शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

शाहरुख खान : 'बाजीगर'पासून ते 'जवान'पर्यंत, अँटी हिरो ते सुपरस्टार होण्याची गोष्ट

-वंदना
1992 ची ती गोष्ट, टीव्हीच्या पडद्यावर अगदीच नवखा असणाऱ्या शाहरुख खानचा दीवाना नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
 
अत्यंत बेफिकीर आणि बंडखोर दिसणाऱ्या शाहरुखने मोटारसायकलवर बसून केवळ दीवाना चित्रपटातच प्रवेश केला नव्हता तर त्याने लोकांच्या मनात जागा मिळवली होती.
 
त्यानंतर 1993 मध्ये शाहरुखच्या 'बाजीगर' आणि 'डर' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
 
आज जरी शाहरुखला 'किंग ऑफ रोमान्स' म्हणून ओळखलं जात असलं तरी त्याच्या सुरुवातीच्या काळात तो एक अँटी हिरो म्हणून रसिकांसमोर दाखल झाला होता.
 
1993 मध्ये बाजीगर चित्रपटात पहिल्यांदा अँटी हिरोची भूमिका केलेल्या शाहरुख खानचा प्रवास आता 2023 मध्ये आलेल्या जवान पर्यंत येऊन पोहोचला आहे.
 
थोडक्यात काय तर तीन दशकांच्या प्रवासात शाहरुखने अँटी हिरोच्या भूमिकांबाबत एक वर्तुळ पूर्ण केलं आहे असं म्हणावं लागेल.
 
ज्येष्ठ फिल्म पत्रकार नम्रता जोशी म्हणतात की, "बाजीगर आणि डरमध्ये शाहरुखने साकारलेली अँटी हिरोची भूमिका ही एखाद्या मुलीवर असणाऱ्या त्याच्या प्रेमामधून प्रेरित झालेली होती.
 
मात्र कालांतराने त्याने या नकारात्मक भूमिकांपासून स्वतःला दूर केलं आणि तो अगदीच शहरी, रोमँटिक, ग्लोबल आणि कूल भूमिका साकारायला लागला. मागील काही वर्षांमध्ये त्याने स्वतःची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आणि मग एकापाठोपाठ एक त्याचे चित्रपट डब्यात जाऊ लागले."
 
"आता 2023 मध्ये शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या पठाण आणि जवानमधून त्याने स्वतःच जुनं वलय परत मिळवायला सुरुवात केलीय असं दिसतंय.
 
आपण सध्या ज्या परिस्थितीत राहतो आहोत त्या परिस्थितीत शाहरुख सत्तेला आव्हान देऊ पाहतोय ही बाब हिंदी चित्रपटांसाठी नवीनच म्हणावी लागेल. चित्रपटांमधून सरकारच्या विरोधात आळवण्यात आलेला हा सूर नक्कीच लक्षणीय आहे.
 
त्यामुळं बाजीगर एका प्रेमिकेसाठी त्याने साकारलेला अँटी हिरो आणि आता जवानमध्ये संपूर्ण सत्तेच्या आणि व्यवस्थेच्या विरोधात साकारलेला अँटी हिरो, या दोन्ही भूमिका मूलभूत पातळीवर वेगवेगळ्या आहेत. या भूमिकांमध्ये असणारा फरक हे शाहरुखने मागील तीस वर्षात केलेल्या प्रवासाचं द्योतक आहे."
 
30 वर्षांपूर्वी म्हणजेच 13 नोव्हेंबर 1993 ला अब्बास मस्तान यांचा बाजीगर नावाचा चित्रपट आला होता.
 
केवळ काही मालिका आणि एक-दोन चित्रपटांमध्ये काम केलेला शाहरुखसारखा नवखा अभिनेता एवढी हिंस्र भूमिका करू शकेल अशी कुणालाही अपेक्षा नव्हती. बाजीगर मध्ये चेहऱ्यावर कसलाही भाव न आणता त्याने केलेले खून हे अनेकांसाठी धक्कादायक होते.
 
बाजीगर चित्रपटाच्या सुरुवातीला शाहरुख खान आणि शिल्पा शेट्टी यांची दोन रोमँटिक गाणी आहेत. त्यानंतर ते दोघे कोर्टात लग्न करायला जातात आणि अचानक शाहरुख खान शिल्पा शेट्टीला एका उंच इमारतीवरून अतिशय निर्दयीपणे ढकलून देतो.
 
अत्यंत थंड डोक्याने शाहरुखने शिल्पा शेट्टीला मारलेलं असतं. पडद्यावर सगळं काही गोडीगुलाबीत सुरू असताना अचानक झालेला हा खून चित्रपट बघणाऱ्यांसाठी धक्कादायक असतो.
 
त्याकाळी ज्या प्रकारचे चित्रपट यायचे ते बघता असं काहीतरी दाखवणं हे खूपच धाडसाचं आणि प्रवाहापासून वेगळं असणारं काहीतरी होतं.
 
एकीकडे 'मैने प्यार किया'मधून सलमान प्रेमाखातर अग्निदिव्यातून जात होता, दुसरीकडे आमिर खान कयामत से कयामत तकमध्ये प्रेमासाठी सगळं काही अर्पण करत होता आणि त्याचवेळी अजय शर्मा उर्फ विकी मल्होत्रा (शाहरुख) बाजीगरमधून बॉलिवूडच्या नायकाची प्रतिमा मोडीत काढत होता.
 
चित्रपट इतिहासकार अमृत गांगर म्हणतात की, "शाहरुखने सुरुवातीपासूनच वेगळे प्रयोग केले होते. मणी कौल यांच्या अहमक चित्रपटापासून त्याने सुरुवात केली होती.
 
त्याने माया मेमसाब सारख्या चित्रपटातही काम केलेलं होतं. सर्कससारखी एक मालिकाही केलेली होती. पण बाजीगर हा चित्रपट हिट झाला आणि शाहरुखला अँटी हिरो म्हणून ओळख मिळाली.
 
शाहरुख खानचं अभिनय कौशल्यच यातून दिसून येतं, तो कोणकोणत्या प्रकारचा अभिनय करू शकतो हेच त्याने सुरुवातीला दाखवून दिलेलं होतं. बॉलिवूडमध्ये भूमिका देत असताना जे समज पाळले जायचे, ज्या चौकटीत त्या बसवण्याचा प्रयत्न केला जायचा त्या चौकटी ध्वस्त करण्याची शाहरुख खानची जिद्द यातून दिसून येतं.
 
यश चोप्रा यांच्या डर चित्रपटात देखील शाहरुखला नकारात्मक भूमिका देण्यात आलेली होती आणि त्याकाळी नायकाच्या नकारात्मक छटा दाखवण्याचा प्रयत्न कुणीही करत नसायचं."
 
अनेक आघाडीच्या अभिनेत्यांनी बाजीगरमधली विकी मल्होत्राची भूमिका नाकारली होती कारण ती अत्यंत नकारात्मक आणि हिंस्र होती.
 
चित्रपटक्षेत्रात नवखा असूनही शाहरुख खानने अशी भूमिका निवडण्याचं धाडस केलं. बाजीगरनंतर एक महिन्याने 24 डिसेंबर 1993 ला यश चोप्रा यांचा डर हा चित्रपट आला.
 
मानसिक पातळीवर अस्थिर असणाऱ्या एका मुलाची भूमिका शाहरुखने डर मध्ये केली होती, एकतर्फी प्रेमातून हा मुलगा एवढ्या टोकाला जाऊन पोहोचतो की तो स्वतःसाठी आणि त्याचं जिच्यावर प्रेम आहे त्या मुलीसाठीही धोकादायक बनतो.
 
आजच्या आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर डरमधला शाहरुख हा एक स्टॉकर होता.
 
डरमध्ये शाहरुख खानने साकारलेली भूमिका त्याआधी यश चोप्रा यांनी ऋषी कपूर यांना दिलेली होती.
 
ऋषी कपूर त्यांच्या खुल्लम खुलला नावाच्या आत्मचरित्रात लिहितात की, "यश चोप्रांनी मला डर मधली भूमिका ऑफर केली तेंव्हा मी त्यांना सांगितलं की मी खलनायकाच्या भूमिकेसोबत न्याय करू शकणार नाही. मी आत्ताच तुमच्यासोबत चांदनी (जो एक रोमँटिक चित्रपट होता) केला आहे.
 
मी त्याआधी खोज नावाच्या चित्रपटात एक नकारात्मक भूमिका केली होती आणि तो चित्रपट फ्लॉप झाला होता. तुम्ही शाहरुख खानला डर मध्ये घेऊ शकता, मी त्याच्यासोबत अभिनय केला आहे आणि तो अतिशय स्मार्ट मुलगा आहे.
 
त्यानंतर आमीर खान आणि अजय देवगण यांना त्या चित्रपटाची ऑफर देण्यात आली. त्या दोघांनीही ती भूमिका नाकारली आणि अखेर शाहरुख खानला त्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली."
 
शाहरुखने बाजीगरमध्ये केलेली विकीची भूमिका असो किंवा मग डर मध्ये त्याने साकारलेला राहुल, हे दोन्ही चित्रपट बघून शाहरुख खानच्या पात्रांबाबत बघणाऱ्यांच्या मनात घृणा तयार होते, तुम्ही विकी आणि राहुलचा द्वेष करू लागता आणि तिथेच शाहरुख खान यशस्वी होतो कारण रूढार्थाने त्या चित्रपटाचा हिरो असणाऱ्या सनी देवलची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षातही राहत नाही आणि सगळ्या नजरा शाहरुखच्या पात्रांवर खिळलेल्या असतात.
 
शाहरुखने त्या चित्रपटांमध्ये केलेलं काम कुणीही विसरू शकत नाही.
 
या चित्रपटासाठी संवाद लिहिणाऱ्या किंवा पटकथा लिहिणाऱ्या लेखकांनाही तेवढंच श्रेय जातं पण शाहरुखने साकारलेली पात्रं रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये अजरामर ठरली आहेत.
 
अमृत गांगर म्हणतात की, "90च्या दशकात बदल घडत होता, पडद्यावर शाहरुख खानमध्ये लोक स्वतःला बघत होते. प्रेम आणि शृंगारिक भावनांचा एक सुंदर मिलाफ असणाऱ्या त्या नकारात्मक भूमिका शाहरुखने लीलया पेलल्या होत्या.
 
त्यामध्ये एक वेडेपणा होता आणि त्याकाळी जागतिकीकरणाच्या वादळाला सामोरं जाणाऱ्या भारतीय तरुणांना असाच वेडेपणा हवा होता. उदाहरणच घ्यायचं झालं तर त्याकाळी हिंदी चित्रपटांमध्ये न दिसणारे भाव डर मध्ये दाखवण्यात आलेले होते. मोठ्या पडद्यावर दिसणारी शाहरुख खानची जादू ही अनेकांसाठी एक गूढ रहस्य बनली होती."
 
ज्यांनी हा चित्रपट पहिला असेल त्यांना एक सीन स्पष्टपणे आठवत असेल आणि तो म्हणजे डर चित्रपटातला राहुल जो एरवी अगदीच शांत असतो तो फोनवर अचानक त्याच्या आईशी बोलू लागतो, त्याच्या आईचं त्याआधीच निधन झालेलं असतं.
 
राहुल चाकूने त्याच्या छातीवर 'किरण' असं लिहीत असतो किंवा मग तो सिन जेव्हा जुही चावलासोबत साखरपुडा झालेला सनी देवल वेषांतर केलेल्या शाहरुखला बघतो आणि शाहरुखचा पाठलाग करू लागतो.
 
प्रेक्षकांसमोर हे सगळं नाट्य घडत असतं, जवळपास तीन मिनिटांचं ते दृश्य आहे ज्यामध्ये सनी देओल शाहरुखचा पाठलाग करत असतो, प्रेक्षकांना हेही माहीत असतं की शाहरुख खानचं पात्र चुकीचं आहे पण तरीही अनेकांना शाहरुखला सनी देओलने गाठूच नये असं वाटत राहतं.
 
शाहरुखच्या पात्राला असणाऱ्या गर्द छटांमुळे अनेकांनी त्यावर टीकाही केलेली होती पण डर असो किंवा बाजीगर या दोन्ही चित्रपटांमध्ये शाहरुखने अँटी हिरोच्या भूमिका करून एक उदाहरण प्रस्तुत केलं.
 
विशेष म्हणजे अनेकांनी नाकारलेल्या भूमिका त्याने स्वीकारल्या आणि ते दोन्ही चित्रपट हिट करून दाखवले.
 
शाहरुख खानला खऱ्या अर्थाने 'किंग खान' बनवणारे दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है सारखे चित्रपट तर खूप नंतर आले.
 
पण, किंग खान नावाच्या उत्तुंग इमारतीचा मजबूत पाया म्हणून शाहरुखने साकारलेल्या अँटी हिरोच्या भूमिकांनी काम केलं. शाहरुखने केलेल्या धाडसी प्रयोगांमुळे अनेक जोखमी घेणारा एक अभिनेता प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला.
 
अंजाम, माया मेमसाब, डार्लिंग ये है इंडियासारखे अत्यंत वेगळे प्रयोगही शाहरुख प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच करू शकला.
 
चित्रपटसृष्टीमध्ये शाहरुखने कमावलेलं स्टारडम हे काही सहजासहजी आलं नव्हतं. त्याच्या मार्गातही अनेक काटे होते. सुरुवातीचे काही चित्रपट दणकून आपटले होते.
 
अनेकांनी त्याच्या अभिनयावर टीकाही केली होती पण याच प्रवासात बॉक्स ऑफिसवरचे अनेक विक्रम मोडणारा शाहरुख नवनवीन प्रयोग करत होता.
 
चित्रपट फ्लॉप ठरू लागल्यानंतर अनेकांना असं वाटलं होतं की शाहरुखचा काळ आता संपला आहे.
 
त्याच्या कारकिर्दीत असा काळही आला जेंव्हा शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसलाच नाही . मात्र टीव्हीवर विमल इलायची ची जाहिरात करताना मात्र तो दिसत राहिला.
 
दरम्यान त्याने केलेल्या विधानांवरून अनेक राजकीय वादही झाले, त्याच्या मुलाला तुरुंगातही डांबण्यात आलं पण हे सगळं बघणारा शाहरुख त्याकाळात खूप शांत होता.
 
आणि 2023 मध्ये त्याच्या पठाण आणि जवान चित्रपटांमधून शाहरुखने त्याच्या विरोधकांचे दात घशात घातले. त्याने दिलेलं हे उत्तर अगदी त्याच्या शैलीत होतं, त्याच्या कारकिर्दीला आणि एकूणच व्यक्तिमत्वाला साजेसं होतं असंच म्हणावं लागेल.
 
"बेटे को हात लगाने से पहले, बाप से बात कर" हा त्याचा डायलॉग केवळ चित्रपटातला डायलॉग नव्हता तर त्याने दिलेलं ते खणखणीत उत्तर होतं.
 
तो आला, त्याने हा डायलॉग मारला आणि मग बघणाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार त्याचे राजकीय आणि सामाजिक अर्थ काढले.
 
बाजीगर आणि डर या चित्रपटांसारखाच जवानमधला राठौर हा देखील एक अँटी हिरोच आहे पण नव्वदीच्या अँटी हिरोपेक्षा हा हिरो वेगळा आहे.
 
समाजात पसरलेल्या भ्रष्टाचाराला आजाद राठौर आणि त्याचा ग्रुप आव्हान देतो, कायदा हातात घेतो, सरकारी नियम आणि कायदे त्याच्यासाठी महत्वाचे नसतात पण बाजीगर आणि डरमधल्या अँटी हिरोसारखा तो लोकांचे जीव घेत नाही तर त्यांचं रक्षण करत असतो.
 
पण नम्रता जोशींची एक तक्रारही आहे, "जवान हा चित्रपट यशस्वी झाला पण एक चित्रपट म्हणून त्याचा दर्जा काही एवढा भारी नव्हता.
 
हा एक पुरुषप्रधान चित्रपट आहे ज्यामध्ये शाहरुख खानचं पात्र महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न तर करतं पण मला शाहरुखने चक दे इंडिया सारख्या चित्रपटांमध्ये केलेली भूमिका जास्त आवडली होती.
 
ज्यामध्ये एका महिला संघाला तो विजयापर्यंत घेऊन जातो. जवानमध्ये लैंगिक समानता दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे पण तो यशस्वी ठरलेला नाहीये."
 
आपल्या गोष्टीची सुरुवात बाजीगर पासून झाली होती तर शेवटही त्यावरच करूया.
 
या चित्रपटाचं शूटिंग डिसेंबर 1992 मध्ये सुरू झालं होतं पण त्यानंतर दंगलीच्या आगीत मुंबई जळून खाक झाली आणि काही महिन्यांनंतर त्याचं शूटिंग पुन्हा सुरू होऊ शकलं.
 
या चित्रपटासाठी श्रीदेवीपासून माधुरीपर्यंत अनेक अभिनेत्रींशी बोलणी झाली होती पण श्रीदेवीला काजोल आणि शिल्पा या दोन बहिणींची भूमिका करायची होती पण दिग्दर्शकांना वाटलं की शाहरुखच्या हातून श्रीदेवीसारख्या मोठ्या नायिकेची हत्या होणं प्रेक्षकांना रुचणार नाही.
 
या चित्रपटात दिलीप ताहिल यांनी मदन चोप्रा यांची भूमिका केली होती त्याचा बदला घेण्यासाठीच शाहरुख खान म्हणजेच अजय त्याचं मूळ नाव सोडून विकी अर्थात बाजीगर बनतो.
 
'द अनट्रिडगर्ड' नावाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना दलीप ताहिल यांनी याबाबत सांगितलं होतं.
 
ते म्हणाले की, "मी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर होतो तेंव्हा एक मुलगी माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की बाजीगरमध्ये तुम्ही शाहरुख खानला एवढं का मारलंत? म्हणजे का? ती मुलगी शाहरुखमय बनली होती."
 
बाजीगर आणि डर मधल्या खून करणाऱ्या पात्राला माणुसकीच्या पातळीवर आणणं यातच शाहरुख खानच्या अभिनयाचं यश होतं.
 
त्यादरम्यान शाहरुख खान राज बनला, भारतीय हॉकी संघाचा प्रशिक्षक असणारा कबीर खान बनला, परदेशातून स्वतःच्या देशात परत आलेला स्वदेस मधला मोहन बनला, पहेली चित्रपटात तो गावात राहणारा किशनलाल बनला, यस बॉसमध्ये 'चांद तारे' तोडून आणू पाहणारा राहुल बनला, हे राम मध्ये अमजद अली खान बनला आणि अगदी अलीकडे झिरोमध्ये बऊआ सिंगही बनला.
 
शाहरुखच्या कोट्यवधी चाहत्यांनी त्याच्या याच सगळ्या भूमिकांमध्ये स्वतःचा हिरो शोधला, कुणी खलनायक शोधला तर काहीजण अजूनही सुमारे तीन दशकांपासून त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला साकारलेल्या अँटी हिरोच्या प्रेमात तसेच आहेत.