बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 29 एप्रिल 2019 (12:40 IST)

मेळघाटात वर्षभरात 247 बालमृत्यू

मेळघाटातल्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात वर्षभरात सहा वर्षांखालील तब्बल 247 बालकं दगावली आहेत. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
 
कुपोषण आणि त्यामुळे होणारे बालमृत्यू थांबत नसल्याने निर्मूलनासाठी राबवलेल्या नवसंजीवनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
 
अमरावती जिल्ह्यातल्या 12 तालुक्यांमध्ये एका वर्षांत 141 बालमृत्यू झाल्याची नोंद आहे.
 
एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीत धारणी तालुक्यात 170, तर चिखलदरामध्ये 77 बालके विविध आजारांनी दगावल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटले आहे. यातील बहुतांश बालके कुपोषित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
कमी वजनाची बालके काही दिवसांतच आणखी खंगू लागतात, असे वारंवार निदर्शनास आले आहे. गेल्या काही वर्षांत मेळघाटातील बालमृत्यूंचे प्रमाण कमी झाले असले, तरी जिल्ह्याच्या इतर भागांच्या तुलनेत हे प्रमाण लक्षणीय आहे.