अखेर सिद्धार्थने मौन सोडले
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री आलिया भट या कोणे एके काळच्या लव्हबर्डसच्या ब्रेकअपनंतर चाहते नाराज झाले होते. दोघांनी आपल्या नात्याविषयी कधीच जाहीर वाच्यता केली नव्हती. मात्र 'कॉफी विथ करण'मध्ये सिद्धार्थने आपले मन मोकळे केले आहे. इतकंच नाही, तर जॅकलीन फर्नांडिस आणि कियारा अडवाणी यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवरही त्याने दिलखुलास उत्तरे दिली. 'कॉफी विथ करण 6'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत आशिकी फेम अभिनेता आदित्य रॉय कपूरला निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी ब्रेकअपनंतर आलियासोबतच्या नात्याविषयी करणने सिद्धार्थला छेडले. याला उत्तर देताना दोघांच्या नात्यात कडवटपणा नसल्याचे सिद्धार्थने सांगितले.
सिद्धार्थ म्हणाला, डेटिंग सुरु करण्यापूर्वी मी आलियाला ओळखत होतो. 'स्टुडंट ऑफ दि इयर'चा पहिला सीन मी आलियासोबत शूट केला होता. त्यामुळे हे नातं फक्त 'एक्स' म्हणण्यापुरतं नाही. जेव्हा एखादं नातं तुटतं, तेव्हा चांगल्या आणि सुंदर आठवणी लक्षात ठेवायला हव्यात, असंही तो म्हणाला. जॅकलीन फर्नांडिस आणि कियारा अडवाणी यांच्याशी नाव जोडले जाण्याबाबत सिद्धार्थ म्हणाला, जॅकलीनसोबत खास नातं असलं, तरी डेटिंगच्या चर्चांमध्ये काहीच अर्थ नाही. कियारासोबत डेटिंगच्या चर्चा एखाद दिवस खर्या ठराव्यात अशी अपेक्षा आहे, असे संकेतही सिद्धार्थने दिले.