रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जून 2020 (15:20 IST)

लोणार सरोवराचं पाणी अचानक झालं गुलाबी

महाराष्ट्राच्या बुलडाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील आश्चर्य म्हणून ओळखलं जातं. मात्र, या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गेल्या काही दिवसांपासून गुलाबी झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
 
उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सरोवर आहे. हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे.
 
ऐरवी, इथलं पाणी हिरव्या रंगाचं असतं. अचानक पाण्याचा रंग गुलाबी झाल्याने सर्वजण आश्चर्यचकित झालेत. तर अनेकांच्या मनात याबाबत कुतुहुलही निर्माण झालं आहे.
 
पाण्याचा रंग बदलल्याचं लोणारच्या तहसीलदारांनीही मान्य केलं आहे.
 
"पाण्याने रंग कशामुळे बदलला, याचं संशोधन सुरू आहे. वनविभागाला या ठिकाणची सँपल्स घ्यायला सांगितलं असून तपासणीनंतरच यामागचं नेमकं कारण कळू शकेल," अशी माहिती तहसीलदार सैफन नदाफ यांनी दिली.याबाबत सध्या अधिक संशोधन सुरू आहे. महाराष्ट्रातील सगळ्यांत छोटं पक्षी अभयारण्य म्हणूनही लोणार सरोवराची ओळख आहे.
लोणार शहरातील सांडपाणी आणि पावसाचं पाणी सरोवरात गेल्याने सरोवर गढूळ झालं असावे अशी शक्यता गावकऱ्यांकडून केली जात आहे.
 
मात्र शहरातील सांडपाणी आणि पावसाच्या पाण्यामुळे सरोवरातील पाण्याचा रंग बदलला नसल्याचे तहसीलदार सैदल नदाफ यांचं म्हणणे आहे. पाण्याचा रंग कशामुळे बदलला याची चौकशी करण्यात येत आहे.