉक्टर वेटिंग रुममध्ये आले. तेव्हाच मला चांगली बातमी नसल्याचं लक्षात आलं. त्यांनी मला आतल्या त्यांच्या खोलीत नेलं, आणि म्हणाल्या, तुला बातमी
 
सांगण्याची सोपी पद्धत कोणतीच नाही, तुला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे.
 
माझं सगळं जग तिथंच कोलमडून पडलं.
 
एमआरआय आणि सीटी स्कॅनमध्ये स्तनाच्या लसिका ग्रंथींमध्ये कॅन्सर पसरल्याचं पण तिथंच केंद्रीत असल्याचं दिसलं.
 
सुरुवातीच्या काळात गाठ मोठी असल्यामुळे ऑपरेशन शक्य नव्हतं. त्यामुळे केमोथेरपीने उपचार सुरू झाले. 18 आठवड्यांत 6 वेळा किमोथेरपी देण्यात आली. त्यानंतर 10 तासांचं मोठं ऑपरेशन झालं आणि मग शेवटी या जोडप्याला सुटकेचा निःश्वास टाकता येईल अशी बातमी मिळाली.
 
लॉरा सांगते, तो तिसऱ्या स्टेजचा कर्करोग होता. परंतु माझ्या शरीरातला सर्व कर्करोग काढून टाकण्यात यश आलं. माझ्या त्या न जन्मलेल्या बाळानं मला वाचवलं असं मला सांगण्यात आलं.
 
त्या बाळाला लॉरा आणि फ्रेझर देवदुतच मानतात. ती गरोदर राहिली नसती तर कर्करोग समजलाच नसता.
 
लॉराचे उपचारही अत्यंत गहन, सखोल असे होते, त्यासाठी तिला ग्लासगोच्या मॅगीज कॅन्सरकेअर सेंटरची मदत मिळाली.
 
आता ती त्या मदतीची काहीतरी परतफेड करू पाहातेय.
 
आता इतर महिला पेशंटसना ती उपचारादरम्यान बरं वाटावं, रिलॅक्स वाटावं यासाठी ती मदत करते.
 
"मॅगीज कॅन्सरकेअर सेंटर अत्यंत सुंदर आहे. मला आठवतंय, तिथे फिरताना मला मोकळा श्वास घेऊ शकत होती. तिथले कर्मचारी पृथ्वीवरचे देवदूतच आहेत, असं मला वाटतं."
 
"तिथं उपचार घेत असलेल्या लोकांशी मी बोलू शकले. तिथले लोक मला माझ्या भुवया, डोळ्यांबद्दल विचारायचे. मी त्यांच्या प्रश्नांबद्दल खूप विचार करत असे."
 
लॉरा मॅगीज कॅन्सरकेअर सेंटरमधील क्लायंट्सना भुवयांचे कायमस्वरूपी टॅटू काढून देते.
 
त्या सांगतात, "माझे केस गळल्यामुळे मला माहित आहे की, यामुळे तुम्हाला किती त्रास होतो. भुवया असणं हे खरंच महत्त्वाचं आहे. आता मी माझ्या या कामाकडे लोकसेवा म्हणून पाहते. लोक माझ्याकडे येऊन ब्रो ट्रीटमेंट, इंडियन हेड मसाज, फेशियल, ट्रीटमेंट करू शकतात."
 
"हा खूप कठीण काळ आहे. अगदी मृत्यूला सामोरे जाण्यासारखा. कॅन्सरशी झुंज देताना तुम्ही आरशात पहिल्यावर स्वत:लाही ओळखणं कठीण होऊन बसतं."
 
लॉरा आता महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आणि चुकीच्या वाटणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करतात.
 
"जो कोणी स्वत:कडे पाहतो आणि काहीतरी वेगळे आहे असे वाटते, तर मी त्यांना ते तपासणीसाठी प्रोत्साहित करते."
 
लॉरा यापुढेही स्वतःची तपासणी करत राहणार आहेत आणि दरवर्षी मॅमोग्रामही करणार आहेत. पूर्ण बरी होऊन चमत्काराची वाट पाहतायेत.
 
"माझ्यासाठी पूर्ण तब्येत बरी होऊन, मूळ स्थितीत परतणं महत्त्वाचं आहे. केमोथेरपी अवघड आहे आणि तुमच्या शरीराला केमोथेरपीचा त्रास होतो."
Published By -Smita Joshi