सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (20:57 IST)

तामिळनाडू : शशिकला यांची तुरुंगातून सुटका, पुढचं पाऊल काय?

'एआयएडीएमके'च्या बडतर्फ नेत्या आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या सहकारी व्ही. के. शशिकला यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या तुरुंगात होत्या.
 
2017 मध्ये बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शशिकाला यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. त्यांनी चार वर्षांची शिक्षा पूर्ण केली. बंगळुरूच्या परप्पना अग्रहरा तुरुंगात त्या शिक्षा भोगत होत्या.
 
नोव्हेंबर महिन्यात शशिकला यांनी न्यायलयात 10 कोटी रुपयांचा दंड भरला.
 
काही दिवसांपूर्वीच शशिकला यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल केलं होतं. व्हिक्टोरिया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्या ऑक्सिजन सपोर्ट सिस्टमवर आहेत.
तुरुंगातून सुटका झाल्यानंतरची सर्व कायदेशीर प्रक्रिया त्यांनी रुग्णालयात पूर्ण केली.
 
जयललिता यांच्या निधनानंतर त्यांची जागा घेण्यासाठी शशिकला योग्य असल्याचं म्हटलं जात होतं. जयललिता यांच्यानंतर पक्ष चालवण्यासाठी शशिकलाच सक्षम असल्याच्या प्रतिक्रिया पक्षातून येत होत्या.
 
जयललिता आणि शशिकला एकमेकींच्या संपर्कात कशा आल्या?

एमजी रामाचंद्रन मुख्यमंत्री असताना जयललिता पक्षाच्या प्रचार सचिव होत्या. त्यावेळी पहिल्यांदा शशिकला आणि जयललिता एकमेकांच्या संपर्कात आल्या.
 
सरकारमध्ये जनसंपर्क अधिकारी असलेले शशिकला यांचे पती एम. नटराजन यांनी प्रशासकीय अधिकारी चंद्रलेखा यांच्या मदतीने शशिकला यांची भेट जयललिता यांच्याशी केली.
 
एमजीआर यांच्या मृत्यूनंतर जयललिता यांना पक्षात डावलण्यात आलं त्यावेळी शशिकला आणि जयललित यांची जवळीक वाढली. काही काळातच जयललिता यांच्यासोबत राहण्यासाठी शशिकला त्यांच्या पोएस गार्डन घरी गेल्या.
 
शशिकला यांच्यासोबत त्यांची बहीण आणि मुलंही राहण्यासाठी गेले. शशिकला यांच्या एका भाच्याला जयललिता यांनी दत्तक घेतलं.
 
दत्तक घेतलेल्या याच मुलाच्या भव्यदिव्य लग्नामुळे जयललिता यांच्या संपत्तीवर आयकर विभाग आणि माध्यमांचं लक्ष गेलं.
 
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात जयललिता यांच्यावर 1991-96 दरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तेव्हा त्या मुख्यमंत्री होत्या. निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर शशिकला आणि त्यांच्या नातेवाईकांना घर सोडावं लागलं.
 
काही काळानंतर शशिकला पुन्हा जयललिता यांच्या घरी परतल्या पण परिस्थिती पहिल्या सारखी राहिली नाही.
 
2011 मध्ये जयललिता यांनी शशिकला यांची आपल्या घरातून हकालपट्टी केली. शशिकला यांचे नातेवाईक पक्ष आपल्या हातात घेण्याचा कट रचत असल्याचा संशय जयललिता यांना होता. पण तरीही जयललिता यांच्यानंतर शशिकला यांनाच पक्षाच्या क्रमांक दोनच्या नेत्या मानलं जात होतं.
 
पक्षाची धोरणं आणि संवाद कौशल्य यामुळे शशिकला यांची ताकद पक्षात वाढत गेली.
 
कालांतराने शशिकला यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी 2017 मध्ये न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली.