रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By

जेव्हा विराट कोहलीने केन विल्यमसनला 11 वर्षांपूर्वी आऊट केलं होतं...

ठिकाण होतं मलेशियातील क्वालालंपूर. तारीख होती 27 फेब्रुवारी 2008. ICC Under-19 वर्ल्ड कपच्या निमित्ताने भारत आणि न्यूझीलंडचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
 
न्यूझीलंडसाठी तेव्हाही केन विल्यमसन हा आधारवड होता तर युवा टीम इंडियाची धुरा विराट कोहलीकडे होती. संघातील प्रमुख फलंदाज असलेल्या कोहलीने त्या मॅचमध्ये चक्क केन विल्यमसनला बाद करत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडले. केन नंतर कोहलीने फ्रेझर कोलसनलाही आऊट केलं होतं.
 
संयमी फलंदाजीसाठी ओळखला जाणारा केन विराटच्या कामचलाऊ गोलंदाजीवर फसला होता.
 
विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सेमी फायनलचा अडथळा पार केल्यानंतर फायलनमध्ये दक्षिण आफ्रिकेला 12 धावांनी नमवत जेतेपदावर नाव कोरलं होतं.
 
त्या संघातील विराट कोहली, रवींद्र जडेजा मंगळवारी होणाऱ्या वर्ल्ड कपच्या उपांत्य लढतीसाठी संघात आहेत. तत्कालीन न्यूझीलंडच्या संघातील केन विल्यमसन आणि टिम साऊदी मंगळवारी न्यूझीलंडच्या संघात आहेत.
 
अकरा वर्षांपूर्वीच्या त्या लढतीतील ते दोघे तरुण खेळाडू आता वनडे वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
 
अकरा वर्षांपूर्वीच्या त्या मॅचमध्ये न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांची मजल मारली होती. कोरे अँडरसनने सर्वाधिक 70 धावांची खेळी केली होती.
 
भारतातर्फे सिद्धार्थ कौल, विराट कोहली आणि तन्मय श्रीवास्तव यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाला डकवर्थ लुईस पद्धतीनुसार 191 धावांचे लक्ष्य देण्यात आलं. श्रीवत्स गोस्वामीच्या 51 धावांच्या खेळीच्या बळावर टीम इंडियाने हे लक्ष्य गाठलं. कोहलीने 43 धावा करत त्याला चांगली साथ दिली होती.
 
अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या कोहलीलाच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
दरम्यान, सध्या आंतरराष्ट्रीय पटलावर 'फॅब्युलस फोर'मध्ये विराट कोहली, जो रूट, स्टीव्हन स्मिथ आणि केन विल्यमसन यांची गणना होते.
 
जगभरात सगळीकडे, कठीण खेळपट्टयांवर, दर्जेदार गोलंदाजांसमोर, प्रतिकूल हवामानात धावांची टांकसाळ उघडणं हा चौघांमधील सामाईक दुवा.
 
कोहली वनडे आकडेवारी
मॅचेस रन्स सर्वोच्च स्कोअर अॅव्हरेज स्ट्राईक रेट शतकं/अर्धशतकं
235 11285 183 59.70 93.04 41/54
 
 
केन विल्यसमन आकडेवारी
मॅच रन्स सर्वोच्च स्कोअर अॅव्हरेज स्ट्राईक रेट शतकं/अर्धशतकं
147 6035 148 47.89 82.15 13/38
 
 
योगायोग म्हणजे या चौघांच्या संघांनी वर्ल्डकपची सेमी फायनल गाठली आहे, त्यामुळे हे चौघं एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
 
मंगळवारी विराट कोहली आणि केन विल्यमसन समोरासमोर असतील. आपापल्या संघांना जिंकून देण्याचं आव्हान या दोघांसमोर आहे.