शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 6 जुलै 2019 (12:32 IST)

जेव्हा महात्मा गांधी मॉब लिंचिंगमधून थोडक्यात बचावले होते

अव्यक्त
2007 साली आलेला प्रसिद्ध चित्रपट 'द ग्रेट डिबेटर्स' आठवतो का?
 
कृष्णवर्णीय लोकांची एक कॉलेज टीम 1930च्या दशकात हॉर्वर्ड विद्यापीठाच्या अहंकारी श्वेतवर्णीय टीमचा एका वादविवाद स्पर्धेत पराभव करते असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
 
गांधी आणि जमावाच्या हातून घडणाऱ्या हिंसेच्या संदर्भात या चित्रपटाची चर्चा कशी प्रस्तुत ठरू शकते असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो.
 
त्यामागचं कारण असं की या चित्रपटात त्या काळात अमेरिकेतल्या दक्षिण प्रांतात गोऱ्या अमेरिकन नागरिकांच्या जमावाच्या हातून कृष्णवर्णीय आफ्रिकी अमेरिकनांच्या हत्या किंवा लिंचिंगचं मार्मिक चित्र दाखवण्यात आलं होतं.
 
लिंचिंगच्या करूण संदर्भाच्या छायेत श्वेतवर्णीय अहंकाराने ग्रस्त हार्वर्डच्या (खऱ्या इतिहासात साउथ कॅलिफोर्निया विद्यापीठ) वक्त्यांना पराभूत करत त्यांच्या माणूसपणाच्या प्रबोधनासाठी कृष्णवर्णीय वक्ते वारंवार महात्मा गांधी यांचं नाव आणि त्यांच्या विचारांचा आधार घेतात. अशा प्रकारे संपूर्ण सिनेमात 9 वेळा लिंचिंग तर 11 वेळा महात्मा गांधी यांचं नाव घेण्यात आलं आहे.
 
विशेष म्हणजे त्या काळात महात्मा गांधी इथे भारतातही अशाच मानवतावादी प्रश्नांवर भारतीय आणि ब्रिटिशांचं एकत्र प्रबोधन करत होते. 1931 मध्ये कुणीतरी महात्मा गांधी यांना पत्र लिहिलं होतं. त्यात अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीला जमावाने जिवंत जाळल्याबाबत 'लिटररी डायजेस्ट'मध्ये छापून आलेल्या बातमीचं कात्रणही पाठवलं होतं.
 
पत्र लिहिणाऱ्याने गांधींना म्हटलं होतं की एखादा अमेरिकी पाहुणा तुम्हाला भेटायला आला आणि तुमच्याकडे त्याच्या देशासाठी एखादा संदेश मागितला, तर तुम्ही त्याला हाच संदेश द्या की त्यांनी तिथे होणाऱ्या कृष्णवर्णीयांच्या हत्या थांबवाव्यात.
 
14 मे 1931रोजी महात्मा गांधी यांनी या पत्राच्या उत्तरादाखल 'यंग इंडिया'मध्ये लिहिलं - 'अशा घटनांविषयी वाचल्यावर मन उदास होतं. मात्र, अमेरिकेतली जनता या वाईट प्रवृत्तीविषयी पूर्णपणे जागरुक आहे आणि अमेरिकी जीवनातला हा कलंक दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे, यात मला तिळमात्र शंका नाही.'
 
आजचा अमेरिकन समाज बऱ्याच प्रमाणात त्या झुंडशाहीतून खरोखर मुक्त झाला आहे. लिंचिंग हा शब्द आला आहे विल्यम लिंच या नावावरून. विल्यम लिंच नावाचा एक अमेरिकन कॅप्टन होता. या अमेरिकी कॅप्टनच्या स्वभावावरून पडलं होतं.
 
मात्र, या घटनेच्या 90 वर्षांनंतर हे आपलं दुर्भाग्य आहे की आपण आज भारतात जमावाकडून हत्या होण्याची वृत्ती आणि घटना यावर चर्चा करतोय आणि आपल्याला पुन्हा एकदा गांधींची आठवण होतेय.
 
गांधींजींवर झाला होता हल्ला
हा विचित्र योगायोगच म्हणावा लागेल की 1931च्या 34 वर्षं आधी 13 जानेवारी 1897 रोजीच स्वतः गांधींजींचा जीव जमावाच्या हातून कसाबसा वाचला होता. दक्षिण आफ्रिकेतल्या डरबन शहरात जवळपास 6000 इंग्रजांच्या संतप्त जमावाने महात्मा गांधी यांना घेराव घातला होता.
 
त्यांना त्यांच्या नेत्याने इतकं उत्तेजित केलं होतं की महात्मा गांधी यांना बेदम मारहाण करून त्यांना ठार करायची या जमावाची इच्छा होतं. महात्मा गांधी यांनी त्यांच्या आत्मकथेत आणि इतर अनेक प्रसंगी या घटनेचं सविस्तर वर्णन केलं आहे.
 
संतापलेल्या जमावाने आधी गांधीजींवर दगड आणि सडलेली अंडी फेकली. यानंतर कुणीतरी त्यांची टोपी उडवली. यानंतर हाथ आणि पायांनी बेदम मारहाण करायला सुरुवात झाली. गांधी जवळपास बेशुद्ध होऊन पडले होते. तेवढ्यात एका इंग्रज स्त्रीनेच पुढे येऊन त्यांचे प्राण वाचवले होते.
 
यानंतर पोलिसांच्या देखरेखीत गांधीजी कसेबसे त्यांचे मित्र पारसी रुस्तमजी यांच्या घरी पोचले खरे. मात्र, हजारो लोकांच्या जमावाने त्या घरालाही घेरलं. जमाव मोठमोठ्याने ओरडत होता, 'गांधींना आमच्या ताब्यात द्या.' तो जमाव त्या घराला पेटवून देणार होता. त्यावेळी त्या घरात लहान मुलं आणि स्त्रिया मिळून एकूण 20जणांच्या आयुष्याचा प्रश्न होता.
 
वेशांतर करून पलायन
तिथले पोलीस सुप्रिटेंडंट अलेक्झांडर स्वतः इंग्रज असूनही गांधीजींचे हितचिंतक होते. त्यांनी गांधींना वाचवण्यासाठी एक खास युक्ती लढवली. त्यांनी गांधींना एका भारतीय शिपायाचे कपडे घातले आणि अशा प्रकारे वेश बदलून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मात्र, इकडे घराबाहेर जमलेल्या जमावाचं लक्ष विचलित करण्यासाठी हे पोलीस अधिकारी स्वतः त्या जमावाला सामोरे गेले आणि त्यांना एक हिंसक गाणं गाण्यासाठी उद्युक्त केलं. गाण्याचे शब्द होते -
 
'हँग ओल्ड गांधी
 
ऑन द सोअर अॅपल ट्री
 
याचा मराठी अर्थ काहीसा असा होईल -
 
'चला आपण म्हाताऱ्या गांधीला फाशीवर लटकवू या
 
त्या झाडावर फाशी देऊ या'
 
यानंतर अलेक्झँडर यांनी जमावाला सांगितलं की तुम्ही ज्याच्यावर हल्ला करायला आला आहात त्या गांधीने तर इथून सुरक्षित पळ काढला आहे. हे ऐकून काहींना खूप राग आला. काहींना हसू आलं आणि अनेकांचा तर विश्वासच बसला नाही. मात्र, त्या जमावाच्या एका प्रतिनिधीने घरात जाऊन झडती घेतली आणि बातमी खरी असल्याचं सांगितलं तेव्हा निराश होऊन आणि मनोमन संतप्त होऊन तो जमाव पुन्हा पांगला.
 
गांधींच्या आयुष्यातल्या या सत्य घटनेत दोन बाबी लक्ष देण्यासारख्या आहेत. पहिली ही की त्यांच्यावर हल्ला करणारा जमाव इंग्रज होता आणि त्यांना वाचवणारी माणसंही इंग्रजच होती. दुसरी बाब अशी की इंग्रज पोलीस अधिकाऱ्याने प्रक्षोभक जमावाच्या हिंस्त्र मानसिकतेला ओळखून एका मानसशास्त्रज्ञाप्रमाणे गांधींना फासावर लटकवण्याविषयीचं गाणं म्हणून घेतलं ज्यामुळे त्यांच्या डोक्यावर असलेलं हिंसेचं भूत मनोरंजक पद्धतीने उतरवलं गेलं. त्यांनी दाखवून दिलं की मूर्खांच्या जमावालाही हुशारीने हाताळून एखाद्याचा जीव वाचवला जाऊ शकतो.
 
मात्र, विरोधाभास असा की या घटनेच्या जवळपास 22 वर्षांनंतर 10 एप्रिल 1919 रोजी गांधी यांना अटक झाल्याची बातमी पसरल्यानंतर अहमदाबादमध्ये एका हिंसक जमावाने संपूर्ण शहरात आगी लावल्या, दंगल भडकवली. इतकंच नाही तर एका इंग्रज व्यक्तीला ठार केलं.
 
अनेक इंग्रजांना बेदम मारहाण करून त्यांना जखमी किंवा अपंग केलं. गांधींसोबत अनसूयाबेन यांनाही अटक झाल्याची अफवा पसरली, हे देखील जमाव संतप्त होण्यामागचं एक तात्कालिक कारण ठरलं. गांधींना हे कळताच ते ढसाढसा रडले.
 
ज्या गांधींनी डरबनमध्ये त्यांच्यावर चालून आलेल्या संतप्त जमावाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायलाही नकार दिला होता त्यांनाच अटक झाल्यावर भारतीयांच्या एका हिंसक जमावाने एका निर्दोष इंग्रजाला ठार केलं होतं. त्यामुळेच जमावाच्या या मानसिकतेचा गांधीजींनी अगदी तटस्थपणे अभ्यास सुरू केला होता.
 
गांधीजींनी सार्वजनिक आंदोलनादरम्यानही स्वयंसेवकांची हुल्लडबाजी बघितली होती. त्यांच्या सभांमध्ये अनियंत्रित जमावाकडून होणारा गोंधळ, अगदी सामान्य बाब होती.
 
जमावाच्या हिसेंच्या विरोधात गांधीजी
त्यामुळेच अखेर गांधीजींनी 8 सप्टेंबर 1929 रोजी 'यंग इंडिया'मध्ये लिहिलं - "मी स्वतः सरकारचा उन्माद आणि संतापाचा तेवढा विचार करत नाही जेवढा जमावाच्या क्रोधाचा करतो. जमावाची मनमानी राष्ट्रीय आजाराचं लक्षण आहे. सरकार तर केवळ एक छोटीशी संघटना आहे. ज्या सरकारने स्वतःला राज्य करण्यास अयोग्य सिद्ध केलं असेल तिला बाजूला सारणं सोपं आहे. मात्र, एखाद्या जमावात सहभागी असलेल्या अनोळखी लोकांच्या मूर्खपणावर उपचार करणं कठीण आहे."
 
असं असलं तरी सप्टेंबर 1920 च्या लेखात गांधीजींनी आपल्या या विचारांचा पुनर्विचार करत लिहिलं, "माझ्या समाधानाचं कारण हे आहे की जमावाला प्रशिक्षित करण्यासारखं दुसरं सोपं काम नाही. कारण फक्त एवढंच आहे की जमाव विचारी नसतो. त्यांच्या हातून आवेशाच्या अतिरेकात एखादं कृत्य घडून जातं आणि त्यांना लगेच पश्चातापही होतो. मात्र, आपल्या सुसंघटित सरकारला पश्चाताप होत नाही - जालियांवाला, लाहौर, कसूर, अकालगढ, रामनगर अशा ठिकाणी केलेल्या आपल्या दुष्ट गुन्ह्यांसाठी ते खेद व्यक्त करत नाही."
 
"मात्र, गुजरांवाला घटनेचा पश्चाताप असणाऱ्या जमावाच्या डोळ्यात मी अश्रू आणले आहेत आणि इतर ठिकाणीही मी जिथे गेलो, तिथे एप्रिल महिन्यात जमावात सामील होऊन गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या (अमृतसर आणि अहमदाबादमध्ये जमावाद्वारे दंगल आणि इंग्रजांची हत्या करणाऱ्या) लोकांकडून मी सार्वजनिकरित्या पश्चाताप करवला आहे," गांधीजी लिहितात.
 
असं म्हणता येईल की आपल्यात आज गांधीजींसारखी माणसं नाहीत. अशी माणसं जी आपल्या नैतिक ताकदीच्या जोरावर कुठल्याही जमावाला शांत करण्याची क्षमता ठेवून आहेत. आपल्यात नेहरुंसारखी माणसं नाही जी संभाव्य दंगलखोरांच्या जमावात एकट्याने उडी घेऊ शकतील.
 
आपल्यात लोहियांसारखी माणसंही नाहीत जी एका मुस्लिमाला वाचवण्यासाठी दिल्लीतल्या जमावाचा एकट्याने सामना करतील? आपल्यात विनोबाजींसारखे संत-महात्मेही नाहीत ज्यांच्यासमोर क्रूर समजले जाणारे बंडखोरदेखील आपली शस्त्रं टाकतील.
 
मात्र, गांधीजींनी 22 सप्टेंबर 1920 रोजी 'यंग इंडिया'मध्ये लिहिल्याप्रमाणे, "केवळ थोड्या बुद्धिमान कार्यकर्त्यांची गरज आहे. ते मिळाले तर संपूर्ण राष्ट्राला बुद्धीपूर्वक काम करण्यासाठी संघटित करता येऊ शकतं आणि जमावाच्या अराजकतेऐवजी योग्य लोकशाहीचा विकास करता येऊ शकतो."
 
मात्र, एकच अडचण आहे की स्वतः सरकारांनीच अशा कार्यकर्त्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्यावर खोटे खटले दाखल करू नये किंवा त्यांना धमकावू नये. तर दुसरीकडे अशा कार्यकर्त्यांनादेखील स्वतःची वाणी आणि वागणुकीतून व्यापक समाजाचा विश्वास संपादन करावा लागेल.
 
'द क्विंट'च्या एका रिपोर्टनुसार 2015 पासून आतापर्यंत भारतात जमावाने 94 लोकांची हत्या केली आहे. मृतांमध्ये सर्व जाती-धर्मातल्या लोकांचा समावेश असला तरी काही विशिष्ट प्रवृत्ती नक्कीच दिसतेय ज्यात एका खास समाजाला लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र, हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या अमेरिकेत सुरुवातीला केवळ काळे आफ्रिकन अमेरिकन लोकच जमावाच्या हिंसेचे बळी ठरले तिथेच नंतर ही एक सामाजिक प्रवृत्ती बनली आणि गोरेही त्याचे बळी ठरू लागले.
 
अमेरिकेतल्या 'नॅशनल असोसिएशन फॉर द अडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पिपल'ने दिलेल्या आकडेवारीनुसार 1882 ते 1968 पर्यंत अमेरिकेत जमावाने4743 लोकांची हत्या केली होती. मात्र, लिंचिंगचे बळी ठरलेल्या लोकांमध्ये 3446 लोकं कृष्णवर्णीय आफ्रिकी अमेरिकी होते तर 1297 लोकं गोरे अमेरिकीही होते. सांगण्याचा उद्देश हा की एकदा का एखाद्या वंशवादी किंवा जातीय जमावाला सामुदायिक शह आणि सामाजिक वैधता प्राप्त होते तेव्हा तो जमाव कधीही, कुणाही विरोधात शंका किंवा द्वेषाच्या आधारे हिंसा करू लागतो. जमावाद्वारे करण्यात आलेला न्याय, या वृत्तीमुळे सर्वाधिक नुकसान 'कायद्याचं राज्य' किंवा 'रुल ऑफ लॉ'चं होतं.
 
कुठलाही समाज शेकडो वर्षांच्या सामाजिक-राजकीय प्रबोधनानंतर हे प्राप्त करतो. मात्र, जमाव न्याय, ही वृत्ती एका सामाजिक आजाराप्रमाणे पसरते आणि मग कुणीही कुठेही त्याचा बळी ठरू शकतो. कायद्याच्या राज्याच्या जागी 'जमावाचं राज्य' स्थापन होतं.
 
काळीज पिळवटून टाकणाऱ्या वेगवेगळ्या घटनांनी उद्विग्न होऊन तात्काळ न्याय मिळावा, यासाठी आरोपींना चौकात फासावर लटकवण्याची भावनादेखील खरं म्हणजे जमाव-न्यायाचीच सुप्त आवृत्ती आहे. हे समजून घेतलं पाहिजे. हेदेखील समजून घेतलं पाहिजे की समाजात ही ओरड यासाठी ऐकू येते कारण आपली पोलीस यंत्रणा आणि न्यायालयीन न्याय-व्यवस्थेवरून लोकांचा विश्वास उडत आहे.
 
मात्र, याहून वेगळी जी झुंडशाही किंवा इतरांचा द्वेष करणारी मानसिकता एखाद्या तबरेज किंवा मोहसीनला किंवा एखाद्या बिक्की श्रीनिवास किंवा मानजी जेठा सोलंकीला बेदम मारहाण करून ठार करण्याच्या घटनांवर मनातल्या मनात हा विचार करते की यातून अमुक एका जातीचा, धर्माचा किंवा विचाराचा विजय झाला, अमुक एका ईश्वराचं श्रेष्ठत्व सिद्ध झालं, तर अशा वेळी त्यांना या गोष्टीचा विसर पडतो की ते स्वतःदेखील स्वतःसाठी अशाच मृत्युची निवड करत आहेत. कळत-नकळत ते आपल्या निष्पाप मुलांनाही संभाव्य जमाव-न्यायाच्याच सुपूर्द करत आहेत.
 
महात्मा गांधी यांनी चौरी-चौरामध्ये जमावाने केलेल्या हिंसाचारानंतर (या हिंसाचारात 22 पोलिसांना जिवंत जाळण्यात आलं होतं) असहकार चळवळीसारखं यशस्वी आंदोलनही स्थगित केलं होतं. त्यावेळी मोठ-मोठ्या बुद्धीजीवी लोकांनीदेखील त्यांच्यावर कठोर टीका केली होती.
 
मात्र, गांधीजींना हे कळून चुकलं होतं की जमावाकडून होणारा हिंसाचार कुठल्याही परिस्थितीत किंवा कुठल्याही उद्देशाने झाला असला तरी त्याला न्यायसंगत ठरवता येणार नाही. कारण, याचा दुरोगामी परिणाम समाजात हिंसक जमावाकडून होणाऱ्या न्यायाला कायदेशीर मान्यता दिल्यासारखं होण्यात होईल.
 
एक आजचा 'न्यू इंडिया' आहे जिथे एखादा गोरक्षेच्या नावाखाली तर दुसरा कुणी इतर कुठल्याही सामाजिक, राजकीय किंवा जातीय द्वेषाच्या अधीन होऊन झुंडशाही करतोय. देशाचा तरुण बेरोजगारी, असंतोष, निराशा, हताशा, दिशाहीनता, जातीय मूर्खता आणि झिनोफोबियाचा बळी ठरतोय. त्यातूनच व्हॉट्सअपवर पसरवण्यात आलेल्या खोट्या अफवेलाही कुठलाही विचार न करता खरं मानून झुंडशाही करतोय.
 
एका अहवालानुसार 1 जानेवारी 2017पासून 5 जुलै 2018 या काळात दाखल करण्यात आलेल्या 69 प्रकरणांमध्ये केवळ मुलं चोरण्याच्या अफवेमुळे जमावाने 33 जणांची हत्या केली आहे तर 99 लोकांना बेदम मारहाण झाली आहे.
 
गांधी यांनी ज्या राष्ट्रीय आजाराची भीती व्यक्त केली होती तो खरं म्हणजे हा आजार आहे आणि यावर दुरोगामी उपचार करण्याऐवजी स्थानिक प्रशासनापासून ते देशाच्या प्रमुखापर्यंत सगळेच केवळ बाष्कळ बडबड करत आहेत.
 
(लेखक गांधीवादी विचारवंत आहेत. या लेखातली मतं ही त्यांची वैयक्तिक आहेत.)