शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (08:17 IST)

अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होतील अशी नेहरूंनी केली होती भविष्यवाणी

- रेहान फजल
1977च्या जानेवारीमधली एक सायंकाळ होती. दिल्लीत कडाक्याची थंडी होती. रामलीला मैदानावर विरोधी पक्षाच्या नेत्यांची महासभा भरली होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या भाषणाची वेळ येईपर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजले होते. पण जेव्हा वाजपेयी भाषणासाठी उभे राहिले तेव्हा तिथे उपस्थित हजारो लोकांनी टाळ्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं.
 
वाजपेयींनी दोन्ही हात उंचावत लोकांना शांत केलं. मग आपले डोळे मिटले आणि कवितेची एक ओळ उच्चारली,'बड़ी मुद्दत के मिले हैं दीवाने....'
 
वाजपेयी थोडा वेळ थांबले. लोकांचं नियंत्रणाबाहेर जात होते. वाजपेयींनी पुन्हा डोळे मिटले, एक दीर्घ पॉज घेतला आणि कवितेची पुढची ओळ म्हटली - 'कहने सुनने को बहुत हैं अफ़साने.'
 
पुन्हा टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी टाळ्यांचा कडकडाट जास्त वेळ सुरू होता. वाजपेयी यांनी पुन्हा एक दीर्घ पॉज घेतला आणि ते म्हणाले, 'खुली हवा में ज़रा सांस तो ले लें, कब तक रहेगी आज़ादी कौन जाने?'
 
या सभेच्या वार्तांकनासाठी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग सांगतात, "हे कदाचित 'व्हिटेंज वाजपेयी' यांचं सर्वश्रेष्ठ रूप होतं. कडाक्याच्या थंडीत वाजपेयींचं भाषण ऐकण्यासाठी हजारो लोक जमले होते. त्यावेळी लोकांनी या रॅलीला जाऊ नये म्हणून त्यावेळच्या सरकारने टीव्हीवर बॉबी हा सिनेमाही लावला होता. पण त्याचा काही उपयोग झाला नाही."
 
बॉबी आणि वाजपेयी अशा पर्यांयांत लोकांनी वाजपेयींना निवडलं. त्यावेळी त्यांनी दाखवून दिलं की त्यांना भारतीय राजकारणातील सर्वोत्तम वक्ता असंच नाही म्हटलं जात.
 
संसदेतील हिंदीतील सर्वोत्तम वक्ते
लोकसभेचे सभापती अनंतशायनम अयंगार यांनी एकदा म्हटलं होतं की लोकसभेत इंग्रजीच्या बाबतीत हिरेन मुखर्जी आणि हिंदीच्या बाबतीत अटल बिहारी वाजपेयी यांचा हात कुणीही धरू शकत नाही.
 
जेव्हा वाजपेयी यांचे मित्र N.M. घटाटे यांनी वाजपेयींना ही गोष्ट सांगितली तेव्हा ते हसले आणि म्हणाले, "मग ते मला बोलू का देत नाहीत?"
 
त्या काळात वाजपेयी संसदेत 'बॅक बेंचर' होते. पण वाजपेयी जे मुद्दे उचलायचे त्यावर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं विशेष लक्ष असायचं.
 
नेहरू होते वाजपेयींच्या प्रेमात
किंगशुक नाग यांनी त्यांचं पुस्तक 'अटल बिहारी वाजपेयी- A Man for All Seasons' मध्ये लिहितात, "एकदा ब्रिटनचे पंतप्रधान भारत भेटीवर आले होते. त्यावेळी त्यांच्याशी वाजपेयींची ओळख करून देत नेहरू म्हणाले, "हे विरोधी पक्षाचे युवा नेते आहेत. ते नेहमी माझ्यावर टीका करतात. पण भविष्यात त्यांच्याकडून फार अपेक्षा आहेत."
 
दुसऱ्या एका घटनेत, नेहरू यांनी एका परदेशी व्यक्तीला वाजपेयी यांची ओळख 'भारताचे भावी पंतप्रधान' अशी करून दिली होती. वाजपेयींच्या मनातही नेहरूंप्रति खूप आदर होता.
 
साऊथ ब्लॉकमध्ये नेहरूंचं चित्र पुन्हा लावलं
1977 साली वाजपेयी परराष्ट्र मंत्री झाले. साऊथ ब्लॉकमधल्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पंडित नेहरू यांचं भिंतीवरील चित्र गायब आहे. किंगशुक नाग सांगतात की वाजपेयी यांनी तातडीने त्यांच्या सचिवाला याबद्दल विचारणा केली आणि ते नेहरूंचं चित्र पुन्हा लावण्यास सांगितलं.
 
ही घटना पाहणाऱ्यांनी सांगितलं की नेहरू ज्या खुर्चीवर बसायचे त्याच खुर्चीवर वाजपेयी बसले. तेव्हा त्यांच्या तोंडून शब्द आले, "मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी या कार्यालयात बसू शकेन."
 
परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर त्यांनी नेहरूंच्या धोरणांत फार काही बदल केले नव्हते.
भाषणांवर फार कष्ट घेणारे वाजपेयी
वाजपेयी यांचे खासगी सचिव शक्ती सिन्हा सांगतात की सार्वजनिक भाषणांसाठी वाजपेयी फारशी तयारी करत नव्हते. पण लोकसभेतील भाषणांसाठी मात्र ते फार तयारी करायचे.
 
"संसदेतील ग्रंथालय, विविध नियतकालिकं, वर्तमानपत्रं यांचा ते रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचे. ते टिप्पण्या काढत आणि त्यावर विचार करत. ते पूर्ण भाषण कधी लिहून काढत नव्हते. पण भाषणाची रूपरेषा त्यांच्या डोक्यात तयार असायची."
 
मी शक्ती सिन्हा यांना विचारलं की व्यासपीठावर इतकं चांगलं भाषण देणारे वाजपेयी 15 ऑगस्टचं भाषण कागदावरून का वाचतात?
 
यावर सिन्हा म्हणाले, "लाल किल्ल्यावरून कोणताही शब्द बेजबाबदारपणे उच्चारला जाऊ नये, असं त्यांना वाटतं. लाल किल्ल्यावरील व्यासपीठाबद्दल त्यांच्या मनात पवित्र भावना होत्या. तुम्ही इतर वेळा जसं भाषण करता तसं भाषण लाल किल्ल्यावरून करावं, असं ते आम्ही फार वेळा सांगितलं होतं. पण त्यांनी ते कधी ऐकलं नाही. आम्ही जे इनपुट देत होतो, त्यात ते काटछाट करायचे."
 
लालकृष्ण अडवाणींना 'काँप्लेक्स'
वाजपेयींच्या जवळचे नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी एकदा बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं, "अटलजींची भाषणं ऐकताना मला स्वतःबद्दल कमीपणा वाटायचा. ते चार वर्षं भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी हे पद जेव्हा मला देऊ केलं, तेव्हा मी सांगितलं मला तुमच्या सारखं हजारो लोकांसमोर भाषण देता येत नाही."
 
"त्यावेळी ते मला म्हणाले होते संसदेत तर तू चांगलं भाषण करतोस. यावर मी त्यांना म्हटलं संसदेत भाषण देणं आणि हजारो लोकांसमोर भाषण देणं, यात फरक आहे. मी नंतर पक्षाचा अध्यक्ष झालो. पण वाजपेयी यांच्यासारखं भाषण करता येत नाही, याबद्दल आयुष्यभर मनात कॉम्प्लेक्स राहील."
 
अंतर्मुखी और लाजाळू
हजारोंना मंत्रमुग्ध करणारे वाजपेयी खरंतर त्यांच्या वैयक्तिक जीवनात अंतर्मुखी आणि लाजाळू होते.
 
शक्ती सिन्हा सांगतात, "जर चार-पाच लोक त्यांच्या घरी भेटीसाठी यायचे तेव्हा ते फार कमी बोलायचे. पण दुसऱ्यांचं म्हणणं मात्र ते फार लक्षपूर्वक ऐकायचे. त्यावर फार विचार करून ते योग्य प्रतिक्रिया द्यायचे."
 
पण एक दोन खास दोस्तांसोबत मात्र ते दिलखुलास बोलायचे.
 
मणिशंकर अय्यर त्यांची एक आठवण सांगतात, "वाजपेयी 1978 साली परराष्ट्रमंत्री म्हणून पाकिस्तानला गेले होते. त्यावेळी त्यांनी उत्तम उर्दूत भाषण केलं. पण पाकिस्तानचे त्यावेळचे परराष्ट्रमंत्री आगा शाही यांचा जन्म चेन्नईतील होता. त्यांना वाजपेयींचं अस्खलित उर्दूतील भाषण समजलंच नाही."
 
शक्ती सिन्हा आणखी एक किस्सा सांगतात - "न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी वाजपेयी बोलत होते. थोड्याच वेळात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत शरीफ यांना भाषण करायचं होतं. त्यांना चिठ्ठी पाठवण्यात आली की त्यांनी लवकर चर्चा थांबवावी. ही चिठ्ठी पाहून नवाज शरीफ म्हणाले, "इजाजत है?"
 
यावर वाजपेयी हसत म्हणाले, "इजाजत है."
 
स्कुटर फेरी
वाजपेयी साधे आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. प्रसिद्ध पत्रकार H.K. दुआ सांगतात, "मी त्यावेळी नवखा पत्रकार होतो. कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये एक पत्रकार परिषदेसाठी मी स्कुटरवरून चाललो होतो. रस्त्यात पाहिलं की जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी रिक्षाची वाट पाहात आहेत. मी थांबून विचारलं की काय झालं. ते म्हणाले त्यांची कार बिघडली आहे. मी त्यांना विचारलं, 'माझ्यासोबत येता का?' त्यांनी लगेच तयारी दाखवली आणि माझ्या स्कुटरवर बसून ते पत्रकार परिषदेला आले."
 
"खरंतर ही पत्रकार परिषद त्यांचीच होती. पत्रकार परिषदेला जनसंघाचे नेते जगदीश चंद्र माथूर होते. आम्हाला पाहताचं ते म्हणाले, "उद्या एक्स्प्रेसमध्ये हेडलाईन असणार - 'Vajpayee rides Dua's Scooter'. यावर वाजपेयी खळखळून हसले आणि म्हणाले, "नाही हेडलाईन असेल 'Dua takes Vajpayee for a ride'."
 
वाजपेयींना कधी राग येतो का?
शिव कुमार गेली 47 वर्षं अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत होते. वाजपेयी यांचे शिपाई, खानसामा, अंगरक्षक, सचिव, मतदारसंघाचे प्रमुख, अशा कितीतरी जबाबदाऱ्या त्यांच्यावर असायच्या.
 
त्यांच्याबरोबर काम करतानाचा एक किस्सा त्यांनी सांगितला -
 
"त्यावेळी आम्ही फिरोजशहा रोडवर राहात होतो. ते बंगळुरूवरून दिल्लीला परत येत होते. मला त्यांना विमानतळावर घ्यायला जायचं होतं. त्यावेळी जनसंघाचे एक नेते J. P. माथूर माझ्याबरोबर होते. बंगळुरूची फ्लाईट नेहमी उशिरा येते, हा अनुभव असल्याने आम्ही सिनेमा पाहायला गेलो."
 
"पण तो सिनेमा लांबला आणि विमान वेळेवर पोहोचलं. आम्ही जेव्हा विमानतळावर आलो तेव्हा समजलं विमान तर केव्हाच उतरलं आहे. घराची किल्ली माझ्याजवळ होती. मी पुरता घाबरलो होतो. घरी आलो तर पाहिलं वाजपेयी लॉनवर फिरत होते.
 
त्यांनी मला विचारलं 'कुठं गेला होता?' यावर मी म्हणालो, 'सिनेमा पाहायला'.
 
वाजपेयी हसत म्हणाले, 'मीही आलो असतो, चल उद्या जाऊ.'
 
खरंतर ते माझ्यावर चिडू शकले असते. पण त्यांनी माझ्या हलगर्जीपणा हसून टाळला होता."
 
जेव्हा वाजपेयी रामलीला मैदानावर झोपले
शिव कुमार आणखी एक आठवण सांगतात, "आपल्यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होणार नाही, याची ते नेहमीच काळजी घ्यायचे. बरेच वर्षं जनसंघाचं कार्यालय अजमेरी गेटजवळ होतं. अडवाणी, वाजपेयी, J. P. माथूर हे नेते तिथंच राहात होते. वाजपेयी एकदा रेल्वेने दिल्लीला येत होते. त्यांच्यासाठी जेवण बनण्यात आलं होतं. पण रात्री 11ची रेल्वे 2 वाजता पोहोचली."
 
"सकाळी 6 वाजता दारावरची घंटी वाजली. दरवाजा उघडला तर वाजपेयी सुटकेस आणि मोठी बॅग घेऊन उभे होते. आम्ही विचारलं तुम्ही तर रात्री येणार होता?"
 
"त्यावर वाजपेयी म्हणाले्, 'रेल्वे रात्री 2 वाजता आली. मी म्हटलं कुठं तुम्हाला आता या त्राय द्यायचा. म्हणून मी रामलीला मैदानात जाऊन झोपलो."
 
शिवकुमार सांगतात कसा वाजपेयींनी वयाच्या 69 वर्षीही डिस्नेलॅंडमध्ये राईडचा आनंद घेतला होता. अमेरिकेच्या दौऱ्यात ते धोतर आणि कुर्ता सुटकेसमध्ये ठेऊन द्यायचे आणि शर्ट-पॅंट घालायचे.
 
न्यूयॉर्कमध्ये स्वतःच्या सुरक्षारक्षकांसाठी आईस्क्रीम आणि सॉफ्ट ड्रिंक्स खरेदी करताना त्यांना अनेकांनी पाहिलं आहे. नात निहारिकासाठी खेळणी घेण्यासाठी ते दुकानात जायचे. न्यूयॉर्कच्या पेट शॉप्समधून ते त्यांचा लाडका कुत्रा सॅसी, कुत्री सोफी आणि मांजरी रितूसाठी खाऊ विकत घ्यायचे.
 
खाण्यापिण्याचे शौकीन
वाजपेयी खाण्यापिण्याचे शौकीन होतेच, शिवाय स्वयंपाक करण्याची त्यांना आवड होती. मिठाई आणि गोड पदार्थ त्यांना आवडायचे. रबडी, खीर, मालपुआ हे त्यांचे आवडते पदार्थ.
 
आणीबाणीच्या काळात त्यांना अटक झाली होती. ते, श्यामनंदन मिश्र आणि मधू दंडवते बंगळुरूमध्ये एकाच तुरुंगात होते. त्यावेळी वाजपेयी स्वतः सर्वांसाठी जेवण बनवायचे.
 
शक्ती सिन्हा सांगतात, "जेव्हा ते पंतप्रधान होते तेव्हा घरी सकाळ संध्याकाळ प्रचंड गर्दी असायची. येणाऱ्या लोकांसाठी रसगुल्ले आणि समोशासारखे पदार्थ बनलेले असायचे. आम्ही मात्र कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं की साहेबांसमोर समोसे आणि रसगुल्ल्यांची प्लेट ठेऊ नका."
 
"वाजपेयी सुरुवातीला शाकाहारी होते. नंतर ते मांसाहारी झाले. त्यांना चायनीज पदार्थ फार आवडायचे. खरंतर ते अगदी सामान्य माणूस होते... a warm-hearted human being."
 
शेरशाह सुरी नंतर सर्वांत जास्त रस्ते वाजपेयींनी बनवले
अटल बिहारी वाजपेयी यांचे आवडते कवी होते सूर्यकांत त्रिपाठी निराला, हरिवंशराय बच्चन, शिवमंगल सिंह सुमन आणि फैज अहमद फैज.
 
त्यांना शास्त्रीय गायनाची मोठी आवड होती. भीमसेन जोशी, अमजद अली खाँ और कुमार गंधर्व यांना ऐकण्याची संधी ते सोडत नव्हते.
 
किंगशुक नाग सांगतात, "परराष्ट्र धोरणांवर वाजपेयींची विशेष पकड होती. पण पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी सर्वाधिक लक्ष दिलं ते आर्थिक विषयांवर. टेलेकम्युनिकेशन आणि रस्ते निर्मितीच्या बाबतीत वाजपेयींचं योगदान कुणीही विसरू शकत नाही. देशभर विखुरलेल्या महामार्गांचं आपण जे जाळं पाहतो ते पसरवण्यामागं वाजपेयी होते. माझं तर असं मत आहे की शेरशहा सुरीनंतर भारतात सर्वांत जास्त रस्ते वाजपेयींनीच बांधले."
गुजरात दंगलीबद्दल अस्वस्थ
भारताची गुप्तचर संस्था 'RAW'चे माजी प्रमुख A.S. दुलत 'The Vajpayee Years'मध्ये लिहितात की, गुजरात दंगली या आपल्या कारकिर्दीतली फार मोठी चूक होती, असं त्यांना वाटायचं.
 
किंगशुक नागही लिहितात, "गुजरात दंगलीनंतर ते कधीच सहजतेने वावरू शकले नाहीत. त्यांना असं वाटत होतं की दंगलीच्या मुद्द्यांवर तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा."
 
नाग लिहितात, "त्यावेळी गुजरातमधले राज्यपाल सुंदर सिंह भंडारी यांच्या एका जवळच्या व्यक्तीनं मला सांगितलं होतं की मोदी यांच्या राजीनाम्याची तयारी झाली होती. पण गोव्यातील राष्ट्रीय परिषदेत येईपर्यंत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी वाजपेयी यांचं मन वळवण्यात यश मिळवलं होतं."
 
यामागचं कारण काय, कुणास ठाऊक.
 
2004 साली A. G. नूरानी यांनी 'फ्रंटलाइन'मध्ये लिहिलं होतं, "अटल बिहारी वाजपेयी हे संघाच्या मुशीतून घडलेले नेते होते. संघाची विचारसरणी किंवा त्याचं धोरण झुगारण्याची शक्ती त्यांच्यात नव्हती. आपली तशी काही इच्छा आहे, असं त्यांनी कधी दाखवलं नव्हतं."
 
"1996ला ते म्हणाले होते, मला एक गोष्ट स्वच्छपणे सांगावीशी वाटते, मी धर्मनिरपेक्ष आहे पण पक्ष नाही. मी मवाळ आहे पण पार्टी नाही. हा डाव्यांचा 'गोबेलियन प्रोपोगंडा' आहे."
 
"वाजपेयी संघांच्या धोरणापासून किंवा विचारांपासून तसूभरही ढळले नाही. मग तो मुद्दा बाबरी मशिदीचा असो वा धार्मिक दंगलींचा असो. 1967पासून ते आजतागायत त्यांनी मुस्लिमांबद्दल कधी सहानुभूतीचे शब्द काढले नाहीत... एकदाही नाहीत."
 
"गुजरात दंगलीतील पीडित मुस्लिमांच्या पुनर्वसनाचा प्रश्न देखील त्यांनी आस्थेनं लावून धरला नाही. त्यांच्याच पक्षातील लोकांच्या कृत्यामुळे पीडितांवर ही वेळ आली होती."
 
"1951ला जनसंघाच्या स्थापनेपासून संघ परिवाराने उचलेला प्रत्येक मुद्दा वाजपेयी यांनी उत्साहानं लावून धरला, जसं की जातीयवादी मुद्दे, भारतीयीकरण आणि बाबरी मशीद, तुम्ही फक्त नाव घ्या. तसेच वाजपेयी हे मतं मिळवण्यात देखील यशस्वी ठरले होते."