शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (09:01 IST)

भागवत कराड कोण आहेत? ते मंत्री झाल्यामुळे पंकजा मुंडे यांचं राजकारण अवघड होईल का?भागवत कराड

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज (7जुलै) रोजी विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांच्या नावांचा समावेश आहे.
 
गेले अनेक दिवस बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशा चर्चा सुरू होत्या. मात्र शपथविधीच्या दिवशी मात्र त्यांचे नाव यादीमध्ये नसल्याचे समजले. प्रीतम मुंडे दिल्लीमध्ये पोहोचल्याच्या बातम्याही काही ठिकाणी येत होत्या.
मात्र त्यांची बहीण पंकजा मुंडे यांनी मात्र असे काहीही झाले नसल्याचे स्पष्ट करत प्रीतम मुंबईतच असल्याचे ट्वीटरवरुन स्पष्ट केले. "खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत." असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर भागवत कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश होत असल्याच्या बातमीने सर्वांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्या. वंजारी समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. कराड यांना मंत्रिपद देण्याशी भारतीय जनता पार्टीमधील अंतर्गत समीकरणांचा काही संबंध आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
 
कोण आहेत भागवत कराड?
भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे.
ते ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे स्वतंत्र संचालकही होते. भाजपचे उपाध्यक्ष अशीही त्यांच्याकडे एक जबाबदारी आहे. भागवत कराड औरंगाबादचे दोनवेळा महापौर होते.
 
औरंगाबादला पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान
डॉ. भागवत कराड यांच्या रुपाने औरंगाबादच्या संसद प्रतिनिधीला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. भागवत कराड यांची गेल्या वर्षी राज्यसभेवर निवड झाली होती. तेव्हा भागवत कराड पंकजा मुंडे यांना पर्याय ठरू शकतात का असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांना बीबीसी मराठीने विचारला होता.
तेव्हा डोळे म्हणाले होते, "भागवत कराड हे ओबीसी नेतेच काय, ते मुंडे कुटुंबीयांनाही पर्याय ठरू शकत नाहीत. एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांना ओबीसी नेते ही ओळख मिळाली. त्यात गोपीनाथ मुंडे यांनी खऱ्या अर्थानं ओबीसींचं राजकारण केलं. भागवत कराड यांनी राज्यसभेत जाण्यापूर्वी औरंगाबादच्या महापौरपदाच्या पलीकडे काही फारशी उडी मारली नाही."
 
गोपीनाथ मुंडे यांनी आणलं राजकारणात
भागवत कराड यांची कारकीर्द आणि त्यांच्या मंत्रिपदामुळे भाजपने ओबीसी, वंजारी समाजाचा नेत्याला प्रतिनिधित्व देण्याची संधी साधली का? तसेच पंकजा मुंडे यांना हा शह आहे का याबद्दल लोकमतचे औरंगाबाद आवृत्तीचे संपादक नंदकिशोर पाटील यांनी बीबीसी मराठीकडे आपले मत मांडले.
 
ते म्हणाले, कराड हे अकॅडेमिशियन आहेत. त्यांचा मूळचा पिंड राजकारण्याचा नव्हता. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे ते राजकारणात आले. औरंगाबादचे दोनवेळा महापौरपद त्यांनी भूषवले आहे. मंत्रिमंडळातील एका उच्चशिक्षित डॉक्टरच्या समावेशाने एक प्रकारचा समतोल साधला जाईल, असा विचार असू शकतो.
त्यांच्या निवडीला जातीय समीकरण आणि पक्षांतर्गत शह-काटशहाचं समीकरण असेल का असे विचारताच नंदकिशोर पाटील म्हणाले, "वरवर पाहता मुंडे भगिनींना शह देण्याचा हा प्रकार वाटू शकतो. ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असल्यामुळेही तसे वाटू शकते. परंतु पंकजा मुंडे पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीत आहेत आणि एकाच घरात दोन पदे देणे शक्य नसल्यानेही हा निर्णय घेतला गेला असावा."
 
सध्या ओबीसी राजकारणाचा गाजत असलेला मुद्दा तसेच वंजारी समाजाला प्रतिनिधित्वही दिलं जाण्याचाही हेतू यातून साध्य होऊ शकतो.
 
भागवत कराड यांना राज्यसभेवर आणि रमेश कराड यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात भाजपाचं ओबीसी नेतृत्व कोणाकडे जाईल याची चर्चा सुरू होती. तेव्हा पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले होते, "भाजपनं भागवत कराड आणि रमेश कराड यांना संधी दिली असली तरी, या दोघांमध्ये वंजारी समाजाचं नेतृत्व करण्याची क्षमता नाही. शिवाय, समाजही यांना मान्यता देणार नाही, कारण वंजारी समाजामधील त्यांचा सहभाग तेवढा प्रभावी नाही"
 
किंबहुना, बीबीसी मराठीच्या मुलाखतीतच पंकजा मुंडे यांनीच सांगितलं होतं की, रमेश कराड आणि भागवत कराड हे मलाच नेतृत्व मानून पुढे जात आहेत.