शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 8 एप्रिल 2021 (09:59 IST)

कोरोना व्हायरस : कोव्हिड-19च्या दुसऱ्या लाटेशी सुरू आहे डॉक्टरांची अथक झुंज

विकास पांडे
जानेवारीच्या मध्यातला काळ... जवळपास वर्षभरानंतर आता तरी कदाचित आपल्याला कुटुंबासोबत वेळ घालवता येईल असं डॉ. लान्सलॉट पिंटो यांना वाटलं होतं.
 
मुंबईतील श्वसन विकारतज्ज्ञ डॉ. पिंटो यांनी 2020 मधला बहुतेक काळ कोव्हिडच्या रुग्णांवर अथकपणे उपचार करण्यात घालवला आहे.
 
सप्टेंबरमधल्या 90,000 च्या रुग्णसंख्येवरुन हा दर जानेवारी महिन्यात भारतात 20,000 पेक्षा कमी झाला होता. आता कदाचित परिस्थिती सुधारेल, असं यावेळी त्यांना वाटून गेलं.
पण मार्च महिन्यात सगळी परिस्थिती बदलली आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढायला लागली. 4 एप्रिलला भारतातली एका दिवसातली रुग्णसंख्या ही साथ सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एक लाखाच्या वर गेली.
 
यातले निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यातले होते. त्यातही मुंबईची रुग्णसंख्या सर्वांत जास्त होती.
आता डॉ. पिंटोंचा फोन दर मिनिटाला वाजतोय. कोव्हिड पेशंट्ससाठी बेड शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या, घायकुतीला आलेल्या कुटुंबीयांचे फोन त्यांना सतत येतायत.
 
"आमच्याकडे खरंच जागा नाही. माझ्या हॉस्पिटलमधले सगळे कोव्हिड -19 बेड्स फुल्ल आहेत," ते सांगतात.
 
"यात लोकांचीही चूक नाही," शांत राहाण्याचा प्रयत्न करत ते सांगतात.
 
"जेव्हा घरातल्या एखाद्या आजारी माणसाला बेड हवा असतो, तेव्हा मदतीसाठी कोणालाही फोन करायची तुमची तयारी असते," ते सांगतात.
 
त्यांच्या हॉस्पिटलमधली त्यांची टीम या दुसऱ्या लाटेसाठी अधिक चांगल्या रीतीने सज्ज आहे. या टीममधल्या बहुतेकांनी लस घेतलेली आहे आणि रुग्णांवरच्या उपचारासाठीचे नियमही आता अधिक स्पष्ट आहेत.
 
पण, "मानसिक तयारी कोणाचीच नाही," ते सांगतात.
 
"आम्हाला शक्य असेल ते सगळं आम्ही करतोय, पण गेल्या वर्षी आम्ही जितके मानसिक दृष्ट्या कणखर होतो, तितके आता नाही."
 
'राजधानी दिल्लीतही नाही परिस्थिती वेगळी'
राजधानी दिल्ली आणि इतर राज्यांमधल्या हॉस्पिटल्समधली स्थितीही फारशी वेगळी नाही. हॉस्पिटलमध्ये दररोज येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचं गुरुग्रामच्या आर्टेमिस हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर विभागाच्या प्रमुख डॉ. रेश्मा तिवारी बसू सांगतात.
गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीत दररोज सरासरी 3,500 रुग्ण नोंदवले जातायत. "मुंबईत आत्ता जे होतंय ते लवकरच दिल्लीतही होणार आहे," डॉ. बसू सांगतात.
 
दिल्लीतली अनेक खासगी हॉस्पिटल्स आताच भरली आहेत. रविवारच्या दिवशी माझ्या एका नातेवाईंकाना 4 हॉस्पिटल्सनी बेड्स नसल्याचं सांगत प्रवेश नाकारला.
 
"रुग्णसंख्येत झालेली ही वाढ अनपेक्षित नाही, पण अजूनही साथ संपली नसल्याचं लोक जवळपास विसरले असल्याचं," त्या उद्विग्न होऊन सांगतात.
 
"रुग्णसंख्येत वाढ झाल्याचा परिणाम आता आरोग्य कर्मचाऱ्यांना भोगावा लागतोय," त्या सांगतात.
 
या हॉस्पिटल्सच्या बाहेर, दिल्लीत इतरत्र आयुष्य नेहमी प्रमाणेच सुरू होतं. रेस्टॉरंट्स आणि नाईट क्लब्स भरले होते, बाजारपेठा खुल्या होत्या आणि गर्दीने ओसंडून वाहत होत्या. फारच कमी जण सोशल डिस्टंन्सिंग पाळताना आणि मास्क वापरताना दिसत होते.
 
लोकांच्या या वागण्यामुळे मेदांता हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर विभागाचे अध्यक्ष डॉ. यतिन मेहता वैतागलेले दिसले.
 
'भारताने संधी गमावली?'
जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये भारताकडे जी संधी होती, ती गमावल्याचं ते सांगतात.
 
"रुग्णसंख्येत घट होण्याचा हा काळ आपण खबरदारीच्या उपायांची कठोर अंमलबजावणी, अधिक जास्त टेस्टिंग आणि ट्रेसिंग, जास्त लसीकरण यासाठी वापरायला हवा होता," ते सांगतात. पण तसं घडलं नाही. आणि आताची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असल्याचं तज्ज्ञ सांगतायत.
फेब्रुवारीच्या आधी डॉ. मेहतांना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवता येत होता. बायको, दोन मुलं-सुना आणि नातवंडांसोबत वेळ घालवणं त्यांना शक्य होतं. पण आता त्यांचाही फोन सतत खणखणत असतो. आमच्या मुलाखतीदरम्यानही त्यांना अनेक कॉल्स आले.
 
ते सांगतात, "लोकांनी लक्षात घ्यायला हवं की आरोग्यक्षेत्रातले कर्मचारीही दमलेले आहेत आणि सगळी शक्ती पणाला लावून काम करतायत. पण आम्ही असं आणखी किती काळ करू शकू, हे मला सांगता येणार नाही. आम्हाला शक्य ते सगळं आम्ही करू. पण ही दुसरी लाट सगळ्याच बाबतीत आमची परीक्षा घेतेय."
 
आणि हा थकवा फक्त शारीरिक नसल्याचं डॉ. मेहता सांगतात. देशभरातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी त्यांना वाटतेय. "कल्पना करा की तुम्ही जे काही काम करताय, ते तुम्हाला 24 तास, आठवड्याचे सातही दिवस करावं लागतंय आणि ते करताना तुमच्यावर एरवीपेक्षा 100 पटींनी जास्त ताण आहे...काय होईल अशा परिस्थिती? साथ ऐन भरात असताना याच सगळ्याला प्रत्येक डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवा कर्मचारी सामोरं जात असतो."
 
'फ्रंटलाईन वर्कर्सच्या मानसिक आरोग्याची काळजी कोण घेणार?'
धोरणकर्त्यांनी आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा विचार करायला हवा, असं इतर डॉक्टर्सनाही वाटतं. थकवा, मनावर होणारा परिणाम आणि मानसिक आरोग्य याबाबत बोलण्याची संधी सध्या डॉक्टरांकडे नसल्याचं डॉ. बसू म्हणतात.
 
"सध्या आम्ही मैदानात उतरुन या साथीशी मुकाबला करत आहोत पण याचा अर्थ आम्हाला अडचणी नाहीत, असा होत नाही."
 
साथीची ही दुसरी लाट अधिक थकवणारी असल्याचं वैदयकीय क्षेत्रात असणारे अनेक जण सांगतात. "हा संसर्ग संपण्याची लक्षणंच दिसत नाहीयेत..."
या साथीला सुरुवात झाली तेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मनातही भीती होती, असं डॉ. पिंटो सांगतात. पण नंतर रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यावर सगळा भर गेला आणि ही भीती नाहीशी झाली.
 
नोव्हेंबर महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा एकदा वर गेली होती, पण तेव्हा लशी येऊ घातल्या होत्या आणि त्यामुळे कदाचित परिस्थिती आता आटोक्यात येईल असं अनेकांना वाटत होतं. पण आताच्या रुग्णसंख्येच्या उसळीने या सगळ्या आशा धुळीला मिळवल्या.
 
"हे म्हणजे तुम्ही लढताय ते युद्ध कधी संपणार तेच माहित नसल्यासारखं आहे," डॉ. पिंटो सांगतात. लसीकरणामुळे आशा वाढलेल्या होत्या.
 
'लसीकरणाचा वेग वाढवणे आवश्यक'
भारतात आतापर्यंत लशीचे 8.7 कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. यामध्ये फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांचा जास्त समावेश आहे.
 
आता 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्वांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आलीय. पण संसर्ग आटोक्यात आणायचा असेल तर लसीकरणाचा वेग वाढवणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
फक्त डॉक्टर्सच नाही तर नर्सेस आणि वॉर्डबॉईजही दमलेले आणि कामाच्या भाराने पिचलेले आहेत.
 
PPE सूट घालून त्यांनी तासन् तास काम केलंय. आणि अनेकदा त्यांना एकाच वेळी अनेक रुग्ण हाताळावे लागतात. केरळ राज्यातल्या एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमधल्या नर्स विद्या विजयन सांगतात, "लोकांनी ही पाळी स्वतःवर ओढवून आणलेली आहे."
 
राज्यातले लोकांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये खबरदारी पाळण्यात कुचराई केल्याचं त्या सांगतात. ज्या 5 राज्यांमध्ये निवडणुका होतायत, त्यापैकी केरळ एक आहे. या राज्यांमध्ये मोठ्या प्रचारसभा पार पडतायत. पण नेते किंवा लोक कोणीही खबरदारीच्या उपायांचं पालन करताना दिसत नाही.
 
या राज्यात चांगली आरोग्य व्यवस्था असल्याचं म्हटलं जातं, पण ही व्यवस्था अपुरी पडण्याची भीती त्या व्यक्त करतात.
 
"गेलं वर्षभर आम्ही सतत तणावाखाली काम करतोय. जानेवारीत काहीसा दिलासा मिळाला पण ती परिस्थिती आता बदललीय. आता पुन्हा आम्ही युद्ध लढत असल्यासारखं वाटतंय, पण आता आमच्यातली शक्ती कमी झालीय. आम्ही हार मानणार नाही. पण माझी लोकांना एकच विनंती आहे....मौजमजा करण्यासाठी बाहेर पडण्याआधी ICU मध्ये लोकांचे जीव वाचवण्यासाठी लढणाऱ्या आमचा जरा विचार करा..."