गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2020 (16:22 IST)

पत्रकार दिन: 'मराठी पत्रकारांसाठी माध्यम संक्रमणाचा काळ'

6 जानेवारी 1832 या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे वृत्तपत्र सुरू केलं. हा दिवस महाराष्ट्रात 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. 1832 ते 2019 हा जवळपास पावणे दोनशे वर्षांचा काळ… मराठी पत्रकारितेनं या काळात अनेक स्थित्यंतरं अनुभवली.
 
स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी, अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारी ते आताची 24 बाय 7 पत्रकारिता…पेन ते काँप्युटर, खिळे जुळवण्यापासून ते डिजिटल प्रिंटिंग, मुद्रित माध्यमं, टीव्ही चॅनेल्स ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्स… पत्रकारिता बदलत राहिली आहे.
 
या बदलांशी स्वतःला जुळवून घेताना माध्यमांना अनेक आव्हानांचाही सामना करावा लागला, आजही लागत आहे. ही आव्हानं नेमकी काय आहेत आणि या आव्हानांना सामोरं जाणाऱ्या मराठी पत्रकारितेचं भविष्य काय आहे, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला. त्यासाठी बीबीसीनं विविध माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या ज्येष्ठ पत्रकारांशी संवाद साधला.
 
'डिजिटल आणि व्हीडिओ हे भविष्य'
"प्रिंट, टीव्ही किंवा इतर कुठलाही प्लॅटफॉर्म पूर्णपणे संपणार नाही. पण टीव्ही चॅनेल्स असो की वृत्तवाहिन्या यांच्यासमोरचं आज सर्वांत मोठं आव्हान म्हणजे लोकांच्या टीव्ही पाहण्याच्या सवयींमध्ये होत असलेला बदल," असं मत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केलं. लोक आता प्रस्थापित माध्यमांकडून ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळत असल्याचं त्यांनी म्हटलं.
 
राजीव खांडेकर यांनी म्हटलं, "25 वर्षांपूर्वी परिस्थिती अशी होती, की लोक आदल्या दिवशी घडलेल्या गोष्टी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचायचे. त्यानंतर एक काळ असा होता, की दिवसभरात घडलेल्या गोष्टी संध्याकाळी टीव्हीवर बघितल्या जायच्या. नंतर घटना घडली, की लगेच दिसायला लागली. आता टीव्ही किंवा वर्तमानपत्राची बातमी ब्रेक करण्याची क्षमता कमी होत चाललीये. आज बातम्या सोशल मीडियावर ब्रेक होत आहेत. टीव्हीवर ते अधिक वेगानं लोकांसमोर पोहोचताना दिसतं एवढंच."
 
माध्यमांमधले हे बदल सांगत असतानाच आता पत्रकारितेतलं भविष्य हे डिजिटल आणि व्हीडिओ असल्याचंही त्यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे प्रादेशिक भाषांमधील कन्टेन्ट हा अधिक वाचला जाईल, असंही त्यांनी नमूद केलं.
 
"मोबाईल टीव्ही हे आता माहितीचं प्रमुख माध्यम असेल आणि व्हीडिओ हा त्याचा महत्त्वाचा भाग असणार आहे. लोकांना आता वाचण्यापेक्षा पाहणं हे जास्त सोपं आणि इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळेच व्हीडिओ हे येत्या काळात महत्त्वपूर्ण ठरतील.
 
'पत्रकारिता एंटरटेनमेंटला रिप्लेस करू पाहतेय'
 
''आपला चेहरा रोज टीव्हीवर दिसत असला तरी आपण दीपिका पदुकोण नाही. आपण वारीत नाचत वगैरे असलो तरी माधुरी दीक्षित नाही हे पत्रकारांनी लक्षात घ्यायला हवं. पत्रकारिता एंटरटेनमेंटला रिप्लेस करू पाहत आहे. रिपोर्टिंग म्हणजे ज्युनियर्सनी करायची गोष्ट असाही दृष्टिकोन आहे. लोकांमध्ये जाऊन, त्यांच्याशी बोलूनच बातम्या व्हायला हव्यात. ते कमी होत चाललं आहे. आर्मचेअर जर्नलिझम रूढ होतं आहे,'' असं मुंबई मिररच्या सहाय्यक संपादक अलका धूपकर यांनी सांगितलं.
 
 
त्या पुढे म्हणाल्या, ''पत्रकारितेत फिल्डवर जाऊन काम करणं अपेक्षित आहे. परंतु पत्रकारांना फिल्डवर पाठवण्यासाठी माध्यम संस्था उत्सुक नाहीत. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या, तिथलं जग पोहोचतच नाही.
 
"पत्रकारांवर विविध प्रकारचा दबाव आहे. अब्रूनुकसानीचा दावा ठोकून पत्रकारांना त्रास देण्याचा प्रकार केला जातो. राजकीय पक्षांच्या विरोधात केलेल्या बातम्यांची नोंद घेतली जाते. तुम्ही आमच्या पक्षाविरोधात बातमी दिलीत तर तुमच्या पेपरला दिल्या जाणाऱ्या जाहिराती कमी करून टाकू अशा पद्धतीने आर्थिक नाड्या आवळल्या जातात," असं अलका धूपकर सांगतात.
 
''वेबपोर्टल्सची संख्या वाढते आहे परंतु पेपर किंवा चॅनेलप्रमाणे त्यांचं रेव्हेन्यू मॉडेल तयार होऊ शकलेलं नाही. पत्रकारांना मिळणारा पगार, सुटट्या, कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या सोयीसुविधा हे नीट असेल तर 70 टक्के पत्रकार चांगलं काम करतील. परंतु दुर्देवाने तसं होत नाही. पत्रकारांना घर चालवायचं असतं. तेही अवघड होऊन जातं. यातूनच पत्रकार आणि राजकीय नेत्यांचं साटंलोटं होतं. त्यांच्यांविरुद्ध बातम्या दिल्याच जात नाहीत'', असं त्यांनी सांगितलं.
 
'माध्यमं बदलली तरी पत्रकारितेची मूल्यं कायम'
"सध्याच्या काळात प्रिंट-टीव्ही डिजिटल हे भेद तितके काटेकोर राहिले आहेत असं मला वाटत नाही. आता वेगवेगळे माध्यमसमूह हे या तिन्ही माध्यमांचा समतोल साधताना दिसत आहेत. त्यामुळे मी प्रिंटसाठी काम करतो, मी टीव्ही किंवा डिजिटलसाठी काम करतो, असं म्हणण्यापेक्षा आता पत्रकारांनी या सगळ्या माध्यमांसाठी विशेषतः डिजिटलसाठी कन्टेन्ट बनवायला शिकणं हे अधिक महत्त्वाचं आहे," असं मत सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी व्यक्त केलं.
 
"फेसबुक, ट्वीटर, टिकटॉक दर दीड-दोन वर्षांनी आता अभिव्यक्तीसाठी वेगळं माध्यम येत आहे. पूर्वी वर्तमानपत्रामध्ये मजकूर तयार करणारा संपादकीय विभाग आणि तो वाचकांपर्यंत पोहोचवणारा वितरण विभाग असे ठळक स्वतंत्र विभाग असायचे. डिजिटल माध्यमांच्या काळात कन्टेन्ट तयार करणं आणि तो वाचकांपर्यंत पोहोचवणं ही आता एकाच व्यक्तीची जबाबदारी आहे. ज्याला आपण 'target audience' म्हणतो, त्याचा विचार करून कोणता कन्टेन्ट कधी तयार करायचा, तो कोणत्या वाचकापर्यंत पोहोचवायचा ही एकाच व्यक्तीची जबाबदारी असते. माझ्यामते हेच आता मराठी पत्रकारितेसमोरचं आव्हानही आहे आणि भविष्यही आहे," असं श्रीराम पवार यांनी म्हटलं.
 
पत्रकारितेचं स्वरुप बदलत असलं तरी पत्रकारितेतली मूळ मूल्यं कायम आहेत असं सांगत पवार यांनी माध्यमं बदलली तरीही ही मूल्यं बदलणार नाहीत, ती भविष्यातही कायम राहतील, असा आशावाद व्यक्त केला.
 
'प्रबोधनाचं साधन ते मार्केटिंगचं माध्यम'
दैनिक पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे यांनी वृत्तपत्र व्यवसायासमोरील आव्हानांबद्दल बोलताना म्हटलं, की सध्या वर्तमानपत्रासमोर अनेक अडचणी आहेत. न्यूज प्रिंट महाग झाली आहे. GST आहे. इतरही नवनवीन नियम आहेत. या सगळ्याचा वर्तमानपत्रावर आर्थिक बोजा पडत आहे. त्यामुळे वर्तमानपत्रं चालवायची कशी, हे सध्या सगळ्यांत मोठं आव्हान आहे.
 
"यातूनच वर्तमानपत्रासमोर दुसरी अडचण निर्माण झालीये, ती म्हणजे अनेकदा आल्याला सरकारी निर्बंधांचा फटका बसू नये म्हणून मालकही सरकारला न दुखावण्याची सावध भूमिका घेतात. खरं तर Anti establishment हेच पत्रकारांचं काम आहे. पण आता त्यापद्धतीचं Freedom of Press राहिलेलं नाही. आर्थिक कारणांमुळे जास्तीत जास्त महसूल मिळवणं हे आता वर्तमानपत्रांचं उद्दिष्ट झालं आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रबोधनाचं साधन ते मार्केटिंगचं माध्यम असं वर्तमानपत्रांचं स्वरुप झालं आहे," असंही राही भिडे यांनी म्हटलं.
 
प्रिंट माध्यमांच्या भविष्याबद्दल मात्र राही भिडे यांनी फारसं सकारात्मक मत व्यक्त केलं नाही.
 
सुरुवातीला प्रिंट माध्यमांसमोर इलेक्ट्रॉनिक मीडियाचं आव्हान होतं. पण इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आगमनानंतर वर्तमानपत्रांनी स्वतःला बदललं. पण आता डिजिटल मीडिया, सोशल मीडिया वेगानं वाढत आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे छापून वर्तमानपत्रं विकणं कठीण झालं आहे. त्यामुळे सध्याच्या काळात प्रिंट मीडियाचं भविष्य हे फारसं आशादायक नसल्याचं राही भिडे यांनी म्हटलं.
 
पत्रकारांमधला पक्षीय अभिनिवेश चिंताजनक
सध्याच्या राजकीय परिस्थितीमधील पत्रकारांची भूमिका ही सध्या काळजीचा विषय असल्याचं मत 'मॅक्स महाराष्ट्र'चे एडिटर रवी आंबेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
 
"सध्या पत्रकारांमध्ये वैचारिक आणि राजकीय पातळीवर विविध गट पहायला मिळतात. पत्रकारिता हा तसा वैचारिक प्रांत असल्याने ते स्वाभाविकच आहे. पण आता त्याला पक्षीय अभिनिवेशही जडला आहे. देशाची लोकशाही आणि सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता याबाबतीतली पत्रकारांची 'भक्तिमय' मतं हा सर्वांत मोठा धोका मला येत्या काळात दिसतोय," असं रवी आंबेकर यांनी म्हटलं.
 
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतप्रदर्शन. बातमीतली वस्तुनिष्ठता हरवली आहे. डेटा जर्नालिझम आणि शोधपत्रकारिता ही मराठी पत्रकारितेत अभावानेच दिसतीये. येत्या काळात पत्रकारांमध्ये हे स्कील तयार करण्याची गरज असल्याचीही भूमिका रवी आंबेकर यांनी मांडली.
 
"प्रिंट, रेडिओ, टीव्ही, डिजिटल, पॉडकास्ट अशी अनेक माध्यमं आली, येत राहतील. पण बदलणार नाही तो कन्टेन्ट. कन्टेन्टचा फॉर्म बदलत राहणार आहे. मराठी पत्रकारितेनं नवीन प्रवाह आत्मसात करायला हवेत. नवनवीन माहिती, तिचा वेग आणि दृष्टिकोन आत्मसात करायला हवा. भूमिका घ्यायला हव्यात. सध्या मराठी पत्रकार भूमिका घेण्यात मागे आहेत. जर भूमिका घेतल्या आणि त्या भूमिकांसाठी जी किंमत मोजावी लागते ती मोजायची तयारी ठेवली तरच भविष्यात पत्रकारिता टिकू शकेल. नाहीतर पत्रकारितेचं स्वरूप 'माहिती-मनोरंजन' या पलीकडे जाणार नाही," असं रवी आंबेकरांनी म्हटलं.
 
बदलत्या माध्यमांच्या स्पर्धेत स्वतःला तयार करण्याचं आव्हान
ग्रामीण भागात युट्यूब चॅनेल्स सुरू झाले आहेत. त्यामुळे बदलत्या काळानुसार बदलण्याचं आव्हान पत्रकारांसमोर आहे असं मत आहे अहमदनगर लोकमतचे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके यांचं.
 
"बातमी देण्याची स्पर्धा आता गाव-खेड्यापर्यंत पोहोचली आहे. अनेक स्थानिक चॅनेल्स सुरू झाले आहेत. गाव-खेड्यात युट्यूब चॅनेल्सही सुरू झाले आहेत. त्यामुळे या 24 बाय 7 च्या स्पर्धेत टिकण्याची गरज स्थानिक पातळीवरही निर्माण झाली आहे. या सगळ्यामध्ये पत्रकारांना अभ्यासासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे बदलत्या माध्यमांच्या स्पर्धेत स्वतःला तयार कसं करणार हे आजच्या पत्रकारांसमोरचं प्रमुख आव्हान आहे," असं सुधीर लंके सांगतात.
 
स्थानिक पातळीवर काम करताना पत्रकारांना राजकीय किंवा अन्य दबावांना सामोरं जावं लागतं का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं, की "जिल्हा किंवा तालुका पातळीवर काम करताना पत्रकारांवर वेगवेगळे दबाव असतात, असं बऱ्याचदा म्हटलं जातं. त्यामुळे अनेकदा पत्रकार स्वतःच स्वतःवर कोणाच्या विरुद्ध लिहायचं किंवा कोणाच्या विरुद्ध लिहायचं नाही, अशी बंधन लादून घेतात. पण मला वाटतं, की बातमीदारी वेगळी आणि व्यवसाय वेगळा हे पत्रकारांनी समजून घ्यायला हवं. एखाद्या नेत्याची जाहिरात घेतली म्हणजे त्याच्याविरोधात लिहिताच येत नाही असं नाही. व्यवस्थापनही तसा आग्रह धरत नाही, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे."
 
"वेगवेगळ्या माध्यमांमुळे पत्रकारितेचं भविष्यातलं चित्र आशादायी असल्याचं त्यांनी म्हटलं. "माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटात पत्रकारितेमध्ये अनेक संधी आहेत. आता नोकरी किंवा व्यवसायासाठी तुम्ही मोठ्या ब्रँडवरच अवलंबून नाहीये. तुम्ही स्वतःचं युट्यूब चॅनेल सुरू करू शकता, वेबसाइट सुरू करु शकता. आणि यासाठी तुम्ही मोठ्या शहरात असण्याचीही गरज नाहीये," लंके सांगतात.
 
घटनांचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्यात मराठी पत्रकारिता कमी
गेल्या काही वर्षात जागतिक तसंच राष्ट्रीय पत्रकारितेमध्ये जे आर्थिक-धोरणात्मक बदल होत आहेत, त्याचा परिणाम म्हणजे पत्रकारिता ही काही ठराविक लोकांच्या हितसंबंधांपुरतीच मर्यादित झाली आहे. मराठी पत्रकारिताही याला अपवाद नाहीये. आजचं मराठी पत्रकारितेचं स्वरूप हे केवळ माहितीचं संकलन एवढ्या पुरतंच मर्यादित राहिलं आहे. घडलेल्या घटनांचा अन्वयार्थ लावण्यात मराठी पत्रकारिता कमी पडत आहे, असं मत नागपूरस्थित मुक्त पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी व्यक्त केलं.
 
महाराष्ट्रात अनेक वृत्तपत्रांच्या मुंबई-पुणे किंवा इतर शहराबाहेर आवृत्या आहेत. पण तिथे रिपोर्टरमध्ये गुंतवणूक केली जात नाही तर आवृत्तीसाठीच्या infrastructural गोष्टींमध्य केली जाते. त्यामुळे अमरावती, यवतमाळसारख्या शहरात रिपोर्टर Ad agent प्रमाणे काम करतात. हे एक प्रकारचं बिझनेस मॉडेल आहे ज्याचा परिणाम पत्रकारितेच्या दर्जावर होत असल्याचंही जयदीप हर्डीकर यांनी म्हटलं.
 
मराठी पत्रकारितेत मुंबई-पुणे आणि काही ठराविक भाग वगळता अन्य भागांना मिळणाऱ्या प्राधान्याबद्दल बोलताना जयदीप हर्डीकर यांनी म्हटलं, की विदर्भात शेतकरी आत्महत्या हा आंतरराष्ट्रीय विषय झाला तेव्हा अनेक माध्यमांनी त्याची दखल घेतली. पण त्यानंतर मात्र केवळ एखादी घटना घडल्यानंतरच लोकांचं या भागाकडे लक्ष जातं. शेतकऱ्याची आत्महत्या झाल, की त्याची बातमी होते. पण हे का झालं, कसं झालं, इथल्या कापसाच्या शेतीचा प्रश्न काय आहे हे समजून ते मांडण्याचा प्रयत्न कोणीच करत नाही. केवळ शेतकरी आत्महत्याचं नाही तर या भागातला man-animal conflict असेल किंवा खाणकामाचे प्रश्न असतील, त्याचं अभ्यासपूर्ण प्रतिबिंब माध्यमांमधून येत नाही, असं परखड मत जयदीप हर्डीकर यांनी व्यक्त केलं.