शनिवार, 23 सप्टेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जुलै 2020 (09:37 IST)

चिंताजनक, देशात कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक

देशातील कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक गुरुवारी नोंदविण्यात आला. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४५,७२० रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या १२,३८,६३५ वर पोहोचली आहे.
 
देशभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या २४ तासांत २९,५५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६३.१८ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात आतापर्यंत ७,८२,६०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ४,२६,१६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. म्हणजेच कोरोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा ३,५६,४३९ ने अधिक आहे.
 
देशात आतापर्यंत दीड कोटीहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १२,३८,६३५ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. गेल्या तीन दिवसांत दहा लाख चाचण्या करण्यात आल्या. त्यातील गेल्या २४ तासांत सुमारे साडेतीन लाख चाचण्या करण्यात आल्या. आता चाचण्यांची क्षमता वाढविण्यात आली असून, रोज जवळपास चार लाख चाचण्या करण्यात येणार असल्याचे ‘आयसीएमआर’चे माध्यम समन्वयक लोकेश शर्मा यांनी सांगितले.
 
दिवसभरात १,१२९ मृत्यू  : रुग्णवाढीबरोबरच करोनाबळींच्या संख्येनेही गुरुवारी उच्चांक नोंदवला. देशात गेल्या २४ तासांत १,१२९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या २९,८६१ वर पोहोचली आहे. मात्र, देशातील करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण २.४१ टक्के असून, ते हळूहळू कमी होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.