शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (17:31 IST)

शिवसेना-मनसेत 'विरप्पन' आणि 'खंडणी'वरून 'ट्वीटवॉर'

राजकीय आरोप-प्रत्यारोपांदरम्यान कधी प्राण्यांच्या, तर कधी सिनेमांमधील पात्रांच्या उपमा येणं नवीन नाही. मात्र, शिवसेना आणि मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांमधील ट्विटरवरील आरोप-प्रत्यारोपांमध्ये 'विरप्पन' शिरला आहे.
 
झालं असं की, आज (29 जानेवारी) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरून शिवसेनेवर टीका करणारं ट्वीट केलं.
 
संदीप देशपांडे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं, "विरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल."
 
या ट्वीटनंतर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी संदीप देशपांडे यांना उत्तर देणारं ट्वीट केलं. यावेळी सरदेसाई यांनी संदीप देशपांडे यांचं नाव घेणं टाळलं.
 
वरुण सरदेसाई त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले, "खरे विरप्पन कोण हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्याला पण माहित करून घ्यायचे असेल, तर 'मनसे खंडणी' असे फक्त गुगल सर्च करून बघावे. गुगलच्या पहिल्याच पेज वर या बातम्या सापडतील."
 
असं म्हणत वरुण सरदेसाई यांनी काही बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
 
वरुण सरदेसाई यांच्या या उत्तरानंतर संदीप देशपांडे यांनी पुन्हा ट्वीट केले आणि म्हटलं की, "मी विरप्पनबद्दल बोललो होतो. वरुणला का झोंबलं माहित नाही."
 
शिवाय, संदीप देशपांडे यांनीही एक स्क्रीनशॉट शेअर करत शिवसेनेच्या नेत्यांबाबतच्या बातम्या शेअर केल्या.
 
"वरूण म्हणाले, गुगलवर खंडणी टाका सगळं कळेल. आम्ही टाकून बघितलं. गुगल सब जनता है!" असं ट्वीटमध्ये संदीप देशपांडे म्हणाले.
 
मुंबई महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येतेय, तसतशी राजकीय पक्षांमधील आरोप-प्रत्यारोप वाढत जात आहेत. संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यातील 'ट्वीटवॉर' त्यातीलच प्रकार मानला जातोय. अर्थात, शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अद्याप याबाबत कोणतेच भाष्य केले नाही.