रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (20:03 IST)

मानसिक आरोग्य : चुकीचं करिअर निवडल्याने Mental Health बिघडू शकतं का?

सिद्धनाथ गानू
बीबीसी मराठी
 
"लहान मुलं अंग टाकून जसं रडतात, ओरडतात ना, तेवढं फक्त करता येत नव्हतं. बाकी मी सगळी नाटकं केली!" दहावीनंतर मनाविरुद्ध सायन्सला गेलेली अमृता सांगते. पण ही तिची एकटीची कहाणी नाही. अनेक मुला-मुलींना करिअर निवडताना प्रचंड मानसिक ताणतणाव सहन करावा लागतो. काहींना दिशा लवकर सापडते, काहींना मधूनच मार्ग बदलावा लागतो, पण काही मात्र अडकून पडतात आणि परिणामी त्यांचं मानसिक स्वास्थ्य ढासळतं. शिक्षण आणि करिअरची योग्य निवड केली नाही तर मानसिक आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात आणि ती योग्यप्रकारे करता यावी म्हणून काय करता येऊ शकतं याबद्दल आपण या लेखात बोलणार आहोत.
 
प्राथमिक शाळेत तू मोठेपणी काय होणार या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर, इंजिनिअर इथपासून ते अगदी पायलट, अॅस्ट्रोनॉटपर्यंत काहीही असू शकतं. पण वय वाढतं तसं जरा याकडे गांभीर्याने पाहायला लागतो.
 
बहुतांश मुलांच्या आयुष्यात या प्रश्नाचा निर्णय दहावीच्या सुटीत होतो. या दोन-अडीच महिन्यांच्या सुटीत पुढच्या किमान 40-45 वर्षांसाठी आपण काय करू याचा निर्णय अनेक मुलं-मुली घेतात. काहींचे निर्णय बरोबर ठरतात, काहींचे चुकतात, काहींवर घेतलेला निर्णय निभावण्याचं ओझं असतं.
 
डॉक्टर, इंजिनिअर किंवा त्यासारखं काहीच करायची इच्छा नसूनही अमृताने अकरावीत सायन्सला प्रवेश घेतला. "दहावीत चांगले मार्क्स मिळाल्यानंतर एकप्रकारचं सोशल प्रेशर असतं ना. माझ्या इतिहासाच्या आणि इतर शिक्षिकांनीही आईला हेच विचारलं, 'करणार काय ती पुढे आर्ट्स घेऊन?' अखेर मग ठरलं की जा सायन्सला", अमृता सांगते. तिच्यासारखीच अनेकांची गत असते.
 
सर्वांत वरती सायन्स, दोन नंबरला कॉमर्स आणि काहीच नाही जमलं तर आर्ट्स अशी एक अलिखित उतरंड अनेकांच्या मनात घट्ट आहे. दहावीत फर्स्ट क्लास किंवा विशेष प्राविण्य (डिस्टिंक्शन) मिळालेल्या मुलांनी सायन्स किंवा कॉमर्सच घेतलं पाहिजे असा एक अलिखित दंडक असतो. विशेषतः लहान शहरांमध्ये ही परिस्थिती सर्रास पाहायला मिळते. अमृताही त्याच मार्गाने गेली.
 
पण मनाविरुद्ध घेतलेल्या या निर्णयाचे परिणाम लवकरच दिसायला लागले. इतर मित्र-मैत्रिणींचं लक्ष्य मेडिकल-इंजिनिअरिंग होतं. सायन्समध्ये त्यांना रस होता. क्लासेस, मॉक टेस्ट्स या सगळ्यावर त्यांचं सतत लक्ष होतं.
 
अमृताला यातलं काहीच नको होतं, त्यामुळे मित्र-मैत्रिणी दूर जायला लागले, अमृताचं सगळं लक्ष टीव्ही पाहणं आणि वाचन करण्याकडे वळलं. हळूहळू ती 'रिझर्व्ह' होत गेली. पण गोष्टी एवढ्यावरच थांबल्या नाहीत.
 
नावडती स्ट्रीम, नावडते विषय आणि मित्र-मैत्रिणी दुरावणं या सगळ्यामुळे वाढत जाणाऱ्या फ्रस्ट्रेशनमधून अमृताला मायग्रेनचाही त्रास व्हायला लागला.
 
अखेर '12वी नीट पास हो, त्यानंतर बी.ए. ला पुण्याला अॅडमिशन घेऊ' असं ठरलं आणि परिस्थिती थोडी निवळली. अमृताने बारावीत सायन्सला अखेरचा रामराम केला आणि ती आवडीच्या विषयांकडे वळली.
 
खरं पॅशन समजण्यासाठी आधी इंजिनिअरिंग करावं लागतं?
अनेकदा विनोदाने म्हटलं जातं की आयुष्यात आपल्याला खरंच काय करायचं आहे हे समजण्यासाठी आधी इंजिनिअरिंग करावं लागतं.
 
ईश्वरचंही असंच काहीसं झालं. दहावीपर्यंत मेरिटचा विद्यार्थी असलेल्या ईश्वरला पुढे काय करायचं हे ठरवण्यासाठी पालकांनी पूर्ण मोकळीक दिली होती.
 
ईश्वरने मनाशी तीन करिअर्स ठरवून ठेवली होती. 1. पायलट, 2. पत्रकार आणि 3. इंजिनिअरिंग. पण यातला सगळ्यांत शेवटचा पर्याय त्याने निवडला.
 
 
कारण काय? ईश्वर सांगतो, "पायलटचा विचार सोडून दिला. कारण हे मला झेपणार नाही याची मला खात्री वाटत होती. मला पत्रकार होण्यात रस होता, पण मी एकाही पत्रकाराला भेटलो नव्हतो. आणि माझ्या आजूबाजूला खूप इंजिनिअर्स होते त्यामुळे मला ते माहितीचं होतं. म्हणून मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं."
 
अनोळखी गोष्टींच्या वाट्याला आपण अनेकदा इच्छा असूनही जात नाही. ईश्वरच्या बाबतीतही तसंच झालं. दहावीत 90% मिळवून तो सायन्सला गेला पण 11वी आणि 12वीतही आधीच्या ईश्वरची चमक दिसत नव्हती. मार्क कमी होत होते, पण ठरवलेला मार्ग सोडायचा नाही या हट्टाने ईश्वरने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला.
 
पहिल्याच सेमिस्टरपासून आपण जे करतोय हे काही आयुष्यभर आपण करू शकणार नाही, असं कुठेतरी मनात वाटत होतं, पण 'आता हे सोडायचं कसं?' या संकोचाने ईश्वर सेमिस्टरमागून सेमिस्टर ढकलत राहिला.
 
इंजिनिअरिंगमधून येणारं फ्रस्ट्रेशन हाताळण्यासाठी त्याने गाणं, डान्स, स्टुडंट्स काउन्सिलसारख्या 'एक्स्ट्रा-करिक्युलर' म्हणजे पाठ्येतर गोष्टींमध्ये स्वतःला झोकून दिलं. पण आयुष्यभर इंजिनिअरिंगमध्ये काम करणं शक्य होणार नाही हे ईश्वरला उमजून चुकलं होतं.
 
एका मोठ्या आयटी कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट झालेली असूनही त्याने मुळात मनाशी ठरवलेल्या करिअरच्या पर्यायांपैकी तिसऱ्या पर्यायाची चाचपणी सुरू केली.
 
पत्रकारिताच करायची हे मनाशी पक्कं झाल्यानंतर त्याने शेवटच्या सेमिस्टरमध्येच अनेक प्रवेश परीक्षा दिल्या आणि इंजिनिअरिंगचा शेवटचा पेपर दिला त्याच दिवशी त्याला पत्रकारितेला अॅडमिशन मिळाली.
 
योग्य करिअर कसं निवडायचं?
अमृता किंवा ईश्वर या दोघांनाही सुरुवातीचे धक्के पचवून नंतर आपापल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये जाता आलं. पण प्रत्येकाचीच कहाणी अशी सुफळ, संपूर्ण होतेच असंही नाही. मग आपण निवडतोय तो करिअरचा मार्ग योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं?
 
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट तेजस्विनी भावे सांगतात की करिअर निवडताना तीन गोष्टींचं संतुलन साधणं गरजेचं असतं- 'आवड, क्षमता आणि संसाधनं'. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडणं आणि ती करिअर म्हणून दीर्घकाळ करता येणं या गोष्टींमध्ये फरक असतो. तसंच ते करण्यासाठीची आर्थिक आणि इतर संसाधनं आपल्याकडे आहेत ना याचाही विचार करणं आवश्यक ठरतं.
 
दहावी-बारावीत इतका विचार प्रत्येकाला करता येईलच असं नाही त्यामुळे अॅप्टिट्यूड टेस्ट्ससारख्या चाचण्या आपला कल तसंच कौशल्यं ओळखण्यात मदत करू शकतात. करिअरच्या दृष्टीने मुलांना समुपेशनाचाही मार्ग उपलब्ध असतो.
 
पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या अॅप्टिट्यूड टेस्टिंग सेंटरच्या उपविभाग प्रमुख आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट निलिमा आपटे सांगतात,
 
"अनेकदा मुलांची एक इच्छा असते पण पालकांचं वेगळंच सांगणं असतं. आमचा अनुभव जास्त आहे त्यामुळे आत्ता तू आमचं ऐक. नंतर नाहीच जमलं तर पुढे ठरव तुला काय करायचं असंही अनेकदा पालक मुलांना म्हणतात. मुलांनाही मोकळेपणाने मनातलं सांगता येत नाही."
 
मग यातून मार्ग कसा काढायचा? "दहावी बारावीतच अॅप्टिट्यूड टेस्ट्स किंवा समुपदेशन केलं तर त्याचा बऱ्याच प्रमाणात फायदा होऊ शकतो. या चाचण्या मुलांचा कल, त्यांची कौशल्यं यांच्याबद्दल वस्तूनिष्ठ पद्धतीने उत्तरं देऊ शकतात. समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांना अधिक मदत करता येऊ शकते." असं निलिमा आपटे पुढे सांगतात.
 
काही केसेसमध्ये जिथे मुलांच्या इच्छा आणि पालकांच्या अपेक्षा यांच्यात संतुलन साधणं अत्यावश्यक आहे असं लक्षात येतं तिथे मुलांप्रमाणेच पालकांशीही बोलणं महत्त्वाचं ठरतं. पण हे अत्यंत कौशल्याने करावं लागतं असंही आपटे सांगतात.
 
चुकीच्या करिअरमध्ये अनेक वर्षं काढल्यामुळे अनेकदा लोकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. काही केसेसमध्ये परिस्थिती इतकी टोकाला जाते की मनात आत्महत्येचे विचारही येतात. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला समुपदेशन तसंच कधीकधी मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घ्यावी लागू शकते, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात.
 
करिअरची वाट मध्येच बदलता येते?
35-40 वयोगटातल्या अनेकांना 'जॉब बर्नआऊट'ची भावना होत असते. म्हणजे आपण करतोय त्या कामात समाधान मिळत नाही, मनाप्रमाणे पैसेही मिळत नाहीत, त्या कामात रस वाटेनासा होतो. तेजस्विनी भावे म्हणतात की जॉब बर्नआऊट आणि डिप्रेशनची लक्षणं अनेकदा सारखीच दिसतात. मग करिअरची वाट बदलायची की नाही हे कसं ठरवायचं?
 
"जर तुमच्या कामातल्या काही गोष्टी काढून टाकल्या, उदाहरणार्थ काही सहकारी, काही विशिष्ट प्रकारची कामं किंवा इतर काही घटक जे तुम्हाला आवडत नाहीत तर तुम्ही तुमच्या कामात समाधानी असाल का? जर उत्तर हो असेल तर परिस्थिती आटोक्यात आणता येण्यासारखी असते. पण जर त्या कामाबद्दल तुम्हाला अजिबात आस्था राहिली नसेल तर मात्र वाट बदलावी लागू शकते आणि तिथे थेरपिस्टची मदत होऊ शकते."
 
अनेकांचा काही वर्षं नोकरी केल्यानंतर त्यातला रस निघून जातो, मग अशांसाठीही समुपदेशन तसंच काही विशिष्ट प्रकारच्या चाचण्या विकसित केलेल्या आहेत ज्यांची मदत घेता येऊ शकते.
 
केवळ आर्थिक स्थैर्यासाठी मनाविरुद्ध एखाद्या पेशात राहण्याचे आपल्या मानसिक आरोग्यावर गंभीर आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.
 
मुळातच मानसिक स्वास्थ्याबद्दल आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे, त्यात पुन्हा शहरी आणि ग्रामीण ही दरी आहेच. पण अनेक संस्था, अनेक व्यक्ती आपापल्या पातळीवर याबद्दल जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न करतायत.
 
करिअरची निवड ही फक्त भौतिक स्थैर्याशी नाही आपल्या मानसिक आरोग्याशीही जोडलेली असते आणि त्यामुळे ती काळजीपूर्वक केली पाहिजे.