'साहो' चित्रपट प्रदर्शनाच्या काही वेळातच लीक
प्रभास आणि श्रद्धा कपूर स्टारर 'साहो' चित्रपटाला प्रदर्शनाच्या काही वेळातच पायरसीचा फटका बसला आहे. 'साहो' प्रदर्शित झाल्याच्या काही तासांतच ऑनलाइन लीक करण्यात आला आहे.
'साहो'साठी प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्सुकता होती. या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी अॅडव्हान्स बुकिंगही केलं होतं. मात्र अशातच टोरंट साइट तमिल रॉकर्सकडून चित्रपट ऑनलाइन लीक करण्यात आला आहे. याआधीदेखील तमिल रॉकर्सकडून अनेक चित्रपट लीक करण्यात आले आहेत. तमिल रॉकर्स नावाची ही साइट जवळपास प्रत्येक आठवड्यात प्रदर्शित होणारे चित्रपट ऑनलाइन लीक करते. पहिल्याच प्रदर्शनानंतर तमिल रॉकर्सने 'जजमेंटल है क्या', 'पेटा', 'गली बॉय', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान', 'विश्वासम' आणि '२.०' यांसारखे चित्रपट लीक केले आहेत.
पायरसी वाढवणाऱ्या आणि चित्रपट ऑनलाइन लीक करणाऱ्या या साइटवर सरकारने बंदी घातली आहे. पायरसीविरोधात 'फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'च्या सदस्यांकडून याबाबत आंदोलनही करण्यात आले. मद्रास उच्च न्यायालयाकडूनही याबाबत दखल घेण्यात आली. मात्र तरीही तमिल रॉकर्सकडून सतत चित्रपट लीक केले जात आहेत.